महाविद्यालयाची अवाजवी फी वाढ रद्द करणेबाबत शिवसेनेकडून शिक्षणमंत्र्यांना पत्र

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज,  या महाविद्यालयाने  शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मागील वर्षापेक्षा अवाजवी फी वाढ केली आहे.

पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज,  या महाविद्यालयाने  शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मागील वर्षापेक्षा अवाजवी फी वाढ केली आहे. जे विद्यार्थी एकरकमी फी भरू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना हप्त्याने फी भरण्यासाठी महाविद्यालयाने उत्पन्नाचा दाखला, तीन वर्षाचे पगार स्लिप, मागील तीन वर्षाचे बँक खात्याचे स्टेटमेंट, तीन वर्षाचे आयटीआर व पालकांचे प्रतिज्ञापत्र अशा कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. 

सदर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवसेना पुणे शहरप्रमुख यांच्या कडे तक्रार केली आहे. सदर समस्येबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या प्रशासनाची भेट घेतली असता, त्यांनी एफआरएकडून फी वाढ करण्याबाबत मान्यता मिळविली आहे, असे उत्तर दिले.

हेही वाचा - जेष्ठ साहित्यिक मधुकर पोतदार यांचे निधन

सदर महाविद्यालयाने कोणत्याही प्रकारे फी वाढ कमी करणार नसल्याचे सांगितले आहे-
विद्यार्थ्यांना हप्ते देण्याचेही मान्य केले नाही. सध्या जगभरात कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे भारतातील अनेक नागरिकांच्या नोकरी-व्यवसायाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयाने मागील वर्षीप्रमाणेच फी घेणे अपेक्षित आहे.

हेही वाचा - दुकानांनाही रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी द्या : महापौर मोहोळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत कोणतीही नवीन फी वाढ झालेली नाही त्याच पद्धतीने सदरच्या महाविद्यालयाची देखील फी वाढ करु नये व विद्यार्थ्यांना कोणतेही कागदपत्रांची मागणी न करता हत्याने फी भरण्याची संधी देण्यात यावी. वरील कॉलेज फी भरण्याची शेवटची तारीख 4 सप्टेबर 2020 असल्यामुळे विद्यार्थ्यावर दबाव निर्माण करून फी भरून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. या महाविद्यालयावर तातडीने कारवाई करुन सदर महाविद्यालयाने केलेली अन्यायकारक फी वाढ रद्दकरण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत. जेणेकरुन महाविद्यालयातील 1200 विद्यार्थ्यावरील अन्याय दूर होईल. अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांच्याकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uday samant pune exorbitant fee increase of colleges