...तोपर्यंत न्यायालयाचं कामकाज मर्यादित राहणार!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

न्यायालयांचे कामकाज जेव्हा कधी सुरू होईल, तेव्हासुद्धा मास्क लावावा. कॉटन तसेच खादीचेच मास्क वापरावे, असे आवाहन ऍड. सरोदे यांनी केले.

पुणे : न्यायालयाचे कामकाज सध्या कोरोनाच्या सावटाखाली सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि न्यायाधीशांनी स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. कोविड-१९ विरोधात लस येत नाही, तोपर्यंत मास्क वापरून आणि इतर आवश्यक खबरदारी घेऊन न्यायालयामध्ये मर्यादितच कामकाज चालणार असल्याची शक्यता प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी व्यक्त केली. 

एक कोटीहून जास्त गणेशक्तांनी 'दगडूशेठ गणपती'चे घेतले ऑनलाईन दर्शन!​

जिल्हा न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायाधीश यांच्यासाठी महात्मा गांधी सेवा संघ आणि सहयोग ट्रस्ट यांच्यावतीने खादीचे ४०० मास्क भेट देण्यात आले. सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्याकडे ऍड. असीम सरोदे आणि 'स्वतंत्र थिएटर'चे संस्थापक युवराज शाह यांनी मास्क सुपूर्द केले. त्यावेळी न्यायाधीश धोटे बोलत होते.

सेवा संघाचे अध्यक्ष जयवंत मठकर, जिल्हा न्यायालयाचे मुख्य रजिस्ट्रार विजय बापट, बाबुराव जंगम, एस.एन. जाधव उपस्थित होते. "न्यायालयात दाखल होणारी कागदपत्रे वेगळे ठेवणे ही उपाययोजना असली तरीही मास्क वापरणे सार्वजनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक झाले आहे," असे न्यायाधीश गोसावी म्हणाले.  

मठकर म्हणाले, "मास्कच्या किमती वाढवून विक्री करण्यात येत आहे. डिझायनर मास्क बाजारात येत आहेत, पण तीनपदरी पद्धतीने तयार केलेले खादीचे मास्क अधिक संरक्षक आहेत." 

अबुधाबीतील कंपनी विकसित करणार 'डीएसके ड्रीम सिटी'; प्रस्ताव न्यायालयात सादर​

वापरलेला मास्क धुवून वापरावा : 
लोकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना खादीचे मास्क उपयोगाचे ठरतील. अनेक लोक दिवसभर वापरलेले मास्क बॅगेत किंवा खिशात ठेवून दुसऱ्या दिवशी ते तसेच वापरताना दिसतात. हा प्रकार गंभीर असून त्यातून अधिक धोके संभवतात. त्यामुळे दररोज मास्क धुवून वापरावा. न्यायालयांचे कामकाज जेव्हा कधी सुरू होईल, तेव्हासुद्धा मास्क लावावा. कॉटन तसेच खादीचेच मास्क वापरावे, असे आवाहन ऍड. सरोदे यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Until the vaccine arrives the courts work will be limited