पुणेकर वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. साडेदहाच्या सुमारास वंदना चव्हाण पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाल्या. त्या वेळी सभागृहातील सदस्यांनी चर्चेदरम्यान बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळ चव्हाण यांनी सभागृहाचे कामकाज बघितले.

पुणे ः देशाच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना शुक्रवारी मिळाली. सभापतीच्या खुर्चीत बसताना सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. साडेदहाच्या सुमारास चव्हाण पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाल्या. त्या वेळी सभागृहातील सदस्यांनी चर्चेदरम्यान बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळ चव्हाण यांनी सभागृहाचे कामकाज बघितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चव्हाण यांना सलग दुसऱ्यांदा खासदारपदाची संधी मिळाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी सभागृहातील सहा सदस्यांची नावे पीठासीन अधिकारी म्हणून नुकतीच निश्‍चित केली आहे. सभागृहात सभापती उपस्थित नसल्यास उपसभापती हरीवंशसिंह कामकाज पाहतात. त्यांच्या अनुपस्थितीत पीठासीन अधिकारी सभागृहाचे कामकाज पाहतात. त्यासाठीची नावे सभापती निश्‍चित करतात. नायडू यांनी निश्‍चित केलेल्या सहा सदस्यांमध्ये भुबनेश्‍वर कलीता, वंदना चव्हाण, सुखेंदू सेखर रे, सुरेंद्रसिंग नागर, डॉ. एल. हनुमंतय्या, डॉ. सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीत्त्व सभागृहात करतात. सभागृहातील कामकाजातील चमक, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर सहा सदस्यांची निवड सभापती करतात. 

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रागावून घरातून निघुन गेलेला मुलगा सापडला

पीठासीन सदस्यांना संधी कधी द्यायची, याचे नियोजन सभापती-उपसभापती करतात. त्यानुसार चव्हाण यांना शुक्रवारी संधी मिळाली. चव्हाण यांनी कामकाज बघितल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.चव्हाण यांनी फेसबुकवर त्या बाबतची पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ""राज्यसभेच्या उपसभापतींच्या पॅनेलमध्ये निवड झाल्यावर आज प्रथमच देशातील सर्वोच्च सभागृहाचे पीठासीन म्हणून काम बघितले. भारतीय लोकशाहीचा गाभारा असलेल्या या सभागृहात अनेक महान नेत्यांनी योगदान दिले आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या राज्यसभेचे पीठासीन म्हणून कामकाज चालविण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.' 

डॉक्टरांनो खाजगी हॉस्पिटलसोबतचे 'हित'संबंधांचे नाते तोडा; रुबल अग्रवाल यांची ताकीद

पुणेकर असलेल्या चव्हाण सुमारे 35 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. या पूर्वी त्या नगरसेवक आणि आमदारही होत्या. पुण्याच्या महापौर म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या पुण्यात सुमारे आठ वर्षे शहराध्यक्ष होत्या. याच दरम्यान त्यांची राज्यसभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवड केली. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारीकीची संधी पक्षाने दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vandana chavan gets the honor of presiding officer of rajyasabha!