
'तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे'; चुलतभावाच्या निधनानंतर वसंत मोरेंची पोस्ट
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आपल्या चुलतभावाच्या निधनानंतर भावनिक पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली आहे. "मी काल माझ्या प्रेसच्या वेळी तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं होतं पण तू त्यावेळी काही बोलला नाहीस. मी लोकांचे प्रश्न एका चुटकीसरशी सोडवतो अन् तुझे प्रश्न सोडवू शकलो नसतो का रे रवी?" अशी भावनिक पोस्ट करत वसंत मोरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
(MNS Vasant More's Cousins Death)
काल वसंत मोरे यांचे चुलतबंधू रविंद्र (बाप्पू) गणपत मोरे यांचे दुःखद निधन झाले. ते कात्रज गावचे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर कात्रज परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनातर वसंत मोरे यांनी पोस्ट करत त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. "काल तुझ्या पोराने, तात्या शेतावर काहीतरी झालंय असं सांगितलं तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता. त्यानंतर मी गाडीतल्या मित्रांना बोललो होतो की, त्याला मला काहीतरी सांगायचे होते पण तो बोलला नाही." असं पोस्ट करत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा: कुख्यात डॉन दाऊद कराचीमध्येच; भाचा अलीशाहा पारकरचा दावा
"तुला जे काय बोलायचे होते तो सारा अंदाज तुझ्या चिठ्ठीतील पहिलं वाक्य वाचल्यावर मला आला आणि नक्की कोण चुकलं ते मला कळेना." पुढे ते लिहितात की, ते तुझं वाक्य "तात्या मला माफ कर लय बोलायचं होते रे पण काय करू बोलता येत नाय" बाकी खाली लिहलेले तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे, जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकी सरशी सोडवतो त्याने तुझे प्रश्न नसते का रे सोडवले रवी?" असा भावनिक प्रश्न करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"अरे रोज आपल्या ऑफिस च्या दारातील गर्दीतून रस्ता काढत जात होतास ना मग मी तुला त्या ही गर्दीत रस्ता दाखवला नसता का रे रवी ?" असा सवाल करत त्यांनी आपल्या मोठ्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे आणि आपले प्रश्न इतरांना सांगितले पाहिजेत. त्यावर काही ना काही तोडगा निघतो असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Web Title: Vasant More Emotional Facebook Post On Cousins Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..