ऊर्जास्रोतांमुळे रशियाचे पारडे जड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Shantishri Pandit Vice Chancellor of JNU

ऊर्जास्रोतांमुळे रशियाचे पारडे जड

पुणे: ‘‘नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादन ही रशियाचे बलस्थान आहे. या ऊर्जा स्त्रोतांसाठी युरोपातील प्रगत देशांनाही रशियाशी चांगले संबंध ठेवावे लागतील. त्यामुळे युक्रेन हल्ल्यावर वक्तव्य (स्टेटमेंट) देण्याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष लष्करी मदत केली नाही,’’ असे मत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे विश्लेषण करताना त्या म्हणाल्या, ‘‘रशियाने पूर्व युरोपात प्रभाव निर्माण करू नये, असा सातत्याने प्रयत्न ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) सदस्य देशांनी केला आहे. युक्रेन हा छोटा देश आहे. जगात एकटा छोटा देश बलाढ्य देशाची टक्कर देऊ शकत नाही. रशिया हा मोठी लष्करी क्षमता असलेला देश आहे. त्याला जागतिक महासत्ता म्हटले नाही, तरीही तो प्रादेशिक बलाढ्य देश आहे, हे रशियाने या हल्ल्यातून सिद्ध केले आहे.’’

रशिया ‘एनर्जी सुपरपॉवर’

युरोप हा नैसर्गिक वायू आणि तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात वायू आणि तेलाचा साठा आहे. पश्चिम सैबेरियामधून सध्या त्याचे उत्पादन सुरू आहे. तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादकांमध्ये रशिया जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे फक्त सैबेरियामधील साठा आहे. आर्टिकमधील साठ्याचे अद्याप मूल्यमापन झाले नाही. ७० टक्के आर्टिक हे रशियाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे युरोपातील जर्मनीसारखा देश नैसर्गिक साधन संपत्तीसाठी पूर्णतः रशियावर अवलंबून आहे. रशिया हा खऱ्या अर्थाने ऊर्जेची महासत्ता (एनर्जी सुपरपॉवर) आहे. युरोप रशियाबरोबरचे आर्थिक संबंधावर कोणतीही गदा आणणार नसल्याचे डॉ. शांतीश्री पंडित यांनी सांगितले.

भारताची भूमिका काय?

कोरोना उद्रेकानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फक्त भारताला भेट दिली. त्यातून त्यांनी हा स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत हा रशियाचा सर्वांत विश्वासू मित्र राष्ट्र आहे. त्याने संरक्षण साहित्य भारताला दिले आहे. अमेरिका हा विश्वासार्ह नाही. त्यामुळे भारताने युक्रेन प्रकरणात वस्तुनिष्ठ भूमिका घेतली आहे. भारताचे रशियाबरोबर सुरुवातीपासून मैत्रीचे संबंध राहीले आहेत. जुन्या मित्राला नवीन मित्रासाठी सोडून द्यायचे नाही. कारण, आंतरराष्ट्रीय राजकारणात कधीच कोणाचा मित्र नसतो, असेही डॉ. पंडित यांनी सांगितले.