Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांविरुद्ध काँग्रेस आघाडी घेणार मोठा निर्णय!

Vidhan Sabha 2019 congress ncp does not have candidate against chandrakant patil kothrud
Vidhan Sabha 2019 congress ncp does not have candidate against chandrakant patil kothrud

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना विरोधी पक्षांतर्फे पाठिंबा देण्यात येणार असल्यामुळे, कोथरूडमध्ये थेट लढत होण्याची शक्‍यता वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे या मतदारसंघात अद्यापही सक्षम उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे, तेही मनसेला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत.

पाटलांना हवा सेफ मतदारसंघ
पाटील यांनी हमखास निवडून येण्यासाठी "सेफ' मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली. त्यांना थोड्याफार पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. कोथरूडमध्ये काही जणांनी फलक उभे करीत ते स्थानिक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर, ब्राह्मण महासंघानेही स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांना पुन्हा उमेदवारी दिली नसल्याच्या कारणावरून आदळआपट केली. शिवसेनेने 25 वर्षे या मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केल्यामुळे तेही युतीच्या जागा वाटपात कोथरुडची मागणी करीत होते. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाचीही चर्चा विरोधी पक्षाकडून झाली. मात्र, पाटील, भाजपचे अन्य नेते यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे मोकाटे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले.

उमेदवारांचा शोध सुरूच
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडे या मतदारसंघात लढण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याने, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोथरूड मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचे निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते. ती जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याची चर्चा सुरू झाली. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोथरूडला मेळावाही घेतला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली होती. चौधरी यांनी प्रारंभी अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर, ते लढणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, विरोधकांचा उमेदवाराचा शोध सुरूच राहिला.

राज ठाकरेंच्या दोन सभा
मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांचेही नाव चर्चेत आले होते. शिदोरे ई सकाळशी आज सकाळी बोलताना म्हणाले, ‘किशोर शिंदे या मतदारसंघातील वॉर्डातून नगरसेवक होते. त्यांनी कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीही गेले काही महिने केली आहे. त्यांनाच सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे. बहुतेक त्यांचा पाठिंबा मिळेल, असे वाटते. राजू शेट्टी आमच्यासोबत आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या दोन सभा पुण्यात होणार आहेत.’

आघाडीचे नेते काय म्हणातात?
सध्याचा कोथरुड मतदारसंघ 2009 पूर्वीच्या शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढाविली होती. मात्र, युतीचे प्राबल्य असल्यामुळे, त्यांना यश मिळाले नव्हते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची काल रात्री बैठक झाली, त्यावेळी, मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची मागणी त्यांनी केली. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, की अद्याप पक्षाचा निर्णय झालेला नाही. पक्षाच्या नेत्यांशी त्या बाबत चर्चा सुरू आहे. मनसेला पाठिंबा देण्यासंदर्भात विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, ‘तीदेखील शक्‍यता आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल.’ काकडे म्हणाले, ‘आघाडीतर्फे स्वतंत्र उमेदवार द्यायचा का, याची चर्चा सुरू आहे. परंतु, तसे न झाल्यास, विरोधी पक्षातर्फे मनसेला पाठिंबा देण्याची सध्यातरी शक्‍यता आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये भाजपविरुद्ध मनसे अशी थेट लढत होईल.’ काँग्रेसने राज्यात मनसेशी आघाडी करण्याचे टाळले आहे. त्यामुळे, काँग्रेसचे वरीष्ठ नेते काय निर्णय घेणार, यांवर कोथरूडचा निर्णय अवलंबून राहील. मात्र, अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच-सहा तासच शिल्लक राहिले आहेत. सध्यातरी आघाडीतर्फे कोणाचेही नाव समोर आलेले नाही. कोथरूडमधून जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील निवडून आल्यास, शहराचे नेतृत्व आपोआपच त्यांच्याकडे जाईल. भाजपकडून कोथरूडची जागा प्रतिष्ठेची करून लढविण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com