Vidhan Sabah 2019 : पुणे जिल्ह्यात शिवसेनेला फटका; काँग्रेस आघाडीच्या जागा वाढणार?

ज्ञानेश्‍वर बिजले 
Monday, 7 October 2019

पुणे जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची धुळधाण उडाली असली, तरी या निवडणुकीत ग्रामीण भागात आघाडीच्या जागा लक्षणीय स्वरुपात वाढण्याची चिन्हे आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची धुळधाण उडाली असली, तरी या निवडणुकीत ग्रामीण भागात आघाडीच्या जागा लक्षणीय स्वरुपात वाढण्याची चिन्हे आहेत. आघाडीचे उमेदवार सर्वत्र अटीतटीची लढत देतील असे वातावरण असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बंडखोरीचा फटका बसल्यास काही मतदारसंघात चित्र पालटू शकते. तेथील मताधिक्‍यही अत्यल्प असेल. 

ग्रामीण मतदारसंघात काय?
ग्रामीण भागातील गेल्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे असलेले मतदारसंघ त्यांच्याकडेच टिकवून ठेवण्यास यंदा त्यांना बऱ्यापैकी यश मिळणार आहे. बारामती, आंबेगाव, इंदापूर हे तीन मतदारसंघच गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले, तर भोर हा एकमेव मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील 21 मतदारसंघात काँग्रेसच्या वाट्याला अपयशच आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याचे बारामती व आंबेगाव राखण्यात त्यांना फारशा अडचणी येणार नाहीत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील तेथे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरलेले आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आव्हान दिले आहे. तेथील लढत चुरशीची होणार असून, विजयी उमेदवाराचे मताधिक्‍यही अत्यल्प असण्याची शक्‍यता आहे. भोरमध्ये शिवसेना व भाजपच्या तीन-चार कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केले आहेत. भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना याचा फायदा होईल. तीन तालुक्‍यांत पसरलेला या मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने येत्या दहा दिवसांत विरोधकांना अंतर्गत बंडखोरी शमवित असतानाच मतदारांशी संपर्क साधायचा आहे. 

भाजपनं मला फसवलं : महादेव जानकर

भाजपला अटीतटीच्या लढतीचा सामना 
भाजपचे ग्रामीण मतदारसंघातील दोन्ही आमदार सध्या धोक्‍यात आहेत. मावळचे बाळा भेगडे यांना शेवटच्या टप्प्यात राज्यमंत्री पद मिळाले. मात्र, परंपरागत भाजपचा मानला गेलेल्या या मतदारसंघात भाजपचेच इच्छुक सुनील शेळके शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे, येथील लढत रंगली आहे. शिरुरमध्ये भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्यात लढत होत आहे. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे हे दोन्ही मतदारसंघ खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची ताकद पणाला लावली आहे.

तरुणांना आकर्षित करणारा काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा

कोण कोठे प्लस?
दौंडमध्ये रासप, तर जुन्नरमध्ये मनसेचे आमदार आहेत. या वेळी, दौंडचे आमदार राहूल कूल यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांच्याशी त्यांची लढत आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे. धनगर समाजातील नाराजी येथील निकालावर परिणाम करू शकते. जुन्नरमध्ये मनसेच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. त्यामुळे शिवसेनेतून काढून टाकलेल्या आशा बुचके अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. येथील लढत मुख्यत्वे बुचके आणि राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांच्यातही होण्याची चिन्हे आहेत. 

गुहागरमधील नाराजी शिवसेनेला अडचणीची

शिवसेनेला फटका
पुरंदरमध्ये शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांना यंदा पुन्हा निवडून येणे अवघड झाले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या पाठिशी आहेत. तशीच स्थिती खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांची झाली आहे. तेथे प्रमुख पक्षांत बंडखोरी झाली असली, तरी मुख्य लढत गोरे विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यातच रंगणार आहे.  आघाडीचे आमदार विजयी होण्यात फारशी अडचण नाही. विरोधी आमदारांच्या मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. शिवसेनेला त्यांचे मतदारसंघ गमवावे लागणार आहेत, तर भाजपच्या आमदारांना अटीतटीच्या लढतीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, या निवडणुकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आघाडीच्या आमदारांची संख्या वाढणार हे निश्‍चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra congress ncp has advantage in pune district