Vidhan Sabha 2019 : पुण्यात राज ठाकरेंना सभेसाठी जागा मिळेना; वाचा मनसे काय करणार?

टीम ई-सकाळ
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पुण्यात मैदानही मिळेनासे झाले आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहांवर शाब्दिक हल्ले चढवत अख्या निवडणुकीच्या प्रचाराचे मैदान गाजविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पुण्यात मैदानही मिळेनासे झाले आहे. राज यांच्या सभेसाठी मागितलेल्या जागांवर परवनागी न दिल्यास थेट चौकातच सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे राज यांच्या पहिल्याच सभेवरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

सांगलीत भाजपमधील  बंडखोरी रोखण्याची जबाबदारी कोणावर?

कधी होणार सभा?
दरम्यान, येत्या बुधवारी (9 ऑक्टोबर) पुण्यात राज यांची सभा होणार असून, त्यानिमित्ताने राज मनसेच्या उमेदवारांसाठी पुणेकरांकडे मते मागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार रिंगणात उतरविला नसतानाही राज यांनी भाजप-शिवसेना महायुतीविरोधात प्रचाराचे रान उठविले. आपल्या खास ठाकरी भाषेत सभा गाजविल्याने अवघ्या देशात त्यांच्या सभांची चर्चा रंगली होती. तेव्हाच ‘लाव रे तो व्हिडिओ’अशी गर्जना करीत, राज यांनी मोदी-शहांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नव्हती. परिणामी, या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानाचा सारा "टीआरपी' यांच्याच सभांकडे झुकला होता. त्यानंतर आता राज हे विधानसभा निवडणुकीच्या रणागणांत उतरणार आहेत, ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी. राज्यातील आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राज यांची पाहिलीवहिली सभा पुण्यात होणार आहे.

राज्यात मोदी, शहांच्या किती सभा होणार?

कोठे घेणार सभा?
मनसेचे नेते बाबू वागस्कर म्हणाले, ‘पुण्यात राज ठाकरे यांच्या किमान 3-4 सभा होणार आहेत. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. मात्र, अद्याप ठिकाण निश्‍चित झालेले नाही. परवनागी न मिळाल्यास अलका चौकात सभा घेऊ.’ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची "ईडी'ने केलेली चौकशी, चौकशीनंतर भाजपविरोधात ब्र ही न काढण्याची त्यांची भूमिका, सोशल मीडियातून झालेले ‘ट्रोल’ या पार्श्‍वभूमीवर राज यांच्या सभांबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. मात्र, त्यांच्या पहिल्या सभेलाच जागा मिळत नसल्याने राज काय बोलणार? या उत्सुकतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे या सभेसाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 mns leader raj thackeray not getting place for rally in pune