भाजप सोडल्याचे फळ मिळाले, राष्ट्रवादीने या नेत्याला दिली मोठी संधी 

नितीन बारवकर
Friday, 24 July 2020

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी आज अपेक्षेप्रमाणे विकास आबा शिवले यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलमधून निवडून आले होते. तथापि,

शिरूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी आज अपेक्षेप्रमाणे विकास आबा शिवले यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलमधून निवडून आले होते. तथापि, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता कमी होणार

शशिकांत दसगुडे यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या महिन्यात सभापती निवड होऊन शंकर जांभळकर यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत उपसभापतिपदासाठी शिवले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी जाहिर केले. 

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच

या निवडीनंतर आमदार अॅड. अशोक पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचीत उपसभापती विकास आबा शिवले यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर तसेच शशिकांत दसगुडे व प्रकाश पवार हे माजी सभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे आदी या वेळी उपस्थित होते. 

पुणे रेल्वे स्टेशनवरून पीएमपीची अहोरात्र बससेवा
    
निवडीनंतर विकास आबा शिवले यांनी बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार अॅड. पवार यांची विकासाची भूमिका समाजाला पुढे नेणारी असल्यानेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून, सभापती शंकर जांभळकर यांच्या खांद्याला खांदा लावून बाजार समितीत काम केले जाईल. शेतकरी हिताच्या योजना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया या शिवले यांनी दिली. आमदार अॅड. पवार यांनी शब्द देऊन योग्य न्याय दिला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
    
शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी या गावचे रहिवासी असलेले विकास आबा शिवले यांनी गावपातळीवरून राजकारणाला सुरवात केली. बाजार समितीवर निवडून येण्यापूर्वी पारोडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. धर्मवीर संभाजीराजे बॅंकेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. जून २०१७ ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १३, तर विरोधी भाजपचे पाच संचालक निवडून आले होते. विकास आबा शिवले यांनी भाजपच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली व ते कृषी पतसंस्था सहकारी सोसायटी मतदार संघातून निवडून आले होते. सन २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच त्यांना उपसभापतिपदाचा शब्द देण्यात आला होता. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा शब्द खरा केला आणि त्यांना शिरूर बाजार समितीच्या उपसभापतिपदावर काम करण्याची संधी दिली. विधानसभा निवडणुकीत विकास आबा शिवले यांनी ते काम करीत असलेल्या तळेगाव गटातून राष्ट्रवादीच्या विजयासाठी नेटाने काम करून अॅड. पवार यांचे मताधिक्क्य अधिकाधिक वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आज त्यांच्या निवडीने त्यांच्या या प्रयत्नांचे चीज झाल्याची चर्चा शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर उमटली.        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Aba Shivale elected as Deputy Chairman of Shirur Agricultural Produce Market Committee