गाव महापालिकेत गेले, आता पालिका सभागृहात जाण्यासाठी मोर्चेबांधणी | Pune Municipal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
गाव महापालिकेत गेले, आता पालिका सभागृहात जाण्यासाठी मोर्चेबांधणी

गाव महापालिकेत गेले, आता पालिका सभागृहात जाण्यासाठी मोर्चेबांधणी

उंड्री - पालिकेच्या बांधावरील अनेक गावे महापालिकेत समाविष्ट झाली. आता या गावातील नेत्यांना महापालिका सभागृहात जाण्याची घाई झाली आहे. मात्र, प्रभाग रचना आणि आरक्षणाकडे सर्वच पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि सर्वच पक्षासह अपक्षांनीही जोरदार फ्लेक्सबाजी सुरू केली आहे. आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर होण्याअगोदरच मोर्चेबांधणी सुरू करून दिवाळी फराळचे औचित्य साधत मतदारांशी संधान बांधत शक्तीप्रदर्शनाचे काम सुरू केल्याचे चित्र उपनगर आणि नव्याने समाविष्ट केलेल्या गावामध्ये चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणुकांच्या तारखा, प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाले नसल्याने अनेकांची द्विधा मनस्थिती असून, त्यांनी पर्याय तयार ठेवल्याची खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने तिकीट नाकारले, तर पक्षांतर आणि पक्षांतर करूनही तिकीट मिळाले नाही, तर अपक्ष निवडणूक लढवायची आहे. आता नाही, तर पुन्हा नाही, अशा भूमिकेतून थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोग्य शिबीर, दिवाळी फराळ, मतदार नोंदणी, शासकीय योजना मिळवून देण्यासाठी केविलवाणी धडपडही त्यांच्याकडून दिसून येत आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी पक्षाच्या प्रमुखांपासून मंत्र्यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे दणक्यात उद्घाटने केली आहेत.

हेही वाचा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील प्रथम नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी दिग्गजांनी अटीतटीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भावबंद, नातेवाईक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते एकमेकांना परिचित असून, मतांची गोळाबेरीज करण्याचे काम दमदार सुरू झाले आहे. गट-तट, मतभेद बाजूला ठेवून आपला माणूस म्हणून प्रचार यंत्रणा कार्यरत झाली आहे. काही करा एक मत आम्हाला द्या, असाही प्रचार शेवटच्या क्षणाला होणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेमधील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर एकत्र लढणार की स्वतंत्र याविषयी अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी की बिघाडी यावरही अनेकांची गणिते अवलंबून आहेत. प्रभाग रचना आणि पक्षांच्या धोरणानंतरच प्रचार यंत्रणा राबविण्याचा काहींनी सावध पवित्रा घेतला आहे.

महापालिकेत जाण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रभागातील मतदारांना प्रलोभणे दाखविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत प्रचंड खर्च करावा लागणार असल्याने वजनदार कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून निवडून येण्यासाठी अनेकांनी आखाडे बांधले आहेत. चौकाचौकात आणि गर्दीच्या ठिकाणी गायब झालेल्यांची छबी फ्लेक्सवर दिसू लागली आहे. मात्र, तिकीटाचे फिक्स झाल्याशिवाय खिशात हात घालायला नको, अशीही भूमिका अनेकांनी घेतली.

loading image
go to top