esakal | ‘वालचंदनगर’मधून ‘प्राणवायू’चा पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन प्लांट

‘वालचंदनगर’मधून ‘प्राणवायू’चा पुरवठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : येथील वालचंदनगर कंपनीने मेडिकल ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली असून, ते नागलॅंड, झारखंड, त्रिपुरा, राजस्थान राज्यांना पीएम केअर्समधून देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशामध्ये ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापुढे व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन प्लांटचे महत्त्व अधोरेखित झाले.

हेही वाचा: Pune : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

देशामध्ये नव्याने ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पुढाकार घेऊन वालचंदनगर कंपनीकडे ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार कंपनीने कमी कालावधीमध्ये सात ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली आहे. उर्वरित प्लांट बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. वातावरणातील हवा घेऊन त्यापासून ऑक्सिजन (प्राणवायू) तयार करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन प्लांट घेऊन जाणाऱ्या गाडीला वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी व संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल हर्ष यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. टी. एम. कोत्रेश, संचालक पी. एम. कुरुलकर, डी. बी. पेद्राम आदी सहभागी झाले होते. या वेळी कंपनीचे जनरल मॅनेजर धीरज केसकर, नितीन पोळ उपस्थित होते. या वेळी ऑक्सिजन प्लंटच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एकनाथ पेठे, अंगत शर्मा, चंद्रा शेट्टी या इंजिनिअरचा कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

"देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट असावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु असून, आम्ही पूर्णपणे मदत करीत आहोत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने कमी वेळेमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचे काम पूर्ण केल्याचा आनंद आहे. कंपनीने डिफेन्स, एरोस्पेस, मिसाईल, अणुऊर्जा निर्मितीच्या प्रकल्प, पाणीबुडीचे गिअर बॉक्स निर्मिती क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे."

- चिराग दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वालचंदनगर कंपनी

loading image
go to top