पुण्यातील गोनवडी ग्रामस्थांना प्यावे लागतेय विषारी पाणी, कारण...

पुण्यातील गोनवडी ग्रामस्थांना प्यावे लागतेय विषारी पाणी, कारण...

आंबेठाण : नैसर्गिक प्रवाहाव्दारे वाहून येणाऱ्या पाण्यात केमिकलयुक्त पाणी वाहून येत असल्याने विहरीतील पाणी खराब होऊन गोनवडी (ता. खेड) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरी आणि ओढ्यात देखील रसायनमिश्रित पाण्याचा तवंग निर्माण झाला असून, त्याचा परिणाम भाजीपाला खराब होण्यात झाला आहे. परिणामी नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होत असून सध्या घरात भरून ठेवलेल्या पाण्यावरच त्यांना तहान भागवावी लागत आहे.

गोनवडी हे कृषीप्रधान गाव म्हणून ओळखले जाते. भामा नदीच्या पाण्यावर येथील बहुतांश शेती पिकत आहे. तर ज्या ठिकाणी नदीच्या पाण्याची व्यवस्था नाही तेथे शेतकरी शेतात विहरी घेऊन बागायती शेती करीत आहे. गावची गंगाराम खोरे नावाची लोकवस्ती असून तेथे ७० ते ८० च्या आसपास लोकसंख्या आहे.

दरम्यान, या वस्तीला विनायक भगवंत मोहिते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या एकत्रित असणाऱ्या विहरीतून पाणीपुरवठा केला जातो परंतु मागील काही दिवसांपासून या विहरीसह लगतच्या ओढ्याचे पाणी तांबूस पिवळसर रंगाचे झाले असून, त्यावर तेलासारखा तवंग आला आहे. तर अधूनमधून पाण्याचा वास येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

परिणामी नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहिले नसून या पाण्यावर अवलंबून असणारी शेतातील भाजीपाला पिके जळून जात आहे. ओढ्याला देखील रसायन मिश्रित पाण्याचा फटका बसला असून, आजूबाजूला वास येत आहे.

गावाच्या दक्षिण बाजूला आंबेठाण गावच्या हद्दीत दवणे वस्ती परिसरात असणाऱ्या विविध कंपन्या आणि आंबेठाण गावाच्या पूर्वेला असणाऱ्या एका कंपनीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे विहरी आणि ओढे दुषित झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यापूर्वी देखील बिरदवडी गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या खाणीत साचलेल्या कचऱ्यामुळे पाणी खराब होऊन खालच्या बाजूला असणाऱ्या विहरीतील पाणी खराब झाले होते. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या उदभवल्या होत्या. एकप्रकारे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षाच मिळत होती.

गोनवडी येथील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची अजून समस्या निर्माण होऊ नये आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ ओढ्याला खराब पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संदीप मोहिते आणि या वस्तीवरील नागरिकांनी केली आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com