esakal | पुणे जिल्ह्यात पावसाने कुठले रस्ते, पुल बंद, कोणत्या तालुक्यात काय झाले नुकसान घ्या जाणून
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात पावसाने कुठले रस्ते, पुल बंद, कोणत्या तालुक्यात काय झाले नुकसान घ्या जाणून

बुधावरी पुणे शहरात व जिल्ह्यात झालेल्या पावसाने अशरक्ष: थैमान घातले. अनेक तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. का

पुणे जिल्ह्यात पावसाने कुठले रस्ते, पुल बंद, कोणत्या तालुक्यात काय झाले नुकसान घ्या जाणून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे :  बुधावरी पुणे शहरात व जिल्ह्यात झालेल्या पावसाने अशरक्ष: थैमान घातले. अनेक तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. काही जण पुरात वाहून गेले, काही नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले. याबाबतचे जिल्ह्यातील अपडेट खाली देत आहोत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून, सोलापूर जिल्ह्यातील ३८, सातारा जिल्ह्यातील ३ व बारामती मंडलातील ६ अशा ४५ वीज उपकेंद्रातील यंत्रणा ठप्प झाली आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हजारो विजेचे खांब पुराच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याचा जोर ओसरताच तेथील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. 

-बारामती व इंदापुर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सिध्देश्वर निंबोडी येथील मदनवाडी तलावाचा सांडावा फुटल्याने तलावाच्या शेजारील एक घर वाहून गेले आहे तसेच तलावाच्या खालील शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

-इंदापूर तालुक्यातील कळाशी व गंगावळण या दोन गावातील रस्ता खचल्याने या रस्त्या वरून होणारी चारचाकी व ट्रॅक्टर वाहतूक बंद पडली आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

-पुणे-सोलापूर महामार्गावरील वाकडा पुल येथील 
भराव खचला असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

-बारामती तालुक्याच्या पूर्व पट्यातील डोर्लेवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे. सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.  

-शिक्रापूर पोलिस वाहन चालक हवालदार संजय डमाळ यांच्या धाडसाने कालच्या पुरात दोन जणांचे प्राण वाचले. ओरा-सिटी ओढ्यात वाहून चाललेल्या चारचाकीतील दोघांचा आक्रोष पाहून संपूर्ण शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने काल एका निनावी फोनवर ही कामगिरी करुन दाखविली. 

-शिक्रापूरच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार अशोक पवारांच्या सुचना.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

-आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणातून 5 हजार क्युसेकने पहाटे 5 वाजता पाणी सोडण्यात आले.

-इंदापूर शहर व तालुक्यात २५ वर्षानंतर पहिल्यांदाच विक्रमी पाऊस पडला असून आपल्या सर्वांच्या नशिबामुळे एकही जीवितहानी झाली नाही. मात्र ज्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, ते पंचनामे व मदती पासून वंचित राहणार नाहीत अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

-जुन्नर तालुक्यातील येडगाव,वडज, गुंजाळवाडी, नारायणगाव या बागायती भागात बारा तासात १०५ मिलिमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका  फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे.

-भिगवण शहरांमध्ये बुधवारी दिवसभर झालेल्या विक्रमी २०४ मि.मि. पावसामुळे शहरातील सुमारे शंभरहुन अधिक घऱांमध्ये पाणी घुसले तर अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यावसायिकांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

-स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसांमुळे ओढयावरील पुल वाहुन गेल्यामळे गावाचा संपर्क तुटला तर ओढयाला आलेल्या पुराने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास वेढा टाकला. आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचारी व दोन कुत्र्यांची पिल्ले १५ तास पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडली होती. अखेर मुळशी आपत्ती व्यवस्थान समितीच्या रेस्कु टिमने गुरुवारी (ता.१५) दुपारी एकच्या सुमारास त्यांची यशस्वी सुटका केली.

-माळशिरस, पोंढे, टेकवडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. या भागात वादळी वारयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळनदी व लहान-मोठ्या ओढ्यांना व नाल्यांना पावसाच्या पाण्याने पूर आल्याने विविध रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. पुराच्या पाण्यातील रस्त्याने कोणीही वाहने अथवा लोकांनी धोका पत्करून जाऊ नये असे आवाहन तळेगाव पोलिसांनी केले आहे.  

-बारामती तालुक्याच्या जिरायती भागात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे- नाल्यांना महापूर आला होता. ओढ्याला आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे रात्रभर बारामती-पाटस रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. महापूराचे पाणी एका शेतकऱ्याच्या कुकटपालन शेडमध्ये घुसल्याने तब्बल तीन हजार कोंबडीची पिल्ले मरण पावल्याने मोठे नुकसान झाले. 

-चासकमान (ता. खेड) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी सकाळी १०.३० वाजता चासकमान धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे एक हजार ८५० क्युसेक्स वेगाने विसर्ग भिमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

-बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडीसह परिसरातील पारवडी, कटफळ, शिर्सुफळ, वंजारवाडी, जैनकवाडी, गाडीखेल, साबळेवाडी या गावांमध्ये मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. अनेक गावांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या पावसाची नोंद झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

-खडकवाडी (ता. आंबेगाव) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वडदरावस्तीवरील अनेक घरांमध्ये पाणी घुसले असुन घरांना पाण्याने वेढल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-पूरामुळे आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली.

-दौंड तालुक्यातील राजेगाव-खानवटे रस्त्यावरील ओढयाच्या पाण्यात वाहून गेल्याने एका दांपत्यासह एकूण तीन जणांचा बळी गेला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांच्यासमवेत असलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.  

-आळंदी मरकळ रस्त्यावर च-होली खुर्दमधे  बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिक ओढा बुजवून सोसायटीच्या इमारतीचे  बांधकाम केले.ओढ्याच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा परिणाम काल रात्रीच्या पावसाचे पाणी थेट सोसायटीत शिरले. 

-निरगुडसर ः अचानक पाऊस वाढल्याने डिंभे धरणातुन घोडनदी पाञात पहाटे साडेचार वाजता ५००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असुन पुरस्थितीबाबत दक्षता म्हणुन पाटबंधारे विभागाने नदीवरील महत्वाच्या पाच ते सहा बंधा-यावरील ढापे गुरुवारी काढले, पाऊस ओसरल्यावर पुन्हा ढापे बसवण्यात येणार आहे.

-आंबेगाव तालुक्यात हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. गुरुवारी पहाटे धरणातून घोडनदी पात्रात पाच हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

-काऱ्हाटी संपर्क तुटला, बोरकरवाडीत घरांमध्ये घुसले पाणी. 

काळ्या ओढ्यात ट्रक उलटला, पुरामुळे सुपे व मोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प.

-भोर तालुक्यात तीन दिवसांच्या वादळी पावसानंतर गुरुवारी दुपारनंतर पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तालुक्यात हाय-अलर्ट जारी केला आहे. 

-वालचंदनगर : कळस (ता. इंदापूर) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर चारचाकी सहित वाहून चालले सोनाई डेअरीचे संचालक  व उद्योजक किशोर माने यांना ग्रामस्थांना व पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

-दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गाच्या दक्षिणेकडे गावांमध्ये बुधवारी अतिवृष्टीमुळे ओढयांना पूर येऊन मळद येथील तीन वर्षापूर्वी बांधलेला तलाव रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे ओढयाला पूर आल्याने मळद, रावणगाव येथील शेतकर्‍यांची जनावरे वाहून गेली. स्वामी चिंचोली येथील पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला.

-वालचंदनगर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील बीकेबीएन रस्त्यावरील  ओढ्याच्या पुराच्या  पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी व प्रशासनाने वाचविले. सहा तासानंतर बोटीच्या एकाला बाहेर काढण्यात यश आले.

-नाझरे धरणातून रात्री उशीरा चार हजार क्यूसेक्सने पाणी सोडल्यामुळे बारामतीत क-हा नदीला मोठा पूर आला आहे. 

-पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन ते पहाटे तीनच्या दरम्यान वाकी खुर्द, (ता. खेड) गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पुरासारखे पाणी वाहत होते. अरुंद झालेल्या ओढ्यात पाणी मोठया प्रमाणात ओसंडून वाहिल्याने महामार्गावर तीन ते चार फूट पाणी साचले होते, पहाटे पाचपर्यंत वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती.

-शिर्सुफळ : बारामती व इंदापुर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सिध्देश्वर निंबोडी येथील मदनवाडी तलावाचा सांडावा फुटल्याने तलावाच्या शेजारील एक घर वाहून गेले आहे तसेच तलावाच्या खालील शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)