पिंपरी-चिंचवडमध्ये 'दादागिरी’त कोणाचे प्राबल्य?

Ajit-and-Mahesh
Ajit-and-Mahesh

पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नवे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना जुने-नवे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्ष बांधणीची व्यूहरचना करावी लागणार आहे. २०२२ ची महापालिका निवडणूक त्यांना जिंकायची आहे. हीच मनीषा राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आहे. त्यासाठी पालकमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत. दोघेही नेते ‘दादा’ या नावाने परिचित आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ असेच वातावरण बघायला मिळणार आहे.

अंतर्गत कलह
शहर भाजपमध्ये पूर्वी गडकरी आणि मुंडे असे गट होते. त्यांच्यात संदोपसुंदी सुरू होती. पाच वर्षांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी पक्षात प्रवेश केला. महापालिकेत सत्ता मिळविली आणि ‘जुने’ व ‘नवे’ असा वाद सुरू झाला. त्यातही जगताप समर्थक व लांडगे समर्थक अशी सरळ सरळ विभागणीच झाली. पदांचे व जबाबदाऱ्यांचे वाटप करताना हा वाद नेहमीच चर्चेत आला. आताही लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी ॲड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, अमोल थोरात इच्छुक होते. मात्र दोन्ही आमदारांपैकी एकाने जबाबदारी स्वीकारावी, असे श्रेष्ठींचे मत असल्याने अध्यक्षपदाची धुरा लांडगे यांच्याकडे आली. जगताप यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला होता. पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास ते इच्छुक नव्हते.

जुन्या-नव्यांचा संगम
लांडगे यांना नवे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह जुन्या कार्यकर्त्यांनाही सांभाळावे लागणार आहे. दोघांमध्ये समन्वय साधावा लागणार आहे. शिवाय, आजही जुन्यांमध्ये गडकरी समर्थक व मुंडे समर्थक असे दोन गट आहेतच. नव्यांमधील बहुतांश नगरसेवक पक्षाच्या धोरणांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांचाही गैरसमज दूर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

राष्ट्रवादीचे आव्हान
महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत सत्ता गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफुटवर गेला होता. मात्र आता राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आले आहे. त्या माध्यमातून पवार यांनी शहरात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीमध्येही चैतन्य आले आहे. 

शिवसेना विरोधात
राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून भाजप व शिवसेनेत मतभेद झाले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात शिवसेना पोचली आहे. त्याचा फटका महापालिका निवडणुकीत भाजपला बसू शकतो. या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्यास भाजप एकटा पडू शकतो. याचा विचार करून भाजप अध्यक्षांना नियोजन व पक्ष संघटन करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com