पुणे : निधी देऊ, चांगली कामे करा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- झेडपी पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांचा सल्ला.

पुणे : जिल्हा परिषद हे नेते घडविणारे शक्तीस्थळ आहे. येथूनच पुढे आमदार, खासदार होत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत चांगली कामे करा. जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षसह सभापतिपदाच्या निवडीसाठी पवार यांनी आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी पदाधिकारी आणि सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा बँकचे अध्यक्ष रमेश थोरात, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.

सत्ताबदल झाला अन् भल्या पहाटे झाली अधिकाऱ्यांची धावपळ!  

पवार म्हणाले, "गेल्या पाच वर्षात राज्यात पक्षाची सत्ता नसल्याने जिल्हा परिषदेला निधी मिळण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली. पुणे जिल्हा परिषदेचा मोठ्या प्रमाणात निधी सरकारकडे प्रलंबित आहे. आता मीच राज्याचा अर्थमंत्री असल्याने जिल्हा परिषदेला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. 

पुणे : उपमुख्यमंत्री होताच अजित पवार 'इन एक्शन मोड'

तसेच राज्य सरकारने नुकताच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकडे लागणारा निधी आणि अन्य विकासकामांसाठी लागणारा निधी याचा ताळमेळ घालून टप्प्याटप्याने निधी वितरित केला जाईल. पुणे जिल्ह्यातील राज्य महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील."

Video : संभाजीराजे उपोषण करू नका, चर्चा करा; अजित पवारांचं आवाहन

दरम्यान, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते हेच पक्षात राहिले, या निष्ठावंतामुळेच राज्यात पक्षाला यश मिळाले. जे पक्ष सोडून गेले, ते आता परतण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांचा परत येण्याचा हेतू हा पदे मिळवणे असा असणार आहे. परंतु निष्ठावंतानाच पदे दिली जातील, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. 

पाच वर्षानंतर राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती 

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडे जी खाती होती, ती बदलून आता महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काही नवीन खाती घेतली आहेत. यामध्ये सहकार, पणन, सामाजिक न्याय आदी महत्वपूर्ण खात्यांचा समावेश आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. या माध्यमातून तुम्ही चांगली कामे करून पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या वाढवा, असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will provide Funds for works said Ajit Pawar to ZP Officials