Vidhan Sabha 2019 : कसब्यात विजयासाठी पंचाहत्तर हजार मतांची गरज

winner needs 75 thousand votes in Kasaba Vidhan Sabha constituency Pune
winner needs 75 thousand votes in Kasaba Vidhan Sabha constituency Pune

पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का जवळपास आठ टक्‍क्‍यांनी, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एक टक्‍क्‍याने घसरला आहे.

एकूण मतदान आणि चौरंगी लढत पाहता, या मतदारसंघात उमेदवाराला विजयासाठी पंचाहत्तर ते ऐंशी हजार मतांची गरज पडणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात 15, 17 आणि 18 हे प्रभाग पूर्ण येतात, तर प्रभाग क्रमांक 16 आणि 19 मधील प्रत्येकी 20 आणि 29 क्रमांकाच्या प्रभागातील पाच ते सहा याद्या येतात. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15, 17 आणि 18 मधील मतदानाची टक्केवारी विचारात घेतली, तर प्रभाग 15 मध्ये जवळपास साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे; तर 17 आणि 18 प्रभागांत पन्नास ते पंचावन्न टक्के एवढे मतदान झाले आहे. उर्वरित तीन प्रभागांत मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण सर्वसाधारण असेच आहे.

आपल्या हक्काचा मतदार असलेल्या प्रभागातील मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचा दावा सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीकडून मुक्ता टिळक, कॉंग्रेस आघाडीकडून अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजय शिंदे रिंगणात उतरले होते. युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत आहे. या व्यतिरिक्त सात अपक्ष असे एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. 
गेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 2 लाख 75 हजार 138 होती. त्यापैकी 1 लाख 69 हजार 500 म्हणजे 61.57 टक्के मतदान झाले होते. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील मतदारांची संख्या अवघ्या 15 हजार 545 ने वाढून 2 लाख 90 हजार 683 इतकी झाली. त्यापैकी 1 लाख 50 हजार 345 म्हणजे 51.72 टक्के मतदान झाले. त्यामध्ये 81 हजार 151 पुरुषांनी, तर 69 हजार 193 स्त्रियांनी मतदान केले. झालेल्या एकूण मतदानापैकी सत्तर हजारहून अधिक मते जो उमेदवार घेईल, तो कसब्याचा वारसदार ठरणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com