हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच घडल्या महिलांवर अत्याचाराच्या गंभीर घटना!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते.

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी (ता.14) व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दि इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर इंडियाच्या वतीने (आयएलसीआय) पहिला 'अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार' ऍड. ऍग्नेस यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी 'आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते. 

- उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत

ऍग्नेस म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते. आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत; पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.'' 

- धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले

डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले. 

- रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

ज्येष्ठांच्या संघटनांचा सन्मान 
या वेळी आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज, जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ (डीएसके विश्व, पुणे), कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within a fortnight there were serious incidents of violence against women