

पुणे, ता. १६ : लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करताना सर्व राज्यांना एकच सूत्र लागू करावे आणि या प्रक्रियेत महिला आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी मांडली. ‘‘मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढविण्याबाबत सरकारला सहकार्य करण्याची आम्ही तयारी दाखवली तर, त्यासाठी प्रत्येक राज्याला समान सूत्र लागू करणे आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणे या प्रमुख अटी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘‘जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या मुलीचे मते वेगवेगळी असतील, तर मी त्याचे स्वागत करते. नवीन पिढीचे विचार वेगळे असू शकतात, मात्र माझ्यासाठी आई- वडिलांचा शब्द हाच अंतिम असतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेबाबत आमच्या पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून सातत्यपूर्ण आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळीही आम्ही सकारात्मक भूमिका घेतली होती. मतदारसंघांची संख्या वाढविण्याच्या प्रक्रियेत काश्मीर ते कन्याकुमारी सर्व राज्यांसाठी एकच सूत्र असावे, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे निकष असू नयेत. पुनर्रचनेची एक निश्चित पद्धत असते. कोणाच्याही मनमानीने ही प्रक्रिया होऊ नये. सरकारने निश्चित केलेल्या सूत्रानुसारच पुनर्रचना करावी.’’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या,‘‘आम्हाला कोणतीही ऑफर आलेली नाही. जी ऑफरच आलेली नाही, त्यावर किती वेळ चर्चा करणार?’’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
मतदारयाद्यांतील वाढीवर लक्ष ठेवणार...
मतदारयाद्यांमधील दुबार नावे वगळण्यापेक्षा नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची संख्या आणि त्यामागील प्रक्रियेची आपल्याला अधिक चिंता असल्याचे सुळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘खडकवासला विधानसभा मतदारसंघात पूर्वी साडेपाच लाख मतदार होते. आता ही संख्या अडीच लाखांवर आली आहे. जवळपास ५० टक्के मतदार कुठे गेले, याचे विश्लेषण आम्ही मागितले आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने मतदारयाद्यांमध्ये दर महिन्याला किती नावे वाढत आहेत, याचा हिशेब ठेवावा. मी स्वतःही हा हिशेब ठेवणार आहे. निवडणूक आयोगाला याबाबत जाब विचारणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.