पुणे : जलयुक्तच्या कामांचे 'सीओईपी' करणार इन्व्हेस्टिगेशन; दोषींवर होणार कारवाई

Jalyukta
Jalyukta

पुणे : महायुतीच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेली कामे खूपच निकृष्ट झालेली असल्याचे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे उघडकीस आले आहे. या अतिवृष्टीत दौंड तालुक्‍यातील मळद येथील जलयुक्तचा पूर्ण बंधाराच वाहून गेला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या निकृष्ट कामांची पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी गुरुवारी (ता.5) झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली.

दौंड तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी जलयुक्त शिवार योजनेतील मळद येथील बंधारा वाहून गेल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. कागदोपत्री या बंधाऱ्याचा सांडवा 25 मीटर लांबीचा आहे. पण प्रत्यक्षात तो 13 मीटरच करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा फुगवटा वाढला आणि हा पूर्ण बंधाराच वाहून गेला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीचे, पिकांचे आणि गुरा-ढोरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल जगदाळे यांनी यावेळी उपस्थित केला.जिल्ह्यातील 'जलयुक्त'च्या सर्व कामांची तपासणी करण्याची मागणी करणारा ठराव जगदाळे यांनी मांडला. या ठरावाला खेड तालुक्‍यातील सदस्य अतुल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा देत, एकमताने हा ठराव मंजूर केला. त्यानंतर अध्यक्षा पानसरे यांनी ही ग्वाही दिली.

कोरोना संसर्गामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेची प्रदीर्घ काळ अशी सर्वसाधारण सभा झालीच नव्हती. याआधी कधी ऑनलाइन तर, कधी मोजक्‍याच सदस्यांच्या उपस्थितीत या सभा घेण्यात आल्या होत्या. परंतु विषय समित्यांवरील रिक्त पदे भरण्याच्या उद्देशाने आजची सभा पूर्वीप्रमाणे आयोजित करण्यात आली होती. परंतु विषयपत्रिका काढल्यानंतर पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत अन्य धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत.

आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रूक येथील शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याचा आरोप दरेकर यांनी केला. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. दरम्यान, एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अध्यक्षांचा अवमान केल्याचा आरोप करत, संबंधित अधिकाऱ्याला राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवण्याचा ठराव करण्यात आला.

या सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवर आशा बुचके, देविदास दरेकर, अमोल नलावडे, प्रवीण माने, विठ्ठल आवाळे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, अतुल देशमुख, अभिजित तांबिले आदी सदस्यांनी मते मांडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com