सहनशीलतेचा किती अंत पाहणार; राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बनलाय धोकादायक!

Road_damage
Road_damage

पुणे : शहरालगतच्या पिसोळी तेथून उंड्री, हांडेवाडी आणि मंतरवाडी येथून जाणारा राज्य महामार्ग. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा केला आहे, पण या चार गावातून जाणाऱ्या महामार्गाचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले आहे. काही ठिकाणी एका बाजूचा रस्ता अपूर्णच आणि रस्त्यावर भले मोठे खड्डे अशी या महामार्गाची स्थिती आहे. "खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, पण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी ढिम्मच. कोरोनाच्या नावाखाली याकडे अधिकच दुर्लक्ष होत आहे. या भागातील खासदार, आमदार याकडे कधी लक्ष देणार?... सहनशीलतेचा किती अंत पाहणार? हा प्रश्‍न आहे या परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनचालकांचा. 

कोंढव्यालगतच्या खडी मशीन चौकापासून मंतरवाडीपर्यंतच्या या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. हवेली तालुक्‍यातील हा भाग पुरंदर विधानसभा मतदारसंघात येतो. शहरालगतची पिसोळी, उंड्री, हांडेवाडी ही गावे विकसित होत असून, या भागातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहनांची वर्दळही वाढली आहे. या राज्य महामार्गाचे काम काही महिन्यांपूर्वी झाले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने चार गावालगतच्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही. 

या संदर्भात माहिती घेतली असता बांधकाम विभागाने ठेकेदाराचे बिल थकविले आहे. त्यामुळे हे काम अर्धवट राहिल्याचे सांगण्यात आले. मात्र, बिलाच्या कारणावरून वाहनचालकांना किती त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

एवढे मोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यामुळे गाडी खाली-वर होते. मी गाडी कशी चालवू. कामासाठी जायचे तर कसे जायचे. जीव धोक्‍यात घालून जावे लागते. रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा. खूप त्रास होत आहे. 
- दिलीप बलदोटा, रहिवासी पिसोळी

आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. ठेकेदाराचे बिल देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे अधिकारी सांगतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा पर्यायी मार्ग काढावा. 
- मच्छिंद्र दगडे, सरपंच- पिसोळी 

सध्या निधीची अडचण असल्यामुळे ठेकेदाराचे काही बिल थकले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वर्षापासून प्रलंबित आहे. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तात्पुरते डांबरीकरण करून प्रश्‍न सुटणार नाही. येत्या दोन ते तीन आठवड्यात हा प्रश्‍न मार्गी लावून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. 
- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com