ॲपवरून ‘डेटिंग’ धोक्याचं; तरुण सहज फसतायत जाळ्यात!

Dating-Apps
Dating-Apps

पुणे - स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विजयची (नाव बदलले आहे) टिंडर या डेटिंग ॲपवर एका तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांकही दिले. तरुणीने मद्यपानाच्या निमित्ताने विजयला खराडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याला मद्यातून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम व मोबाईल असा सव्वालाखाचा ऐवज घेऊन ती पळून गेली. याच पद्धतीने श्रीरामपूरच्या एका व्यक्तीचीही फसवणूक झाली. अशा एक, दोन नव्हे तर तब्बल ८४ तक्रारी मागील वर्षभरात पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. टिंडर व अन्य डेटिंग ॲपद्वारे तरुणांना सावज केले जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरामध्ये शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय यांसह वेगवेगळ्या कारणांमुळे देशभरातील तरुणांचा पुण्यात मुक्काम असतो. काही जणांना मित्र-मैत्रीणींचा मोठा आधार मिळतो. त्यामुळे कुटुंबाची उणीव भासत नाही. याऊलट काही जणांकडून एकाकी राहणे किंवा सातत्याने मोबाईल, इंटरनेटसोबत जगणे अधिक प्राधान्य दिले जाते. त्यातुनच काही तरुणांकडून इंटरनेटवर विविध डेटिंग साईट्स, ॲप्लिकेशन्स किंवा फेसबुकद्वारे तरुणींशी ओळख निर्माण करण्यावर भर दिला जातो. नेमके असेच तरुण किंवा व्यक्ती फसवणूक करणाऱ्यांचे सावज ठरत असल्याची सद्यःस्थिती आहे. 

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घटनांमध्ये डेटिंग ॲपद्वारे ओळख झालेल्या तरुणीने अशाच पद्धतीने दोघांना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांना हॉटेलमध्ये मद्यातुन गुंगीचे औषध देत त्यांना लुबाडल्याच्या घटना ताज्या आहेत. डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्यांकडून तरुणांशी ओळख वाढवून, त्यांचा विश्‍वास संपादन करुन आपल्या जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर संबंधित तरुणांची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ घेतले जातात. त्यातून संबंधित तरुणांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळले जाते. तर काही घटनांमध्ये तरुणांना शिवीगाळ, धमकी देण्यापासून जिवे मारण्यापर्यंतच्याही घटना घडल्या आहेत.

वर्षभरात ८४ घटना 
गेल्या वर्षात डेटिंग ॲपवरुन झालेल्या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांकडे तब्बल ८४ तक्रारी अर्ज दाखल आहेत. त्यापैकी २० अर्ज प्रलंबित आहेत, तर ६४ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आली आहेत. तर २०१९मध्ये सायबर पोलिसांकडे १०५ तक्रारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीत टोळ्या सक्रिय 
ऑनलाइन डेटिंगच्या प्रकारामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, कोलकता अशा वेगवेगळ्या राज्यांमधील काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यांच्याकडून तरुणांची फसवणूक केली जाते. अनेकदा उच्च शिक्षित तरुणांकडूनही त्यांच्या बॅंकेसंबंधीची गोपनीय माहिती ‘ओटीपी’ अनोळखी व्यक्तींना दिला गेल्याने ते फसले गेले आहेत, तर काही स्थानिक नागरिकांकडूनही असे प्रकार केले जातात.

अशी घ्या काळजी  

  • अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहितीपासून दूर ठेवा 
  • छायाचित्रे, व्हिडीओ देण्याचे टाळा 
  • डेटिंग करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाईल खरे आहे का, याची पडताळणी करा 
  • प्रत्यक्षात भेटीच्या वेळी सार्वजनिक, गर्दीने गजबजलेले ठिकाण निवडा 
  • भावनेच्या आहारी जाऊन पैशांचे व्यवहार करू नका

तरुणांची वैयक्तिक माहिती घेऊन अनोळखी व्यक्ती त्यांच्याशी संपर्क साधतात. कधी प्रत्यक्षात भेटून तर कधी जबरदस्तीने किंवा ब्लॅकमेल करून पैसे, मौल्यवान वस्तू चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांची गांभीर्याने दखल सायबर पोलिसांकडून घेतली जात आहे. नागरिकांनीही अशा प्रकरणांमध्ये सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
- कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com