
कृषी कायद्यांबद्दल पंजाबच्या शेतकऱ्यांत अजूनही राग
गुरूदासपूर: कृषी कायदे रद्द झाल्यावर हमी भावासह अन्य काही सुधारणा न झाल्यामुळे पंजाबमधील शेतकरी अजूनही संतप्त आहे. निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर येवो, ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ठामपणे प्रदीर्घ काळ आंदोलन केले. त्यामुळे केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आता विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. पंजाबमध्ये सुमारे 70 टक्के शेतकरी आहेत. राज्याच्या शहरी भागात राजकीय मुद्दे असले तरी, ग्रामीण भागात मात्र, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे कळीचे असल्याचे दिसून आले.
हेही वाचा: प्रचाराची वेळ वाढली; निवडणूक आयोगानं 'या' अटींवर दिली परवानगी
निवडणुकीसाठी बहुतेक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. परंतु, त्यात शेतकरी, त्यांच्या पिकांना हमी भाव, अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा, बी-बियाणांची खरेदी, वीज दर आदींबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तसेच केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी पुरेशी उपाययोजना झालेल्या नाहीत, असे गुरुदासपूर जिल्ह्यातील कामोनंगल, मऱड, खासा गावांतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पठाणकोट, तरणतारण, कपूरथाला, जालंधर, नवाबसाहिब, अमृतसर, पतियाळा आदी जिल्ह्यांतही शेतकरी संघटनांचे पॉकेट मोठे असून या संघटना आपआपल्या स्तरावर शेतकरी आंदोलनाची धग अजूनही तेवत ठेवत असल्याचे शेतकऱ्यांशी चर्चा करताना जाणवले.
हेही वाचा: "भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना
या बाबत भारतीय किसान सभेचे पंजाबचे सरचिटणीस मेजरसिंग पुन्नावाल म्हणाले, केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले म्हणजे सगळे काही संपलेले नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना कॉंग्रेसकडून अपेक्षा होत्या. परंतु, त्यांची पूर्तता झालेली नाही. लखीमपूर खेरीमधील दोषी मंत्र्याला अद्याप घरी पाठविण्यात आलेले नाही. उद्योगपतींना धार्जिणे धोरण काय कामाचे ?
हेही वाचा: पाच राज्यातील निवडणुकानंतर पेट्रोलचे दर भडकणार?
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त समाज मोर्चाची स्थापना केली. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी 117 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत उतरण्यास काही संघटनांचा विरोध होता. परंतु, आपला आवाज दाखवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलेच पाहिजे, या विचारातून शेतकरी निवडणूक रिंगणात पावले टाकली आहेत. आमचे उमेदवार किती ठिकाणी विजयी होतील, या पेक्षा शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या मागण्यासाठी जागरूकता निर्माण करायची आहे, असे मोर्चाचे फतेगर साहिबमधील उमेदवार कुलवंतसिंह संधू यांनी स्पष्ट केले.
सनी देओलला फिरू देणार नाही
गुरुदासपूर जिल्ह्यातून लोकसभेवर या पूर्वी अभिनेते विनोद खन्ना गेले होते. त्यांच्यानंतर अभिनेते सनी देओल हे येथून निवडणूक जिंकले. परंतु, निवडून गेल्यापासून ते य़ेथे फिरकलेलेही नाही, असा येथील शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. खन्ना यांचा मतदारसंघाशी संपर्क होता. परंतु, देओल यांचे घर येथे असूनही ते फिरकत नाही. त्यामुळे आता या पुढे ते जिल्ह्यात आले तर, त्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशारा भारतीय किसान सभेचे गुरुदासपूर जिल्हाध्यक्ष लखिंदरसिंग मरड यांनी सकाळशी बोलताना दिला.
Web Title: Punjab Farmers Still Angry Agricultural Laws
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..