

Financial planning for children
esakal
रचना रानडे - support@rachanaranade.com
आज बालवर्गात असलेल्या मध्यमवर्गातील मुलांना ‘रोटी-कपड़ा-मकान’ यासाठी संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळेच त्यांना बचत कशी करावी, पैसा कसा वाढवावा, हे आवर्जून शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणासाठी त्यांना शैक्षणिक कर्ज काढून देऊन किंवा व्यवसायासाठी बीजभांडवल देऊन पैशाचे मूल्य समजावून सांगण्याची गरज आहे. आर्थिक नियोजनातून व्यावहारिक आत्मविश्वास कसा येईल, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. एकूण काय, तर पालकांनी मुलांसाठी आर्थिक नियोजन करतानाच त्यांच्या आर्थिक जाणिवा समृद्ध करण्याचा विचारही केला पाहिजे.
आजीचा आणि आईच्या बालपणीचा काळ आजच्या पिढीला ऐकून नक्कीच माहिती असतो. साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची परिस्थिती विचारात घेतली, तर चुलत-आते-मामे-मावस भावंडे असली तरी त्यांची वापरलेली पुस्तके धाकट्यांना चालत होती. त्यानंतर ‘आम्ही दोघे, आमची दोन’ असा जमाना आला. या दोघांमध्ये अंतर जास्त असेल, तर अशी ‘सेकंड हॅंड’ पुस्तके वापरण्याचा प्रश्नच नव्हता. आजचा काळ आमचा एकुलता एक किंवा एकुलती एक असा आहे. त्यामुळे खेळणी, वस्तू या कशाचाही पुनर्वापर केला जातो, ही गोष्ट नव्या पिढीला माहिती असण्याचे कारण नाही. सगळे काही नवे कोरे! छान, छान! उत्तमोत्तम! बऱ्याच घरांमध्ये ‘मम्मा’च्या राजकुमारासाठी आणि पापाच्या परीसाठी खास ‘कस्टमाईज’ केलेल्या वस्तू आणल्या जातात, त्यालाही कोणाचा आक्षेप असणार नाही. प्रश्न आहे, तो या सर्व गोष्टींसाठी करायच्या आर्थिक तरतुदींचा! मुलाच्या वा मुलीच्या शिक्षणाचे आणि एकूणच त्यांच्या भविष्याचे आर्थिक नियोजन नेमके कसे करायचे, केव्हापासून करायचे, किती तरतूद करायची, अशा आणि या अनुषंगाने येणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखामधून करत आहे.