पुन:श्च ‘केवायसी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Account

पुन:श्च ‘केवायसी’

आपल्यापैकी बहुतेकांनी बँकेत खाते उघडताना किंवा त्यानंतर ‘केवायसी’ची पूर्तता केलेली असली, तरी आजकाल बँकेकडून वारंवार ‘केवायसी’ची पूर्तता करण्यासाठीच्या सूचना येत असतात. ठराविक कालावधीनंतर ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ही ‘री-केवायसी’ केली जाते.

बँकांना आपल्या ग्राहकांची उच्च जोखीम वर्ग, मध्यम जोखीम वर्ग आणि अल्प जोखीम वर्ग अशाप्रकारे वर्गवारी करावी लागते आणि ही वर्गवारी सबंधित खात्याशी निगडीत असलेल्या जोखमीनुसार केली जाते.

सर्वसाधारणपणे ज्यांचा व्यवसाय उच्च जोखमीशी निगडित आहे, असे सराफ, बांधकाम व्यावसायिक, राजकारण व चित्रपट क्षेत्राशी निगडित असणाऱ्या व्यक्तींचा समावेश या उच्च जोखीम वर्गात केला जातो,

तर छोटे विक्रेते, विविध वितरक, हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, सनदी लेखापाल यांचा समावेश मध्यम जोखीम वर्गात केला जातो. सरकारी किंवा मोठ्या कंपनीतील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, बँक, विमा कंपन्यातील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा समावेश अल्प जोखीम वर्गात केला जातो.

यातील उच्च जोखीम वर्गातील खातेधारकांची माहिती दर दोन वर्षांनी, मध्यम जोखीम खातेधारकांची दर आठ वर्षांनी, तर अल्प जोखीम खातेधारकांची दर दहा वर्षांनी माहिती अद्ययावत करणे आवश्यक असते. त्यानुसार बँका आपल्या ग्राहकांना ‘री-केवायसी’ची पूर्तता करावयास सांगत असतात.

याचा प्रमुख उद्देश दरम्यानच्या काळात ग्राहकाचा पत्ता, आर्थिक परिस्थिती, नाव (विशेषत: विवाहानंतर), व्यवसाय, नोकरी आदी बाबींमध्ये बदल झाला असेल, तर बँकांना ग्राहकाबाबतची ही सर्व अद्ययावत माहिती मिळणे आवश्‍यक असते,.कारण यामुळे मनी लॉंड्रींगसारख्या गैरप्रकारांना आळा घालता येऊ शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या सूचना

‘री-केवायसी’ची पूर्तता ग्राहकांना सहजपणे करता यावी. यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काही सूचना केल्या आहेत.

‘री-केवायसी’च्या पूर्ततेसाठी ग्राहकाने बँकेत समक्ष जाण्याची गरज नाही. त्यांच्या माहितीत काही बदल झाला नसेल, तर ‘बदल झालेला नाही’ असे स्वयंघोषित (सेल्फ डिक्लरेशन ) आपल्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरून ईमेल करून ‘री-केवायसी’ची पूर्तता करता येईल.

पत्त्यात किंवा नावात झालेला बदल सबंधित कागदपत्रे ईमेलवर अपलोड करून, सोबत सेल्फ डिक्लरेशन देऊन कळवता येईल. अशा पद्धतीने सेल्फ डिक्लरेशन केल्यानंतर, पुढील दोन महिन्याच्या आत बँकेकडून याची पडताळणी केली जाईल.

ग्राहकाला ‘री-केवायसी’ची पूर्तता आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरून ‘एसएमएस’ द्वारा किंवा नेट बँकिंगद्वारासुद्धा करता येईल.

काही अपवादात्मक परिस्थितीत, आपण दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे बँकेस शक्य होत नसेल किंवा काही शंका असेल, तर प्रत्यक्ष बोलाविले जाऊ शकते. आपल्या बँक खात्यावरील व्यवहार अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी ‘री-केवायसी’ची पूर्तता वेळेत करणे आवश्यक आहे. अन्यथा बँक आपले खाते गोठवू शकते; तसेच बंदसुद्धा करू शकते.

त्यामुळे आपल्याला बँकेकडून ‘री-केवायसी’बाबत फोन, एसएमएस किंवा ईमेल आल्यास त्वरित याबाबत पूर्तता करणे आपल्याच हिताचे आहे. यामुळे आपल्या बँक खात्यावरील व्यवहार सुरळीत चालू राहतील व आपल्या खात्याचा कोणी गैरवापर करू शकणार नाही.

लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- ‘सीएफपी’ आहेत.

सुधाकर कुलकर्णी