
AI Job: IMF च्या गीता गोपीनाथ यांनी AI बाबत दिला मोठा इशारा; म्हणाल्या, लोकांच्या नोकऱ्या...
AI Job Loss Fear: देशात आणि जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जोरात होत आहे. कंपन्यांचे लक्ष AI वर आहे. यातच भारतीय वंशाच्या सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आगामी काळात अनेक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर नियम बनवावेत, असे आवाहन त्यांनी धोरणकर्त्यांना केले आहे.
फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, गीता गोपीनाथ म्हणाल्या की, सरकार, संस्था आणि धोरणकर्त्यांनी नियम बनवण्याबरोबरच श्रम बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठी लवकरात लवकर तयारी सुरू करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
गीता गोपीनाथ यांनी धोरणकर्त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी मार्च 2023 मध्ये गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले होते की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 300 दशलक्ष नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
गेल्या वर्षी, PWC ने आपल्या वार्षिक ग्लोबल वर्कफोर्स सर्व्हेमध्ये म्हटले आहे की एक तृतीयांश लोकांना भीती आहे की पुढील तीन वर्षांत नवीन तंत्रज्ञान त्यांची जागा घेईल.
तंत्रज्ञानाशी संबंधित बर्याच कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या बदलण्याचा विचार करत आहेत. IBM च्या CEO ने नुकतेच सांगितले होते की कंपनी 7800 पदांच्या भरतीला रोखू शकते.
कारण त्यांची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्सन घेऊ शकते. ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता बँक कार्यालयातील कामकाजासारख्या मानवी संसाधनांची जागा घेऊ शकते.
गीता गोपीनाथ यांचे हे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, जे त्यांनी नुकत्याच अमेरिका दौऱ्यावर सिलिकॉन व्हॅली येथे एका कार्यक्रमात मत व्यक्त केले होते.
AI मुळे मोठ्या प्रमाणावर करोडो नोकऱ्या जातील असे मला वाटत नाही असे राहुल गांधी म्हणाले होते. त्याऐवजी, ही एक तांत्रिक क्रांती आहे, ज्यामुळे काही नोकऱ्यांऐवजी अनेक नवीन रोजगार निर्माण होतील.