Share Market: सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी पाण्यात; जाणून घ्या कारणे | Share Market Crash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market: सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी पाण्यात; जाणून घ्या कारणे

Share Market Crash : विदेशी बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर हा आठवडा देशांतर्गत शेअर बाजारासाठी निराशजनक होता. आठवड्यातील बहुतांश सत्रांमध्ये देशांतर्गत बाजारात केवळ घसरण दिसून आली.

त्यामुळे शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या सहा सत्रांमध्ये देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांचे 1.52 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

हा आठवडा असा गेला :

या आठवड्यात, पाच व्यापार दिवसांपैकी तीन दिवसांत देशांतर्गत बाजारात घसरण दिसून आली. या सप्ताहाची सुरुवात घसरणीने झाली. त्यानंतरचे दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार बाजार तेजीसह बंद झाला.

मात्र, गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केल्याने भारतासह जगभरातील बाजारपेठांवर नकारात्मक परिणाम झाला.

शुक्रवारी या शेअर्समध्ये तेजीची शक्यता होती :

स्टेट बँक ऑफ इंडिय (SBIN), बजाज ऑटो (BAJAJ-AUTO), कोटक बँक (KOTAKBANK), एचसीएल टेक (HCLTECH), एशियन पेन्ट्स (ASIANPAINT), पेज इंडिया (PAGEIND), ए यू बँक (AUBANK), गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP), आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB), भारत फोर्ज (BHARATFORG) शुक्रवारी या शेअर्समध्ये तेजीची शक्यता होती मात्र पैकी काही शेअर्समधेच तेजी दिसून आली.

तीन आठवड्यांपासून बाजारात दबाव :

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी घसरला आणि 57,500 अंकांच्या पातळीवर आला. त्याच वेळी, NSE निफ्टी 130 हून अधिक अंकांच्या नुकसानासह 17 हजार अंकांच्या पातळीच्या खाली घसरला.

देशांतर्गत शेअर बाजार गेल्या तीन आठवड्यांपासून दबावाखाली असून सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत आहे.

या गोष्टींचा परिणाम झाला :

या आठवड्यात बँकिंग संकट, अमेरिकेतील व्याजदरात वाढ यासारख्या बाह्य कारणांमुळे शेअर बाजारावर परिणाम झाला. अमेरिकन सेंट्रल बँकेने यावेळीही व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर अनेक बँका सध्याच्या संकटाच्या कचाट्यात आल्या आहेत. आशियाई आणि युरोपीय बाजारातील नरमाईचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला. देशांतर्गत पातळीवर मेटल, एनर्जी, रियल्टी, आयटी, बँकिंग आणि वित्तीय शेअर्सवर या आठवड्यात दबाव होता.

पुढील आठवडा कसा असेल :

पुढील आठवड्यातही बाह्य घटकांचा देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत पुढील आठवड्यात महत्त्वाची आर्थिक आकडेवारी समोर येणार आहे.

त्याचबरोबर बँकिंगचे संकट पुढे कोणते वळण घेते, याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. देशांतर्गत बाजारातील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या बाजाराच्या हालचालीवरही परिणाम होऊ शकतो.