

Global Energy Crisis
esakal
गौरव बोरा - gauravbora89@gmail.com
पश्चिम आशियातील सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच ‘आयएमएफ’ने इशारा दिला आहे, की गेल्या अनेक दशकांतील हा सर्वांत मोठा ‘ऑइल शॉक’ ठरू शकतो. जर संघर्ष आणखी लांबला आणि तेल पुरवठ्यातील अडथळे कायम राहिले, तर जगभरात मंदीचा धोका वाढू शकतो. पश्चिम आशियातील संघर्षाने पेटलेल्या कच्च्या तेलाच्या दरामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार का आणि सर्वसामान्यांचे बजेट यांवर परिणाम होणार का, या सध्याच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध.
श्चिम आशियातील वाढता संघर्ष आता केवळ भू-राजकीय प्रश्न राहिलेला नाही, तर तो जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट बनत आहे. विशेषतः इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जगातील तेल आणि गॅस पुरवठ्यावर अभूतपूर्व परिणाम झाला आहे. ही सामुद्रधुनी जगातील सर्वांत महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील जवळपास २५-३० टक्के कच्चे तेल आणि सुमारे २० टक्के ‘एलएनजी’ या मार्गाने वाहून नेला जातो. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इशारा दिला आहे, की गेल्या अनेक दशकांतील हा सर्वांत मोठा ‘ऑइल शॉक’ ठरू शकतो. हा संघर्ष आणखी लांबला आणि तेल पुरवठ्यातील अडथळे कायम राहिले, तर जगभरात मंदीचा धोका वाढू शकतो. महागाई वाढेल, ग्राहकखर्च कमी होईल, उद्योगांचे उत्पादन मंदावेल आणि अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.