भाष्य : जितके सजीव तितक्‍या बुद्धिमत्ता

bird
bird

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे काही क्‍लिष्ट, अवघड किंवा गूढ अजिबात नाही. त्यामागच्या बऱ्याच मूळ संकल्पना निसर्गातूनच आलेल्या आहेत. ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ हे जितके खरे आहे, तितकेच जितके सजीव तितक्‍या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात हेही सत्य आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना आपल्या रोजच्या जीवनातील बऱ्याच प्रणालींमध्ये वापरली जात आहे. तरीही तिच्याविषयीचे कुतूहल संपलेले नाही. ढोबळमानाने सांगायचे तर निसर्गातील बुद्धिमत्तेचे गणिती रूपांतर आणि पुढे कॉम्पुटर कोड बनवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये रूपांतर करून, विविध क्षेत्रांतील जटिल व क्‍लिष्ट समस्या सोडवणे हा याचा उद्देश.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साधारणपणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी ज्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर केला जातो, त्याचे तीन प्रकार आहेत. जीवशास्त्राशी संबंधित बुद्धिमत्ता, प्राण्यांचा व पक्ष्यांचा थवा बनवण्याची कार्यपद्धती व त्यामागील बुद्धिमत्ता आणि समाजजीवनातील चालीरीतींवर आधारित बुद्धिमत्ता.  निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या ‘समर्थांची अतिजीविता बलिष्ठः’ (Survival of the Fittest) या प्राण्यांच्या उत्क्रांतीसंबंधी तत्त्वाचे डॉ. जॉन हॉलंड यांनी गणिती रूपांतर करून जेनेटिक अल्गोरिदम बनवले. योग्य मादी/नर मिळवण्यासाठीची नर/मादींमधील स्पर्धा, मिलन झाल्यानंतर शुक्राणूंमधील स्पर्धा, ‘डीएनए’मधील पूरक घटकांचे संयोगीकरण आदी प्रक्रियांचे गणिती रूपांतर झाले आहे. जेनेटिक अल्गोरिदमचे विविध प्रकार विकसित करण्यात आले आहेत. त्यात अगदी सरोगसी, वर्ण आदींचेही गणिती रूपांतर झाले आहे. स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हवाई वाहतूक, लष्करी, दूरध्वनी यंत्रणा, शेअर बाजार अशा अनेक क्षेत्रांत जेनेटिक अल्गोरिदमचा वापर होतो आहे.  डॉ. कल्याणमय देब यांचे यात मोलाचे योगदान आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माशांची संरक्षणपद्धती 
आपण वटवाघुळांच्या, लांडग्यांच्या, व्हेल माशांच्या झुंडी, तसेच मुंग्यांच्या वसाहती प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर पहिल्या असतील. समुद्रातील माशांच्या झुंडीतील प्रत्येक मासा अन्न शोधत असतो. त्याला येणारा वास, तसेच आजूबाजूच्या माशांचे अन्नाबद्दलचे आकलन समजून घेऊन प्रत्येक मासा स्वतःची दिशा ठरवतो. अन्न शोधणे हाच सर्व माशांचा एक उद्देश असल्यामुळे ते आपोआपच ठराविक शैलीमध्ये प्रवास करू लागतात. या झुंडीच्या मानसिकतेमुळे अन्न मिळण्याची शक्‍यता तर वाढतेच; पण त्याचबरोबर संरक्षणही होते. प्रत्येक मासा आसपास फिरणाऱ्या भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करत असतो, ज्यात स्वतःचे आकलन, तसेच आजूबाजूच्या माशांचे संरक्षण करण्याची पद्धत समजून घेऊन प्रत्येक मासा स्वतःची पद्धत ठरवतो. ही पद्धत सर्वांना एका झुंडीत एकत्र ठेवते. अशी लाखो छोट्या माशांची मोठी झुंड ठराविक शैलीमध्ये फिरून मोठ्या भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण तर करतेच, पण त्यांना पिटाळूनसुद्धा लावते. पक्ष्यांचे थवे एका ठराविक त्रिकोणी रचनेत उडतात. हवेचा रोध कमी करण्याबरोबरच माशांप्रमाणे भक्ष्य शोधणे आणि भक्षकापासून बचाव करणे असे दोन्ही उद्देश त्यामुळे साध्य करता येतात. 

अमेरिकी समाज मानसिकतेचे अभ्यासक जेम्स केनेडी आणि अभियंता रसेल एबेरहार्ट यांनी या थव्यांचा अभ्यास करून त्याचे १९९५मध्ये गणिती, तसेच कॉम्पुटर कोडमध्ये रूपांतर केले. जगातील कित्येक विद्यापीठांत याचा पुढील अभ्यास चालू आहे. इतर कित्येक उपयोगांप्रमाणे माहितीचा अर्थ लावण्यासाठी, तसेच वर्गीकरणासाठी याचा उपयोग होत आहे. मधमाशी आणि त्यांनी फुलांतील मध शोधण्याचे कुतूहल सर्वांनाच असते. मधमाशा कित्येक किलोमीटर दूर जाऊन मध शोधत असतात. मधाच्या पोळ्यामध्ये राणी माशीव्यतिरिक्त कामकरी, प्रेक्षक आणि टेहळणी करणाऱ्या माशा असतात. कामकरी माशा मध शोधतात आणि पुन्हा पोळ्याजवळ येऊन नृत्य करू लागतात. त्यांनी शोधलेल्या मधाचे प्रमाण, गुणवत्ता यानुसार नृत्य बदलते. जेवढे मधाचे प्रमाण आणि गुणवत्ता चांगली, त्या प्रमाणात प्रेक्षक असलेल्या माशा या कामकरी माशा बनून तो मध गोळा करण्यासाठी विभागल्या जातात. या मधमाशांच्या सामूहिक समन्वय साधण्याच्या उपजत वृत्तीचा तुर्कस्तानमधील डेव्हिस कारबोगा यांनी सखोल अभ्यास करून २००५मध्ये त्याचे गणिती रूपांतर केले. 

बर्फातील लांडग्यांच्या कळपातील शिस्तबद्ध नियोजन हा कुतूहलाचा विषय आहे. तसेच त्यांच्या शिकारीची पद्धत हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी संशोधनाचा विषय ठरलेला आहे, ज्यात भक्ष्य शोधणे, पाठलाग करणे, जवळ पोचणे, घेरणे, हल्ले करणे, जेरबंद करणे आदी प्रकारांचे कॉम्पुटर कोड बनवले जातात. मुंग्यांच्या वसाहतींचे सर्वांना प्रचंड आकर्षण असते. मार्को डोरिगो या इटलीच्या शास्त्रज्ञाने १९९२मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संदर्भात मुंग्यांच्या अन्न शोधण्याच्या मेहनतीचे संशोधन गणिती स्वरूपात मांडले. प्रत्येक मुंगी सर्वप्रथम अन्नाचा सर्वत्र शोध घेऊ लागते. शोध घेताना फेरोमोन नावाचे रसायन ती सोडत असते. तिला अन्न मिळाल्यावर त्यातील लहान तुकडा घेऊन वारुळाकडे परत जाताना अन्नाची गुणवत्ता आणि प्रमाणानुसार ती फेरोमोन कमी जास्त प्रमाणात सोडते. अन्नाच्या शोधातील इतर मुंग्यांना हा फेरोमोनचा माग सापडतो, तेव्हा त्यासुद्धा त्या मागावरून अन्न गोळा करायला जातात आणि पहिल्या मुंगीप्रमाणेच फेरोमोन सोडतात. अशा प्रकारे विस्तीर्ण भागावर पसरलेल्या मुंग्या एका ठराविक मार्गावरून झुंडीने प्रवास करताना दिसतात. अन्न संपल्यावर त्या गायब झालेल्या दिसतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साथीच्या रोगांचा अंदाज  
अशाच प्रकारे मानवी समाजजीवनातील विविध संरचना, चालीरीती व व्यवस्थांमधील उत्क्रांती आणि  बुद्धिमत्तेचे गणिती रूपांतर व पुढे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स स्वरूपातील संशोधन वाढत आहे. खेळातील, राजकीय, तसेच युद्धातील स्पर्धा व चढाओढ या संदर्भातील संशोधन मुख्यतः भारत, इराण, अमेरिका, ऑस्ट्रेलियात होत आहे. फुटबॉल खेळातील चढाओढीशी संबंधित बुद्धिमत्तेवर इराणमधील डॉ. हुसेन यांचे उल्लेखनीय योगदान आहे. लीग पद्धतीत संघांमधील, तसेच संघातील खेळाडूंमधील सर्वोत्तम बनण्यासाठी लागलेल्या चढाओढीचे व गुणपद्धतीचे कॉम्पुटर कोड स्वरूप वापरून सर्वोत्तम उत्तर शोधता येते. याचप्रमाणे मी राजकीय पक्षांमधील, तसेच कार्यकर्त्यांमधील स्पर्धेवर संशोधन करून त्याचे गणिती रूपांतर व पुढे उपयोग करून विविध क्‍लिष्ट प्रश्न सोडवले आहेत. लहान मुलांच्या कुतूहलाचे, तसेच समाजात पुढे राहण्याच्या उपजत गुणांचा वापर करून बनवण्यात आलेले ‘कोहर्ट इंटेलिजन्स अल्गोरिदम’ हे उत्पादन क्षेत्र, मालवाहतूक, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांत आघाडी घेत आहे. या तंत्रांचा उपयोग ‘कोविड-१९’सारख्या साथीच्या संदर्भातील अंदाज बांधण्यात होऊ लागला आहे.आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे काही क्‍लिष्ट, अवघड वा गूढ नाही. त्यामागची मूळ संकल्पना आपल्या आसपासचे प्राणी व पक्ष्यांमधूनच आलेली आहे. वर मांडलेल्या काही ठराविक प्रातिनिधिक स्वरूपाच्या पद्धती आहेत. निसर्ग व त्यातील विविध जीवांचे, तसेच त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण, यातून त्यातील उपजत बुद्धिमत्तेचे अनेक पैलू दिसून येऊ शकतात. ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ हे जितके खरे आहे, तितकेच जितके सजीव तितक्‍या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात हेही सत्य आहे. गणित विषयाचे सर्वसामान्य ज्ञान मात्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी महत्त्वाचे असते. डोळे उघडे ठेऊन निसर्ग आणि त्यातील विविध पैलू अभ्यासले की बुद्धिमत्तेचा उलगडा आपोआप होऊ लागतो.
(लेखक सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com