संघर्षाकडून सहजीवनाकडे

संघर्षाकडून सहजीवनाकडे

वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये वणवा विझवणे, वन्य जीवांचे रक्षण, जंगलतोड थांबविणे यासाठीची उत्कृष्ट क्षमता असते. मात्र एखादा वन्य प्राणी सापळ्यात अडकला, विहिरीत पडला किंवा चुकून मानवी अधिवासात शिरला तर नेमके काय करायचे? यासाठीची कौशल्येही विकसित होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ‘भारतीय सर्पविज्ञान संस्था’ व राज्याच्या वनविभागातर्फे पाच वर्षे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे प्रारूप अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे. एकूणच अशा प्रयत्नांमागच्या विचाराची काही थेट अनुभवांच्या आधारे ओळख करून देण्याचा प्रयत्न.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खरे तर पुणे हे पेन्शनरांचे आणि सायकलींचे शहर म्हणून देशभरात ओळखले जात होते. पण पुढच्या काळात वेगाने झालेले औद्योगीकरण, लगतच्या भागांमध्ये झालेली जंगलतोड यामुळे पारंपरिक शेतजमीन आणि नैसर्गिक वनजमिनीवर अतिक्रमण झाले. वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले.

पारंपरिक शेतजमीन आणि नैसर्गिक वन जमिनीवर मानव अधिकार गाजवू लागला. पारंपरिक शेतीचा, माळरानांचा ऱ्हास झाला. विकासाच्या कामात आडवे आलेले डोंगर सपाट केले गेले. अधिवास संपुष्टात आल्याने खवले मांजर, उदमांजर, खोकड, कोल्हे, घोरपडी अशा अनेक वन्यप्राण्यांचे घर कायमचे हरवून गेले. पुढच्या काही काळात अशा आगंतुक वन्यप्राण्यांना सुरक्षित पकडून त्यांची नव्या,आता खूप दूरवर असलेल्या अधिवासात / निसर्गात सोडण्याची कामगिरी आमच्यावर आपसूकच आली, आम्ही ती पारही पाडली. हे काम वनविभागाच्या सहकार्याने अव्याहत चालू आहे. त्यासंबंधीचे आमचे अनुभव पुरेसे बोलके आहेत. 

पिलांची सुटका
पुणे शहरच्या परिसरातील नदीकिनारी वसलेल्या उपनगर आणि गावांमध्ये बिबट्याचे अस्तित्व आढळून येत आहे. चार वर्षांपूर्वी पुणे शहराच्या पूर्वेकडील पिंप्री सांडस या गावामध्ये ऊस तोडणी चालू असताना तेथील कामगारांना उसामध्ये बिबट्याची दोन गुटगुटीत पिल्ले आढळली. ट्रक-ट्रॅक्‍टरच्या आवाजाला घाबरून त्यांची आई त्यांना तिथे सोडून पळून गेली. याची माहिती मिळताच आमची टीम तेथे पोचली. त्या पिलांना आम्ही शेळीचे दूध आणि कोमट पाण्याचे विशिष्ठ प्रमाणात बनविलेले मिश्रण दिवसभरात चार ते पाच वेळा पाजले. या पिलांना परत त्यांच्या आईच्या हवाली करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पिलांना ते सकाळी उसाच्या शेतात ज्या ठिकाणी सापडले, त्याच ठिकाणी ठेवण्याचे ठरवले. हेतू हा, की  त्यांची आई येऊन पिलांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात घेऊन जाईल. पिलांना ठेवण्यापूर्वी आम्ही शेवटचे फिडिंग शेतातच करीत होतो. फिडिंग चालू असताना त्यांची आई आमच्यासमोर अवतरली आणि आम्हाला कोणतीही इजा किंवा दगाफटका न करता ती आपल्या पिलांना सुरक्षितपणे घेऊन गेली. आम्ही तिच्या पिलांची योग्य काळजी घेत आहोत, हे कदाचित तिच्यातल्या आईला जाणवले असावे.

तीन वर्षांपूर्वी एक नवा पाहुणा कोंढव्यातील NIBM संस्थेच्या आवारात अचानक स्वतःहून अवतरला आणि सर्वांचेच धाबे दणाणले. आमच्या टीमने अवघ्या अडीच तासात त्याला सुखरूप पकडले आणि त्याचदिवशी वनविभागाच्या आदेशानुसार त्याला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. 

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला मुंढवा परिसरातील केशवनगर भागात एका देखण्या तरुण बिबट्याच्या मादीने आपला तळ ठोकला. तिथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या एका हाऊसिंग सोसायटीच्या उंच इमारतीमधील एका सदनिकेत तिने आपले तात्पुरते बस्तान बसविले. मात्र दुसऱ्याच दिवशी आम्ही तिची तेथून सुटका केली आणि नव्या सुरक्षित अधिवासात तिची रवानगी करू शकलो. 

मादी-पिलांचे पुनर्मिलन
याच वर्षी २६ मार्चला पहाटे देहूरोडजवळच्या दारूम्ब्रे गावातील ऊस शेतीत बिबट्याची पिल्ले सापडली. वनाधिकारी, निलेश गराडे-रितेश साठे हे वन्यप्रेमी व आमच्या टीमने परिसरात मादीचा कसून शोध घेतला. जवळच्या दाट शेतीत ती दडली असल्याचा अंदाज आला. तोच परिसर असल्याने तीन मार्चला सापडलेली मादी आणि तिचीच पिल्ले आहेत, की कसे अशी शंका आली.

तार्किकदृष्ट्या विचार केल्यावर लक्षात आले, की तीन मार्च रोजी सापडलेल्या मादीच्या पिलांपैकी एक नर आणि एक मादी होती. यावेळची दोन्ही पिल्ले माद्या असून त्या वेळची त्यांची वाढ, वजने आणि आरोग्यमान यांचा अभ्यास केला असता,ही दुसरी मादी आणि तिची पिल्ले असल्याची खात्री पटली. आम्ही या पिल्लांचेही त्यांच्या आईबरोबर पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची आई त्यांना घेऊन गेली. एकाच महिन्यात दोन वेळा अशा दुर्मिळ घटना घडणे हे आश्‍चर्यच. 

गुड न्यूज ...! 
तीन मार्च २०२० या दिवशी देहू रोड जवळच्या सांगवडे गावातील सचिन राक्षे यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम चालू असताना तेथील मजुरांना बिबट्याची दोन पिल्ले दिसली. अत्यंत जबाबदारीने त्यांनी ऊस तोडीचे आर्थिक फायद्याचे काम थांबवून तत्परतेने वन विभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाकडून निरोप येताच तातडीने आमची टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली आणि तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले आणि सहाय्य्क वनसंरक्षक संजय मारणे यांच्यासमवेत पिलांची मातेशी पुनर्भेट करण्याचा निर्णय झाला . आमच्या पथकातील माझ्या सहकाऱ्यांनी त्यांचे दिवसभरात चारवेळा फिडींग केले आणि त्यांची वजनमापे नोंदविली. त्या दोन्ही पिलांचे वजन एक किलोपेक्षा काहीसे जास्त होते.

त्यावरून त्यांचे वय साधारणतः तीन आठवड्यांचे असल्याचे अनुमान आम्ही काढले. माझ्या अनुभवानुसार सूर्यास्तानंतर सुमारे ४० मिनिटांनी आम्ही पिलांना ते सापडल्याच्या ठिकाणी सुरक्षितपणे ठेवून दिले. कॅमेरा ट्रॅप सेट केला. दरम्यान आमच्यापासून १० ते १२ फूट अंतरावरून त्यांची आई आम्हाला न्याहाळत असल्याचे आमच्यापैकी एकाच्या लक्षात आले. आम्ही सर्व लोक तातडीने त्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर जाऊन ऑपरेशन demobilize केले. सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपलो. वन विभागाचे काही कर्मचारी मात्र त्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर पिलांच्या सुरक्षेसाठी तेथे थांबले होते. पहाटे वनरक्षक सौ. रेखा वाघमारे यांचा फोन आला. गुड न्यूज सर, बिबट्याची मादी तिच्या पिलांना घेऊन जंगलात निघून गेली...

सहजीवनाचे सूत्र
पुणे असो अथवा जुन्नर परिसर; अगदी अहमदनगर व बीड यासारख्या दुष्काळी जिल्ह्यातून वावरणाऱ्या बिबट्यांशी यापुढे संघर्ष न करता त्याच्याबरोबर सहजीवन शक्‍य आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण संस्था  डेहराडून येथील शास्त्रज्ञांची टीम जुन्नर येथील बिबट्याप्रवण क्षेत्रात, तर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही तरुण संशोधकांची टीम हा संघर्ष लोकशिक्षणातून आणि सहभागातून कमी कसा करता येईल यावर अभ्यास व प्रयत्न करीत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशांत सरकार, बिगरशासकीय संघटना, स्थानिक गावकरी यांनी एकत्र येऊन तळागाळात काम केले पाहिजे, असे मत मी आंतरराष्ट्रीय परिषदांत व्यक्त केले. त्यासंदर्भातही हे अनुभव महत्त्वाचे आहेत.  

पाच ते सहा वर्षांपूर्वी केरळमधील पेरियार अभयारण्यात अभ्यास दौऱ्यानिमित्त फिरत असताना पाच-सहा घरांची छोटी वस्ती दिसली. घराच्या पुढच्या भागात काही लहान मुले खेळत होती. दुपारची वेळ होती. वानरांचे आणि हरणांचे वनभोजन सुरु होते. तेवढ्यात वानरांनी धोक्‍याचा इशारा दिला. खेळणारी मुले घराकडे पळाली. हरणांनी कान टवकारून सावध भूमिका घेतली असावी. वस्तीच्या मागून बिबट्या मोकळ्या जागेवर आला. काहीवेळ तिथेच थांबला आणि शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेला. 

लेखात उल्लेख केलेल्या सर्व घटनामध्ये एक सूत्र दिसते ते असे की, मानव-बिबटया यांच्यातला संघर्ष टाळता येऊ शकतो. त्यानुसारच वन विभागाच्या सहकार्याने आयोजित कौशल्यवृध्दीच्या प्रशिक्षणात आम्ही वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना आता सहजीवनाचे महत्व पटवून देत आहोत आणि या प्रयत्नांना यश येत आहे.
(लेखक कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालय येथील अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com