भाष्य : रशियाने साधले तरी काय?

‘नाटो’ गटाने युक्रेनला हस्ते परहस्ते सहभागी करून घेतलेच; पण स्वीडन व फिनलंड या देशांनाही आपल्या कक्षेत सामावून घेतले.
vladimir putin
vladimir putinsakal
Summary

‘नाटो’ गटाने युक्रेनला हस्ते परहस्ते सहभागी करून घेतलेच; पण स्वीडन व फिनलंड या देशांनाही आपल्या कक्षेत सामावून घेतले.

‘नाटो’ गटाने युक्रेनला हस्ते परहस्ते सहभागी करून घेतलेच; पण स्वीडन व फिनलंड या देशांनाही आपल्या कक्षेत सामावून घेतले. जर्मनी व फ्रान्स हे देश रशियाकडून खनिज तेल मिळावे या आशेने युक्रेनपासून अंतर ठेवतील ही रशियन आशाही धुळीस मिळाली. पुतीन यांची गणिते चुकीची ठरली.

रशियन सेनेने युक्रेनवर हल्ला चढविला, या घटनेला यावर्षी २४ फेब्रुवारीस एक वर्ष पूर्ण होईल. युक्रेनने या हल्ल्याला आरंभापासून प्रभावी उत्तर दिले व अशा प्रतिकारामुळे रशियासारखा बलाढ्य देशही जेरीस आला हे वास्तव आहे. म्हणून तर व्लादिमिर पुतिन यांना युक्रेनशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली आहे. युक्रेन तर आरंभापासून चर्चाविमर्शास सिद्ध आहे; याचे कारण रशिया आपल्यापेक्षा अठरा पटींनी मोठा आहे; आपली लोकसंख्या चार कोटींच्या आतबाहेर तर रशियाची लोकसंख्या चौदा कोटींच्या घरात, या वस्तुस्थितीची जाणीव युक्रेनला आहे. रशिया अण्वस्रधारी आहे. रशियाला वाटत होते की या श्रेष्ठ देशाला आपण अल्पकाळात वठणीवर आणू; पण रशियाचे अंदाज साफ चुकले आहेत.

२०१४ मध्ये क्रिमिया घशात घालून रशियाने गेल्या दहा महिन्यात आणखी चार प्रदेश बळकावले आहेत. युक्रेनमधल्या इतर अनेक शहरांचे रुग्णालय व विद्यालयांचे इमले रशियाने उद्‌ध्वस्त केले. युक्रेनचे १३ हजार सैनिक व सात हजार नागरिक मरण पावले आहेत; ३५ लाख जीव बेघर झाले आहेत; १४ लाख इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. एकूण युक्रेनचे नुकसान १२७ अब्ज डॉलर झाले आहे. आश्‍चर्य वाटते ते या पृष्ठभूमीवरही जिद्दीने उभ्या असलेल्या व रशियालाच इशारे देणाऱ्या युक्रेनच्या शासकाचे व नागरिकांचे! युक्रेनचे अध्यक्ष वलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा करून कीव्हला परतल्यावर रशियाकडून दहा अपेक्षांची पूर्ती झाली पाहिजे, असा इशारा दिला आहे.

मुळात रशियाने युक्रेनच्या सार्वभौम प्रदेशातून काढता पाय घ्यावा, युक्रेनला म्हणून हजेरी लावावी इत्यादी अपेक्षा या झेलेन्स्कींनी केल्या आहेत. या व्यतिरिक्त युक्रेनच्या जंगल संपत्तीची रशियाकडून झालेली धूळधाण, रशियाकडून युक्रेनच्या इंधन व उर्जानिर्मिती केंद्राची झालेली मोडतोड आणि युक्रेनच्या धान्य निर्यातीत रशियानेच उत्पन्न केलेले अडथळे, या सर्व गुन्ह्यांबद्दलही रशियाने युक्रेनला भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. युक्रेनचे जे प्रदेश रशियाने बळकावले तिथे लढणाऱ्या युक्रेनियन सैनिकांना, तसेच तिथल्या नागरिकांनाही रशियाने तुरुंगात युद्धकैदी म्हणून डांबले आहे. असे सोळा लाख युद्धकैदी रशियाने युक्रेनला सुखरूप सुपूर्त करावेत, वगैरे मागण्यांचा विचार केला तर युक्रेनची जिद्द अजूनही ताजीतवानी आहे हे लक्षात येते.

युक्रेनने केलेले शक्तिप्रदर्शन

गेल्या दहा महिन्यात रशियाचेही नुकसान करण्यात युक्रेनने सक्रियता दाखवलेली दिसते. रशियाची अण्वस्रसज्ज युद्धनौका युक्रेनने काळ्या समुद्रात बुडवली आहे. रशियाने युक्रेनवर जी क्षेपणास्त्रे डागली त्यातली कैक अस्त्रे निष्प्रभ करण्यात युक्रेनला यश मिळाले आहे. रशियाचेही काही सैनिक युक्रेनने युद्धकैदी म्हणून स्वतःच्या तुरुंगात डांबले आहेत; पायलटरहित विमानांनी रशियावर हल्ले चढविण्यात युक्रेनने आगेकूच केली आहे. आपली राजधानी कीव्ह व कीव्हसारख्या इतर नगरी रशियन आक्रमणापासून मुक्त ठेवण्यातही युक्रेन सरकार सफल झाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रशियासारख्या बलाढ्य शत्रूशी दीर्घकाळ आपल्याला लढावे लागेल व म्हणून आपण हिंमत हरायची नाही, असे मनोबल लोकांमध्ये उत्पन्न करण्यात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

रशियाला स्वतःच्या स्वप्नांना कात्री लावावी लागली आहे. सन १९९२मध्ये सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर इतर चौदा राष्ट्रांप्रमाणेच रशियाही सार्वभौम व स्वतंत्र झाला. तेव्हापासूनच बिझन्टाईने ऑर्थाडिक्‍स पंथाचा सगळीकडे प्रसार करायचा. जुन्या झारकालीन रशियाचे जे अधिकार क्षेत्र होते ते तर मॉस्कोच्या अधिपत्याखाली आणायचेच; पण या क्षेत्राचा सतत विस्तार करीत रहायचे. अवघ्या युरोपात रशियाचा प्रभाव वाढवायचा व नव्या युरेशियन साम्राज्याची उभारणी करायची या स्वप्नाने पुतिन महोदयास प्रोत्साहित केले आहे.

अलेक्‍झांडर दुगिन नावाच्या रशियन विचारवंताला पुतीन यांनी गुरूस्थानी ठेवले आहे. विस्मयाची बाब म्हणजे रशियात मॉस्कोपासून काही अंतरावर द्रुतगतीने बॉम्बफेकी स्वयंचलित विमानातून बॉम्ब टाकून या दुगिन महाशयाला ठार मारण्याची खटपट युक्रेनने केली. दुगिन तेव्हा त्या हल्ल्यात बळी पडले नाहीत; पण त्यांची मुलगी मात्र मरण पावली. म्हणजे युक्रेनने केवढे बुद्धिचातुर्य व साहस सिद्ध केले आहे हे लक्षात घ्या! युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी रशियाने जॉर्जियाला युद्धात पराभूत केले होते. दूरच्या भूमध्यसमुद्रावर वर्चस्व मिळवून सीरियाच्या अध्यक्षाला बहार अल्‌ असदला संरक्षणाचे कवच पुरविले होते तेव्हा "युक्रेनला तर आपण अत्यल्प काळात शरण आणू, अवघा युक्रेनच रशियाच्या वर्चस्वाखाली आणू'', हे होते पुतीनसाहेबाचे स्वप्न.

आज रशिया म्हणत आहे, ‘‘सन २०१४ मध्ये आम्ही युक्रेनच्या क्रिमियाला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळवून दिला, तर सप्टेंबर २०२२मध्ये आम्ही युक्रेनमधला डोनेत्स्क, ल्युहान्स्क, खेर्सन आणि झपोरिझिया या प्रदेशांनाही अशाच हक्काचे स्वामी केले. तेव्हा या पाच प्रदेशांना रशियन अधिकारक्षेत्रात समाविष्ट करण्यास युक्रेनने होकार द्यावा. तसेच अमेरिकेच्या ‘नाटो’नामक लष्करी गटापासून स्वतःला अलिप्त राखावे, तरच आम्ही युद्ध तहकूब करू.’’

नामुष्कीची कारणे

सोव्हिएत संघ निर्माण झाला तो सन १९२२ मध्ये. तो कोसळल्यानंतर सन १९९१ मध्ये रशिया स्वतंत्र झाला, युक्रेनही स्वतंत्र झाला. पैकी रशियात तर अराजकच उत्पन्न झाले. व्लादिमिर पुतीन यांनी मात्र रशियात कायदा व सुव्यवस्था सुदृढ केली आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही रशियाचा दबदबा वाढविला. अशा पृष्ठभूमीवर युक्रेनला आपण सहज वठणीवर आणू ही होती पुतीन यांची घमेंड. प्रत्यक्षात ती त्यांना बाजूला ठेवावी लागली, याची कारणे सुस्पष्ट आहेत. एकतर इराक, अफगाणिस्तान या प्रश्‍नांवर पराभूत झालेली अमेरिका युक्रेनला सहकार्य देण्यास धजावणार नाही, हा रशियाचा अंदाज फसला. सन १९४९ मध्ये जन्माला आलेला ‘नाटो’ हा लष्करी गट युरोपातल्या तटस्थ राष्ट्रांना सदस्यत्व देणार नाही, ही रशियाची अटकळ खोटी ठरली.

युक्रेनला तर ‘नाटो’ गटाने हस्ते परहस्ते सहभागी करून घेतलेच; पण स्वीडन व फिनलंड या देशांनाही आपल्या कक्षेत सामावून घेतले. जर्मनी व फ्रान्स हे देश रशियाकडून खनिज तेल मिळावे या आशेने युक्रेनपासून अंतर ठेवतील ही रशियन आशाही धुळीस मिळाली. चीनकडून भरघोस सहाय्य मिळेल, भारत मौन बाळगेल ही पुतीन यांची अपेक्षाही चूक ठरली. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे झेलेन्स्की हा युक्रेनचा अध्यक्ष तालिबान्यांसमोर शरण गेलेल्या अफगाणी शासकांप्रमाणे रशियासमोर हार मान्य करील, हे पुतिनी स्वप्न तर हवेच विरले. रशिया- युक्रेन संघर्ष अधिक जटिल झाला आहे. मॉस्को व कीव्ह या दोन्ही राजधान्या एकमेकींशी टकरा देत आहेत. संघर्ष कसा व कधी मिटेल हे सांगता येत नाही, अशी सध्यातरी स्थिती आहे.

(लेखक ज्येष्ठ प्राध्यापक असून रशियातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com