esakal | ...योग तुझा घडावा!

बोलून बातमी शोधा

Sada-Dumbre}

‘साप्ताहिक सकाळ’चे संपादकपद भूषवलेले सदा डुंबरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांच्या मित्राने दिलेला उजाळा...

...योग तुझा घडावा!
sakal_logo
By
भानू काळे

‘साप्ताहिक सकाळ’चे संपादकपद भूषवलेले सदा डुंबरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांच्या मित्राने दिलेला उजाळा...

सदाचे २५ तारखेला झालेले निधन जितके क्‍लेशदायक होते, तितकेच धक्कादायक होते. नाशिकला एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले असताना कोरोनाची लागण झाली आणि पंधरा दिवसांतच सगळा खेळ आटोपला. रोज नियमित फिरायला जाणाऱ्या, टापटीप राहणाऱ्या, सतत कुठल्या ना कुठल्या उपक्रमात उत्साहाने सहभागी असलेल्या सदाचे असे एकाएकी जाणे काळजाला विलक्षण चटका लावून गेले.

आमची पहिली भेट नेमकी कधी झाली ते आता तितकेसे आठवत नाही; पण जवळजवळ पहिल्या-दुसऱ्या भेटीतच आम्ही एकमेकांना अरे-तुरे म्हणायला सुरुवात केली हे नक्की. त्याचा मनमोकळा स्वभाव मला भावला. सैन्यात नोकरी करणाऱ्या त्याच्या डॉक्‍टर पत्नी शुभांगीचाही इथे उल्लेख करायला हवा. कारण आमची मैत्री कौटुंबिक पातळीवरही रूजली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदाचे जन्मगाव ओतूर. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर तो ३१ जानेवारी १९७३ रोजी ‘सकाळ’मध्ये लागला. संपादक श्री. ग. मुणगेकर यांचे तेव्हाचे संस्कार त्याने कायम जपले. दोन ऑक्‍टोबर १९८७ रोजी ‘साप्ताहिक सकाळ’ सुरू झाले आणि त्यानंतर एका वर्षाने संपादक म्हणून सदाने त्याची सूत्रे हाती घेतली ती  २०१० मध्ये निवृत्त होईस्तोवर.

‘साप्ताहिक’ला वेगळी उंची
वृत्तपत्रे हा माध्यमांचा मुख्य प्रवाह मानला जातो; साप्ताहिक त्या तुलनेत कमी महत्त्वाचे. करिअर ऐन भरात असताना मुख्य प्रवाहापासून दूर जाणे हे अवमूल्यन न मानता सदाने स्वतःला नव्या जबाबदारीत पूर्णतः झोकून दिले. बघता बघता हे साप्ताहिक त्याने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यासाठी अनेक वेधक उपक्रम त्याने राबवले. वार्षिक कथास्पर्धा हा त्यांतला एक. दुसरा एक म्हणजे प्रदीर्घ लेखमाला. ‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापनदिनी दरवर्षी तो एखाद्या नामांकित वक्‍त्याचे व्याख्यान ठेवे. कायदेपंडित नानी पालखीवाला यांच्यापासून अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांच्यापर्यंत अनेक उत्तमोत्तम वक्ते त्यामुळे पुणेकरांना ऐकायला मिळाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खोलात जावून अभ्यास
सदाने अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले, पण फक्त ‘सकाळ’साठी. ‘३६ वर्षांत ‘सकाळ’ सोडून एक ओळ मी इतरत्र लिहिली नाही,’ असे तो म्हणाला होता. नियतकालिकांतील लेखन पुस्तकात समाविष्ट झाले नाही तर बहुतेकदा विस्मृतीत जाते. प्रासंगिकता हे त्याच्या वाचनीयतेचे एक मोठे कारण असते; पण या प्रासंगिकतेमुळेच त्या लेखनाला अल्पायुष्याचा शाप असतो. अर्थात काळाच्या ओघातही टिकून राहणारे काही लेखन असते. सदाच्या तशा लेखांची पुढे सहा पुस्तके निघाली. लेखविषयाचा सदा खोलात जाऊन अभ्यास करत असे. उदाहरणार्थ, कोल्हापूर ‘सकाळ’चा संपादक असताना निपाणीला झालेल्या तंबाखू आंदोलनाची त्याने खेड्यापाड्यात फिरून पाहणी केली होती. पुढे २५ सप्टेंबर २००९ रोजी अंतर्नाद मासिकाच्या शरद जोशी विशेषांकाचे प्रकाशन झाले त्यावेळी जोशी यांची विस्तृत मुलाखत त्याने घेतली होती. तिच्यामागे तो अभ्यास होता.

व्यासंगाप्रमाणे परखडपणा हाही सदाच्या लेखनाचा एक विशेष. उदाहरणार्थ, आपली मराठी भाषेविषयीची भूमिका मांडताना तो लिहितो, ‘आपल्यापुढचं आव्हान भाषिक नसून आर्थिक व सामाजिक आहे. दुबळ्या व कमकुवत समाजातील लोक कोणती भाषा बोलतात, याला काही अर्थ नसतो. भाषेची श्रीमंती समाजाच्या वैभवाशी जोडली आहे. तिला अभ्यासक्रमात घालून तिचं रक्षण होणार नाही. जगणं अधिक महत्त्वाचं आहे. कमकुवत, दुर्बल घटकांच्या दृष्टीने तर अधिकच. मराठीची किंमत चुकवून आयटी नको, असं म्हणत असताना जगण्याची किंमत देऊन भाषा नको, असं म्हणणारा एक मोठा वर्ग इथं आहे याचं भानही ठेवलं पाहिजे.’

‘सदा सर्वदा’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. त्यासाठी चौदा पानांची प्रस्तावना लिहायचा भाग्ययोग मला लाभला होता. तिच्यात शेवटी लिहिले होते, ‘डुंबरे यांच्या अनुभवविश्वाचा आवाका मोठा आहे. त्यामानाने त्यांच्या पुस्तकांची पाच ही संख्या कमीच म्हणावी लागेल. यापुढे मात्र स्वतःच्या स्वतंत्र लेखनासाठी त्यांनी अधिक सवड काढावी अशी एक प्रेमाची सूचना करावीशी वाटते.’ तसे लेखन त्याला करायचेही होते; पण दुर्दैवाने नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

मतभिन्नता तरीही मैत्री 
मुणगेकर यांच्याप्रमाणेच प्रभाकर पाध्ये यांचाही त्याच्यावर खूप प्रभाव होता. पाध्ये हे कौन्सिल फॉर कल्चरल फ्रीडम या उजव्या विचारांच्या जागतिक संस्थेचे भारतातील प्रमुख होते. त्यांचा दृष्टिकोन लिबरल म्हणता येईल असा होता. कदाचित त्यामुळे, ‘लेफ्ट ऑफ द सेंटर’ विचारसरणी असलेल्या सदाची भूमिका चर्चा करताना लिबरल विचारवंताचीच असे. त्यामुळे मतभिन्नता असूनही आमच्या चर्चांना कधी कटू वळण लागले नाही; मैत्रीत अंतर पडले नाही.

परिसरपासून मुक्तांगणपर्यंत अनेक विभिन्न संस्थांत तो सक्रीय होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र २०२५’ हे सूत्र घेऊन महाराष्ट्रातील पंधरा प्रमुख शहरांत २०१५ मध्ये चर्चासत्रे घडवून आणली गेली. या चर्चासत्रांची जबाबदारी त्यानेच निभवली. अलीकडच्या काळातील त्याचे हे एक महत्त्वाचे योगदान आहे.

त्याच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त, २२ जानेवारी २०१९ रोजी अरुण खोरे आणि इतर काही मित्रांनी त्याचा सत्कार केला होता. ‘‘सदा डुंबरे  - निमित्त नाबाद ७०’’ असे त्या कार्यक्रमाचे शीर्षक होते. त्या शीर्षकाशी सुसंगत असाच त्याचा उत्साह अगदी परवापरवापर्यंत होता. बरेच काही करायचे होते. म्हणूनच त्याचे अचानक जाणे जिवाला इतका चटका लावून गेले. अंपायरचा हात असा एकाएकी वर जाईल असे कधीच वाटले नव्हते.

Edited By - Prashant Patil