पेटी पॉलिटिक्‍स! (एक पत्रव्यवहार...)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 8 मे 2017

प्रिय मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांस मानाचा

मुजरा! आपल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळाच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून आंब्याची पेटी आपल्याला गेल्या आठवड्यात धाडली होती. आंबे कसे आहेत, ते कळवा, असा निरोपदेखील दिला होता. पण आपल्याकडून काहीच उत्तर नाही. काळजीपोटी पुन्हा हे पत्र लिहीत आहे. (खुलासा : यावेळी आंब्याची पेटी धाडलेली नाही!) लौकर कळवावे.

प्रिय मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांस मानाचा

मुजरा! आपल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळाच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून आंब्याची पेटी आपल्याला गेल्या आठवड्यात धाडली होती. आंबे कसे आहेत, ते कळवा, असा निरोपदेखील दिला होता. पण आपल्याकडून काहीच उत्तर नाही. काळजीपोटी पुन्हा हे पत्र लिहीत आहे. (खुलासा : यावेळी आंब्याची पेटी धाडलेली नाही!) लौकर कळवावे.

सध्या मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानात बिझी आहात असे कळले. चांगले आहे! मराठवाडा पाहण्यासारखा भाग आहे. हिंडून या. सर्वसाधारणत: या दिवसात आपल्याकडचे पुढारी परदेशात अभ्यास दौरे वगैरे काढतात. (आमची पुण्याची मंडळी आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बघायला गेली आहेत.) तुम्ही मराठवाड्यात गेलात, यावरून तुमची खरी कळकळ दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात मराठवाड्यात जायला छप्पन इंचाची छाती लागते. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे तुम्हीच खरे तारणहार आहात, याचा आणखी मोठा पुरावा कुठला हवा? नाही तर शेतकऱ्यांचे तारणहार म्हणवणारे ते महाराष्ट्राचे थोरले बारामतीकरसाहेब! महाबळेश्‍वरच्या डोंगरात पुस्तकांच्या गावात फिरायला गेले!! ते तिकडे पुस्तके धुंडत होते, तेव्हा तुम्ही मराठवाड्यातील शेती-शिवारातून फिरत होता!! मानले पाहिजे तुम्हाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची दुर्दशा मला इथे बसून कळते आहे. कर्जमाफी झालीच पाहिजे, असे विरोधक म्हणतात. तुम्ही म्हणता आणि मीही म्हणतो! या मुद्यावर सर्वांचे एकमत असताना भांडण कुठे आहे, तेच मला समजत नाही.

...आपल्यात पुन्हा दिलजमाई झाल्याने निश्‍चिंत होतो. तुम्ही दिल्लीला जाऊन आमच्या ‘साहेबां’कडे (नमो नम:) जेवून आलात, तेही कळले. तिथे तुम्ही छान छान बोललात, पण इथे परत आल्यावर ‘ये रे माझ्या मागल्या’, असेच झाले. ‘उत्तर प्रदेशात योगी सरकार, आणि आमच्या महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार’ अशी टीका तुम्ही केलीत. हृदयाला किती घरे पडली, याची तुम्हाला कल्पना नसेल. इतके का आम्ही ‘हे’ आहोत? असे काही कृपया बोलू नका, ही विनंती. कळावे.        - आपला मित्र. नाना.

ता. क. : आंब्याचा रिपोर्ट कळवा. चांगला देवगड हापूस होता. रस काढा! त्यात पायरी मिक्‍स करा. वर थोडेसे तूप आणि मिरपूड!! बघा, काय मजा येते ते!! असो. यंदा माझे बरेच आंबे खाऊन झाले. खूप पेट्या आल्या!! त्यातलीच एक तुम्हाला पाठवली आहे.

* * *
नानासाहेब-
हा काय चावटपणा आहे? आंब्याची पेटी मुळीच मिळालेली नाही. घरात सहा आंबे आहेत, ते मीच बांदऱ्याच्या मार्केटातून आणले आहेत. नॉन्सेन्स. तुमचे पत्र मिळाल्यावर मी घरात ताबडतोब चौकशी केली.- आंब्याची पेटी आली का? ‘नाही’ असे उत्तर मिळाले. सुभाषजी देसाई (मानेवरचा) घाम पुसत आले, तेव्हा त्यांनाही विचारले, काय हो, तुम्हाला आंब्याची पेटी आली का? त्यांनीही नकारार्थी मान हलवली. आपले सन्मित्र फक्‍त पत्र पाठवतात, पेटी मुळीच पाठवत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही कुणाला आंब्याची कोयसुद्धा पाठवलेली नाही. सगळ्या मंत्री-आमदारांना तसे पत्र मात्र मिळाले आहे. म्हंजे नुसतेच पत्र मिळाले आहे, आंब्यांचा पत्ता नाही!! याच कारभाराला मी निरुपयोगी म्हटले.

शेतकऱ्यांचीही तुमच्याबद्दल हीच तक्रार आहे. कर्जमुक्‍ती व्हायलाच हवी, असे म्हणालात, पण केली मात्र नाहीत. हे आंब्याच्या पेटीसारखेच झाले!! हा...हा...हा विश्‍वासघात आहे.
होय, मी तुमच्या वरिष्ठांबरोबर दिल्लीत जाऊन जेवलो. तिथे एक बोललो, इथे दुसरे असे म्हणण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक गावातला ऑडियन्स वेगळा असतो. तीच तीच गाणी ऐकवण्यात काहीही पॉइंट नसतो. तुम्ही एकेकाळी ऑर्केस्ट्रात गाणी म्हटली आहेत, म्हणून हे उदाहरण दिले. कळले?

आधी आंब्याची पेटी पाठवा, पत्रे पाठवली नाहीत तरी चालेल! पेटीच्या प्रतीक्षेत. उधोजी.

ता. क. : तुम्हाला आंबा बर्फी आवडते का? की फक्‍त संत्रा बर्फीच? कळवावे. आवडत असेल, तर शंभर ग्रॅम पाठवीन!

Web Title: British Nandi article about Mango and politics