Career in Gaming : गेमिंग क्षेत्रात आहेत करिअरच्या उत्तम संधी.. देशात पुणे ठरलं पहिल्या क्रमांकाचं शहर!

भारतात गेमिंग उद्योग वेगाने विकसित होत असून, त्यात करिअरच्या विविध प्रकारच्या संधी वेगवेगळ्या पातळ्यांवर उपलब्ध आहेत. लाखो लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या उद्योगात कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन अशा अनेकविध प्रकारांना खूप मोठे अवकाश आहे.
Gaming Industry
Gaming Industrysakal

Career options in Gaming : भारतातील गेमिंग उद्योगाने गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ अनुभवली आहे, मोजक्या लोकांचे वेळ घालवण्याचे साधन ते एक सांस्कृतिक वैशिष्ट्य असा प्रवास या उद्योगाने केला आहे. आर्थिक वर्ष २०२३मध्ये भारतात तब्बल १५.४ अब्ज गेम डाउनलोड्सची नोंद झाली.

जगभरातील गेम डाउनलोड्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावत भारत गेमिंग विश्वातील दिग्गज ठरला आहे. इंटरनेट कनेक्टिविटीतील प्रचंड वाढ, स्मार्टफोन्सचा प्रसार आणि ई-स्पोर्ट्सची वाढती लोकप्रियता या सर्व घटकांनी मिळून गेमिंग मुख्य प्रवाहात आणण्यास चालना दिली आहे. (Gaming in India)

अहवालांतील आकडेवारीनुसार, देशातील गेमिंगमध्ये आघाडीवरील राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; तर पुणे हे पहिल्या क्रमांकाचे ‘गेमिंग शहर’ ठरले (Pune Gaming City) आहे. या शहरांमध्ये आता मोठ्या ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग समारंभ आयोजित केले जातात. त्यांचे टीव्हीवरून आणि स्टार स्पोर्ट्स तसेच जिओ सिनेमासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारण केले जाते. त्याचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यामुळे मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहातील माध्यम म्हणून गेमिंगचे स्थान पक्के होत आहे. गेमिंग उद्योग वेगाने वाढत असल्यामुळे गेमिंगकडे केवळ छंद म्हणून बघण्याची पारंपरिक धारणा बदलत आहे. गेमिंगला वैध क्रीडाप्रकार आणि उद्योग म्हणून मान्यता मिळत आहे. एक व्यावसायिक ई-स्पोर्ट्स क्रीडापटू होण्यापासून ते गेमिंग कॉण्टेण्ट तयार करण्यापर्यंत अनेक करिअर संधींचा खजिना या उद्योगामध्ये आहे.

यासाठी समस्या निवारण आणि सांघिक कामापासून सर्जनशीलता व धोरणात्मक विचारापर्यंत अनेक प्रकारची कौशल्ये आवश्यक आहेत. जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून गेमिंग उद्योगात येत असलेल्या गुंतवणुकीच्या ओघामुळे या परिसंस्थेच्या वाढीला चालना मिळाली आहे. रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होत आहेत. अहवालांतील माहितीनुसार, गेमिंग उद्योगामध्ये २०२५पर्यंत अडीच लाख रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. विविध प्रकारच्या कौशल्य संचांना व आवडींना अनुकूल अशी रोजगारांची मोठी श्रेणी या उद्योगात तयार होणार आहे.

खेळाडूंपलीकडील ई-स्पोर्ट्स: गेमिंगमधील करिअर म्हणजे ई-स्पोर्ट्स क्रीडापटू होणे असे अनेकदा गृहीत धरले जात असले, तरी वास्तव त्याहून खूप वेगळे आहे. ई-स्पोर्ट्स कंपन्यांना त्यांचे संघ व कामकाज यांना पूरक कामे करण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक आवश्यक असतात. खेळाडूंच्या दैनंदिन उपक्रमांवर देखरेख ठेवण्यात संघ व्यवस्थापकांची भूमिका निर्णायक असते. प्रशिक्षक खेळाडूंना व्यूहरचनात्मक मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. (Career in E-Sport)

क्रिकेट सामना जिवंत करण्याचे काम जसे समालोचक करतात, तसेच ई-स्पोर्ट्स कास्टर्स स्पर्धांमधील वातावरणात चैतन्य आणतात, प्रेक्षकांचा गेम बघण्याचा अनुभव अधिक चांगला करतात. शिवाय, अन्य कोणत्याही क्रीडा समारंभाप्रमाणेच यातही सोहळा व्यवस्थापन (इव्हेण्ट मॅनेजमेंट), मार्केटिंग व प्रायोजकत्व यांसारख्या संधी आहेत. कारण, ई-स्पोर्ट्सचा आवाका व लोकप्रियता दोन्हीही वाढत आहेत.

विविध प्रकारच्या संधी

खेळाचा विकास : एखाद्या संकल्पनेचे रूपांतर खेळण्याजोग्या वास्तवात करणे हा गेम विकसित करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. गेम डेव्हलपर्स काही विषयांत निष्णात असतात. उदा. गेमप्ले प्रोग्रामिंग, ग्राफिक्स प्रोग्रामिंग, लेव्हल डिझाइन, कॅरेक्टर मॉडेलिंग, ऑडिओ इंजिनीअरिंग किंवा गेम इंजिन डेव्हलपमेंट यापैकी कोणत्या तरी क्षेत्रात ते कुशल असतात. आज भारतीय विषयवस्तू, कथा आणि व्यक्तिरेखांवर आधारित गेम्स तयार केले जात आहेत. भारतातील अनेक प्रतिभावंतांच्या सहभागातून हे खेळ तयार होताहेत. (Gaming careers)

गेम आर्ट डिझाइन : व्हिडिओ गेम्ससाठी दृश्य घटक तयार करण्याची प्रक्रिया गेम आर्ट डिझाइनमध्ये येते. यामध्ये व्यक्तिरेखा व वातावरणाच्या आरेखनापासून ते ॲनिमेशन व स्पेशल इफेक्ट्सपर्यंत सर्व येते. गेमचे रूप तसेच त्याबद्दलची जाणीव स्पष्ट स्वरूपात मांडणारे सौंदर्यपूर्ण दृश्य घटक निर्माण करण्याची जबाबदारी गेम कलावंतांवर असते. त्याद्वारे आभासी जगामध्ये प्राण ओतले जातात. खेळाडू अधिक समरसतेने खेळतात.

उत्पादन व्यवस्थापन : विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात उत्पादन व्यवस्थापकांची भूमिका निर्णायक असते. गेम्स बाजारपेठेच्या आवश्यकतांची पूर्तता करतील आणि खेळाडूंच्या अपेक्षांहून अधिक चांगली कामगिरी करतील, याची काळजी उत्पादन व्यवस्थापक घेतात. वापरकर्त्यांच्या अनुभवांविषयीचे तज्ज्ञ, वापरकर्त्यांचा सहभाग व समाधान यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने, इंटरफेस आणि गेमप्ले मेकॅनिक्स यांच्या अनुकूलनावर लक्ष केंद्रित करतात.

गेम मार्केटिंग : गेमिंगचे मुबलक पर्याय खेळाडूंचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे जागरूकता व सहभाग वाढवण्यासाठी प्रभावी मार्केटिंग अत्यावश्यक आहे. त्यातूनच गेम मार्केटिंग व्यावसायिकांना गेम्सचा प्रसार करण्याच्या तसेच प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या संधी मिळतात.

गेमिंग इन्फ्लुएन्सर्स : यांचे महत्त्व खूपच वाढले आहे. त्यांच्या डिजिटल उपस्थितीचा लाभ घेऊन वैविध्यपूर्ण वापरकर्त्यांशी जोडून घेतले जाऊ शकते. त्यातूनच गेमिंग संस्कृती आकाराला येते. खिळवून ठेवणारा कॉण्टेण्ट आणि ब्रॅण्ड्ससोबत धोरणात्मक सहयोग यांच्या माध्यमातून हे इन्फ्लुएन्सर्स मार्केटिंगच्या प्रयत्नांना प्रोत्साहनाची भूमिका बजावतात. तसेच यातून गेमिंग परिसंस्थेत समुदायाची भावना जोपासली जाते. देशभरातील खेळाडूंमध्ये यातून अर्थपूर्ण संबंध तयार होऊ शकतात.

समुदाय व्यवस्थापन : एक चैतन्यशील आणि समरस खेळाडू समुदाय जोपासण्यात समुदाय व्यवस्थापक मोठी भूमिका बजावतात. खेळाडू व विकासकांमधील संवादात ते मदत करतात, प्रतिक्रिया एकत्र करतात. सकारात्मक गेमिंग अनुभव निर्माण करण्यासाठी सोहळ्यांचे आयोजन करतात.

उद्योग क्षेत्रातून होणारी कुशल व्यावसायिकांची मागणी या क्षेत्रातील प्रतिभा विकसित करण्याची गरज अधोरेखित करते. रचनाबद्ध मेंटॉरशिपची गरज लक्षात घेऊन गेमिंग इन्क्युबेटरची मोठी गरज आहे. गेम विकसित करण्याच्या परिसंस्थेला यामुळे चालना मिळू शकते. महत्त्वाकांक्षी गेम डेव्हलपर्ससाठी असे कार्यक्रम अमूल्य संधी देतात.

उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांकडून शिकणे, प्रत्यक्ष अनुभव मिळवणे, ग्राहकांना आपलासा वाटेल असा ‘विनिंग गेम’ तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व संसाधनांची उपलब्धता ही संधींची काही उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे देशात ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहनासाठी तसेच त्यातील प्रतिभा जोपासण्यासाठी अनेक गेमिंग ब्रॅण्ड्स राज्य सरकारांशी सहयोग करत आहेत.

भारतातील गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या पर्यायांमुळे, गेमिंग व तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी, संधींचे जग खुले होत आहे. हा उद्योग सातत्यपूर्ण वाढ व नवोन्मेषासाठी सज्ज असल्यामुळे गेमिंगमध्ये करिअर करण्याची ही उत्तम वेळ आहे.

- अनुज सहानी

(लेखक क्राफ्टन इंडिया इन्क्युबेटर प्रोग्रामचे प्रमुख आणि भारतातील प्रसिद्धी सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com