सांस्कृतिक वारशाचा ‘चेन्नई कनेक्‍ट’

Modi-Xi-Jinping
Modi-Xi-Jinping

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याच्या काहीच दिवस आधी त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी जी चर्चा केली, त्यामुळे त्यांच्या भारतभेटीवर मळभ आल्याची प्रतिक्रिया लगेचच व्यक्त होऊ लागली होती. केवळ इम्रानच नव्हे, तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व आयएसआयचे प्रमुखही चीनच्या दौऱ्यावर होते व एकंदरीतच त्यांच्याबाबतीत चीनने जी भूमिका घेतली, ती भारताला दुखावणारी असल्याचा ‘राग’ धोरणतज्ज्ञ, सामरिक विश्‍लेषक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी आळवायला सुरवात केली. शी जिनपिंग यांचे हे वर्तन ‘वुहान स्पिरिट’ नष्ट करणारे आहे, त्यामुळेच ‘चेन्नई कनेक्‍ट’ही फोल ठरणार, असे सांगितले जाऊ लागले. भारताच्या धोरणात्मक समुदायातील बहुतेक तज्ज्ञ आणि देशाच्या प्रसारमाध्यमांतील टीका करणाऱ्या घटकाने अगदी सर्वोत्तम काळातही चीनशी मित्रत्व दाखविलेले नाही. त्यामुळेच या वेळीही त्यांनी एकमुखाने चीनच्या इराद्यांविषयी झोड उठविली असली तर आश्‍चर्य वाटायला नको. शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या या दोनदिवसीय परिषदेच्या शेवटी मोदी यांचे स्वत:चे मत मात्र नाट्यमयरीत्या अगदी उलट टोकाचे होते. ‘चेन्नई समिट’मुळे ‘भारत चीनमध्ये परस्परविश्‍वासावर आधारलेले सहकार्याचे नवयुग सुरू झाले आहे,’ असे मत मोदींनी व्यक्त केले.

भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठीही हा सर्वांत असंभवनीय राजनैतिक विजय साकारला तरी कुणी? तो साकारला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी. माओ त्से तुंगनंतरचे ते सर्वांत शक्तिशाली चिनी नेते आहेत. चिनी अध्यक्षांसमोर सर्वांत गुंतागुंतीच्या परकी धोरणांमध्ये भारताबरोबरचे नातेसंबंध सुधारण्याच्या धोरणाचाही समावेश आहे. परस्परांमधील विश्‍वासाच्या लक्षणीय अभावामुळे ते धोक्‍यात आलेले आहेत. तरीही, चीनला पाकिस्तानशी आपले पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध कमकुवत न करता भारताबरोबरचे नाते दृढ करायचे आहे. पाकिस्तानचा मित्र असणाऱ्या कोणत्याही देशावर भारताचा मित्रदेश म्हणून विश्‍वास ठेवता येत नाही, असा बहुसंख्य भारतीयांचा दृढ विश्‍वास आहे. त्याचप्रमाणे, पाकिस्तानलाही ही गोष्ट लागू होते. आपला पोलादी भाऊ असलेला चीन आपल्या शत्रूशी म्हणजे भारताशी जवळचे संबंध प्रस्थापित करू पाहतो, तेव्हा बहुसंख्य पाकिस्तानी नागरिकांमध्ये संशय, धास्ती निर्माण होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांनी अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत इम्रान खान आणि नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांची भेट घेतली. दोघांनाही मित्रत्वाची ग्वाही दिली. ही खरोखरच धाडसी कामगिरी आहे. त्याचप्रमाणे, इम्रान खान यांच्या तुलनेत मोदी यांच्याबरोबरच्या अनौपचारिक संवाद प्रक्रियेदरम्यान जिनपिंग अधिक आरामशीर, मैत्रीपूर्ण आणि अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होते. जिनपिंग यांच्या देहबोलीचे निरीक्षण करणाऱ्यांच्या लक्षात हे स्पष्टपणे आले असेल.

‘चेन्नई कनेक्‍ट’ ही केवळ ऐकायला छान वाटणारी राजनैतिक कल्पना नाही, तो तर जिनपिंग आणि मोदी यांच्यात नव्याने विकसित होणाऱ्या नात्याचा विश्‍वसनीय उच्चार आहे. मोदींनी या आपल्या सर्वांत मोठ्या शेजाऱ्याबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यात कौतुकास्पद परिपक्वता आणि कौशल्य दाखविले आहे, हे मोदींच्या टीकाकारांनाही मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे, मोदी संथ गतीने; पण स्थिरपणे द्विराष्ट्रीय नातेसंबंधात महत्त्वाचा धोरणात्मक आशय भरत आहेत. या कठीण कामामध्ये मोदींना काही समस्यांचा सामना करावा लागतोय. आपल्या गेल्या साडेपाच वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या धोरणात सातत्य ठेवले नाही. मोदींचा स्वत:चा राजकीय पायाही पाकिस्तानशी शत्रुत्वाचा आहे. या शत्रुत्वाने त्यांना पुन्हा सत्तेवर येण्यातही मोलाची मदत केली. त्यामुळे, पाकिस्तानला न सोडणाऱ्या चीनबरोबरचे आपले नाते अशा प्रकारे सुरू ठेवणे मोदींना सोपे नाही. तरीही, ते तो प्रयत्न करीत आहेत.

अलीकडच्या काळात जिनपिंगप्रमाणे इतर कोणत्या परदेशी नेत्याच्या भेटीने देशातील जनतेत रस निर्माण केला नाही, ही मात्र वस्तुस्थिती. चिनी महाशक्तीचे आजचे स्वरूप लक्षात घेतले, तर मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांशी समानपातळीवर चर्चा करण्याचे महत्त्व लक्षात येते. मोदी यांनी मित्रत्वाच्या समान भूमिकेतून जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. त्यातून आंतरराष्ट्रीय समुदायालाही संदेश दिला. काश्‍मीरचा संदर्भ न निघाल्यामुळेही भारतीयांसाठी ‘चेन्नई कनेक्‍ट’ महत्त्वाची ठरली. मात्र, भारत आणि चीन यांच्यात दहशतवाद, धार्मिक कट्टरतावादावर एकमत झालेले नाही. जिनपिंग यांनी इम्रान खान, बाजवांशी या विषयावर चर्चा केली असण्याची शक्‍यता असून, त्यांनी मोदींनाही याविषयी कल्पना दिली असेल. चीनलाही दहशतवादाचा धोका असल्याने त्याबद्दल ‘सॉफ्ट कॉर्नर’ नसेल. पाकिस्तानही दहशतवादाचा मोठा बळी ठरला आहे. त्यामुळे तिन्ही देशांमध्ये विधायक चर्चेचे व्यासपीठ तयार झाले आहे. मी तिन्ही देशांच्या नेत्यांना परस्परसंवाद साधण्याची सूचना केली आहे. या तीन देशांनी ट्रॅक-दोन आणि ट्रॅक १.५ या पातळीवरील चर्चा सुरूच ठेवावी. त्याची परिणती ट्रॅक वनमध्ये व्हायला हवी. ट्रॅक वन याचा अर्थ या तीनही देशांतील शिखर परिषद.

मोदींनी जिनपिंग यांना प्राचीन महाबलिपूरममध्ये बोलावल्याचाही भारतीय जनतेवर मोठा प्रभाव पडला. भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील या प्राचीन मंदिराचे दृश्‍य अनोखे आणि सुंदर होते. हे आकर्षक नेपथ्य लाभलेल्या या भेटीकडे भारतीय जनता औत्सुक्‍याने पाहत होती. अनेक पत्रकार याकडे एक दिखाऊ प्रयत्न या दृष्टिकोनातून पाहत होते. मात्र, सर्वसामान्य जनता आणि खुद्द चीनचे अध्यक्ष या ठिकाणच्या हिंदू मंदिरांची भव्यता, भारतीय संस्कृतीचे आणि महाकाव्याचे दर्शन, यामुळे भारावून गेले. अशाप्रकारचे नेपथ्य लाभलेली भेट खरोखरच अविस्मरणीय होती. याशिवाय, भारत आणि चीनमधील प्राचीन काळातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सेतूवरही प्रकाशझोत पडला. जिनपिंग यांना त्याची बऱ्यापैकी जाणीव असल्याचेही लक्षात आले. भारत व चीन यांच्यातील सांस्कृतिक साधर्म्य यानिमित्ताने अधोरेखित झाले. सांस्कृतिक जवळीक यानिमित्ताने प्रतीत झाली. फुजिआन या चीनमधील प्रांताचे तमिळनाडूशी ऐतिहासिक-सांस्कृतिक बंध आहेत. चीनमधील क्वांग्झू प्रांतातील सर्वांत मोठ्या क्‍युआन मंदिरात शिव, कृष्ण आणि नरसिंहाच्या प्रतिमाही आहेत. मोदींनी महाबलिपूरममधील मंदिराची वास्तुशैली जिनपिंग यांना दाखवली.

जिनपिंग यांनी क्वांग्झू प्रांतातील मंदिराचा उल्लेखही केला. क्वांग्झू सागरी संग्रहालय भारत आणि चीनमधील प्राचीन इस्लामिक संबंधांचा ठोस पुरावा आहे. भारत आणि चीनमधील संबंधांना २०२० मध्ये ७० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दोन्ही पंतप्रधानांनी जहाजावर जलप्रवासादरम्यान बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आशियातील या दोन महान संस्कृतीतील ऐतिहासिक सलोख्याचाही पाठपुरावा होईल. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या या प्राचीन संस्कृतीच्या विस्मृतीत गेलेल्या ज्ञानाचे पुनरुज्जीवन हा ‘चेन्नई कनेक्‍ट’चा अविभाज्य भाग बनला. भारत आणि चीनमधील घनिष्ठ ऋणानुबंधासाठी जिनपिंग यांचा आगामी शंभर वर्षांच्या नियोजनाचा प्रस्ताव, दोन्ही देशांनी महान संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्रित काम करणे, ही ‘चेन्नई कनेक्‍ट’ची ठळक वैशिष्ट्ये होत. दोन्ही देशांमध्ये व्यापारतूट, सीमावाद आदी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. चीनचे पाकिस्तानबरोबरचे संबंध हा दोन्ही देशांमधील मतभेदांचा एक ठळक मुद्दा आहे. मात्र, आपण आपल्या सांस्कृतिक इतिहासातून आपल्यापर्यंत आलेले शहाणपण आत्मसात केले, तर यातून नक्की मार्ग काढू शकू. तसे झाल्यास त्यात सर्वांचाच लाभ आहे. तसे झाल्यास हे जग सुंदर करण्याच्या प्रयत्नांत भारत व चीनने टाकलेली ती मोलाची भर असेल. 

(अनुवाद - मयूर जितकर)
(लेखक भारत-चीन-पाकिस्तान संबंध दृढ करू पाहणाऱ्या ‘फोरम फॉर अ न्यू साउथ एशिया’चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com