चरखा! (ढिंग टांग)

चरखा! (ढिंग टांग)

‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ ह्या उक्‍तीचे जिवंत उदाहरण पाहावयाचे असेल, तर मजकुरासोबत (हरहमेश) येणारे आमचे चित्र पाहून ठेवावे. आमची दिनचर्या ऐकलीत, तर असा माणूस होणे नाही, असेच तुम्ही म्हणाल!! कां की नेमस्त आहार, नेमस्त विहार, आणि नेमस्त विचार ह्यांचा अंगीकार करून गेली कैक वर्षे आम्ही नेमस्त व्रतस्थ जीवन कंठीत आहो! नव्या युगातील सर्वांत साधा मनुष्य म्हणून आमची ख्याती सर्वदूर पोचत असताना खादीच्या क्‍यालिंडरावर भलभलते मॉडेल लोक दिसू लागल्याने आम्ही मनातून मॉडून पडलो आहो!! अहह!! काय ही मूल्यांची पायमल्ली? किती ही मूल्यांची विटंबना? 

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. पैकी वसुधैव कुटुंबकम हे सुभाषित तोंडपाठ असल्याने आम्ही निवाऱ्याचा प्रश्‍न सोडवला आहे. वस्त्राचे म्हणाल तर आम्ही ते पेहनावेच, असे जनमत दिसून येत्ये. अन्नाचा प्रश्‍न मात्र आम्ही पोटतिडिकेने सोडवीत असतो.

...सकाळी पाच- सहा खजूर आणि भरपूर दूध घातलेला चहा असे माफक सेवन झाल्यावर आम्ही पोहे, शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा ह्यापैकी कुठलाही एक पदार्थ न्याहरीपोटी ग्रहण करितो. प्रात:समयीचा चहा (खजूर इंक्‍लुडेड) आणि वरील पदार्थांच्या मध्ये एका मारी बिस्कुटाच्या पुड्यापलीकडे मुखात अन्नाचा कण आम्ही घेत नाही. संयम पाळतो. ह्या काळात आम्ही सूत काततो. टकळी हे आमचे शस्त्र आहे!!

सूत कातण्याबरोबरच सूत जमविण्याकडेही आमचा थोडका कल असल्याने त्याही दिशेने आमचे अथक प्रयत्न चालू असतात. सूत जमविण्याचे प्रयत्न ही सोपी गोष्ट नव्हे. प्रसंगी कुत्र्यासारखा मारदिखील खावा लागतो. बालपणी ‘शेजाऱ्यांवर प्रेम करा’ अशी शिकवण आम्हाला मिळाल्याने आम्ही हीच बाब वेगळ्या पद्धतीने आमच्या शेजारील बिऱ्हाडातील कु. बेबीनंदा ईच्या कानावर घातली. परिणामी, तिच्या तामसी वृत्तीच्या जन्मदात्याने आम्हाला महिनाभर मांडी घालून बसता येणार नाही, अशी तजवीज केली. आजही थंडीच्या दिवसांत मागील बाजूस दुखरेपण जाणवत्ये व कु. बेबीनंदा ईचे स्मरण होत्ये. असो.

मित्र जोडावेत, हा संस्कार बालपणापासूनच रुजल्याने मारी बिस्कुटांच्या बदल्यात आम्ही कधीमधी प्रात:समयी मित्रांसमवेत मिसळपावाचा आनंद लुटतो. मिसळपाव हा एकट्याने खावयाचा का पदार्थ आहे? तो का कुटुंबासमवेत (धड) खाता येतो? तेथे दोस्तदारच हवेत. अर्थात, क्‍वचित प्रसंगी खिमापाव अथवा पायासूप अथवा साधेसे आमलेट (बिगर कांदा) देखील आम्हांस पुरत्ये. खिमा प्याटिस असेल तर आम्ही मिसळपाव निग्रहाने दूर सारून आधी प्याटिस सेवन करितो. मग मिसळपाव!! एवढे झाल्यावर आम्ही घरी येऊन कुटुंबीयांसमवेत न्याहारी करितो. त्यानंतर मात्र दोपारी माफक असे भोजन होईपर्यंत लंघन करणे श्रेयस्कर असते.

थोडक्‍यात, आम्ही दिवसभर चरत आणि खात असतो, हे सुज्ञ वाचकांना एव्हापावेतों कळाले असेल! दोपारी भोजनोत्तर तीन-चार तास आमचे रिक्‍त पोटानिशीच जात असतात. कां की ह्या काळात आम्ही तीन-चार तासांची एक चिमुकली वामकुक्षी घेतो. पांचेक वाजेपर्यंत नाक्‍यावरील भय्याने कढईत भजी सोडल्याचा वास दर्वळला की आम्ही तटकन उठून बसतो. 

सायंकाळी सातनंतर मात्र आमच्या तळहाताला आपापत: गिलासाचा आकार येऊ लागतो. दोन गल्ल्या सोडून असलेल्या प्रो. विजूअण्णा शेट्टी ह्यांच्या मधुमंदिरात आम्ही नेमस्त पेयपान आणि काही थोडी चणाडाळ, चकली टुकडा, पापड-चटणी असे पदार्थ उष्टावितो. टकळी चालविण्यासाठी विजूअण्णाच्या मधुमंदिराइतकी चांगली जागा दुसरी नसेल. 

टकळी चला चला के आम्ही इतके दिवस रेटले. मध्यंतरी आमच्या काही हितचिंतकांनी सुचविले की, टकळी हे माध्यम आता आपल्यासाठी तोकडे पडत्ये. चरखा ही वस्तू आपल्यासाठी आत्यंतिक उपयुक्‍त आणि अधिक प्रतीकात्मक अशी आहे.  

सतत चरणे आणि खाणे ह्या क्रियांमध्ये अहर्निश बुडालेल्या मनुष्यप्राण्याला ‘चर-खा’च योग्य. परिणामी, आम्ही टकळी सोडून चरखा जवळ केला आहे...

आता तरी आम्हांस क्‍यालिंडरावर स्थान मिळेल ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com