दिया और तुफान! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सर्व मंत्री आणि सहकाऱ्यांसाठी-

सर्व मंत्री आणि सहकाऱ्यांसाठी-
आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक आणि दैवत श्रीश्रीश्री नमोजी ह्यांच्या आदेशानुसार सर्वांनी आपापल्या मोटारींवरील लाल दिवे उखडून टाकले असतील, असा मला विश्‍वास वाटतो. आपल्या सर्वांचे लाडके, तरुण, हसतमुख आणि हुशार मुख्यमंत्री जे की मा. श्री. नानासाहेब फडणवीस ह्यांनी स्वत: एक मेपर्यंत न थांबता काल पुण्यातच आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकला. दिल्लीत मा. गडकरीसाहेबांनी आपल्या गाडीवरील दिवा काढल्याचे कळल्याबरोब्बर तेसुद्धा विनाविलंब गाडीच्या टपावर चढले!! ह्याला म्हणतात, वेगवान निर्णय!! त्या लाल दिव्याचे काय करायचे, अशी विचारणाही काही सहकाऱ्यांनी केली असता त्यांनी ‘‘माझ्यापुरते सांगतो. ‘वर्षा’ बंगल्याच्या माळ्यावर काही शोधाशोध करण्यासाठी यापुढे त्याचा वापर होईल.’’ अशी माहिती दिली.

बाकी आपणां सर्वांच्या सहकार्याबद्दल शतप्रतिशत अभिनंदन. देव तुमचे भले करो! काही जणांनी मात्र ह्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्‍त केली आहे. पण लाल दिव्याच्या गाडीला लोक घाबरत नाहीत, पण (उलट) संतापतात, असे निदर्शनास आल्यानेच वरील क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. लाल दिव्याच्या गाडीला काचा असतात. त्या काचा खाली केल्या की लोक मंत्र्यांबद्दल काय काय बोलतात, हे ऐकले तर एखादा मंत्री लाल दिवाच काय, गाडीचे टायरसुद्धा काढून घेईल, यात शंका नाही. तेव्हा गैरसमज नसावा. तथापि, गाडीवरील लाल दिवा काढून भागणार नसून, आणखी काही पावले भविष्यात उचलली जाणार आहेत. त्यासाठीही तयार राहावे, असे सर्व मंत्री सहकाऱ्यांना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन आहे. त्यापैकी काहींची यादी येथे देत आहोत. लाल दिवा गेल्यानंतर मंत्र्यांनी कसे वागावे, ह्याची ही एकप्रकारे आचारसंहिताच मानली जावी. वाचा.

१) मंत्री हा जनतेचा सेवक असतो. त्याने सेवकासारखेच राहावे. मंत्र्याला युनिफॉर्म देण्याचाही प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन असल्याचे समजते. सावध राहावे!

२) ‘आज आमचा लाल दिवा गेला, उद्या खुर्ची काढून घ्याल. मग बसायला आम्ही स्टूल घ्यायचे का?’ असा (काळीज फोडणारा) प्रश्‍न एका मंत्र्याने केला. त्यांना आमचे इतकेच सांगणे आहे की ‘आगे आगे देखिए, होता है क्‍या!’

३) लाल दिवा हे सत्तेचे प्रतीक नसून भलत्याच गोष्टीचे प्रतीक मानले जाते, ह्याचे भान ठेवावे व लाल दिव्याचा नाद सोडावा!!

४) गाडीतील इंधन संपल्यानंतर इंडिकेटरवर एक रेड लाइट लागतो. तो कृपया काढून टाकू नये.

५) गाडीवरील लाल दिवा आता कायमचा गेला आहे, पण तसल्या रंगाचे एक स्टिकर बाजारात मिळते. हौशी लोक तेच गाडीला लावून फिरतात. मंत्र्यांना असले स्टिकर लावण्यासाठी सक्‍त मनाई आहे.

६) लाल दिव्याच्या गाडीला हूटर असतो. भाँ भाँ भोंगा लावून मंत्र्यांची गाडी जाते. लाल दिवा गेल्यावर हा भोंगाही जाणार आहे, ह्याची नोंद घ्यावी.

७) भोंगा गेला असला तरी मंत्र्याने (काच खाली करून) तोंडाने भाँ भाँ असे आवाज काढून गर्दीत हलकल्लोळ माजवू नये. 

८) लाल दिवा आणि भोंगा दोन्ही गायब झाले असले, तरी मंत्र्यांच्या गाडीला ‘नो पार्किंग’मध्ये गाडी उभी करण्यास मुभा आहे, असा भलता गैरसमज करून घेऊ नये. ‘नो पार्किंग’मध्ये गाडी आढळल्यास टोचन लावण्यात येईल.

९) डोक्‍यावर लाल दिवा लावण्यासही सक्‍त मनाई आहे. तुम्ही मंत्री आहात, ईएनटी डॉक्‍टर नाही, ह्याचे भान कृपया ठेवावे.

१०) गाडीवरील दिव्याचे वेड असलेल्या एका मंत्र्याने आपली मोटार बदलून अँब्युलन्सने प्रवास करण्याचे ठरवल्याचे कानावर आले आहे. अँब्युलन्समधून फिरायची एवढीच हौस असेल, तर लाल दिव्याच्या गाडीतून शेतकरीबहुल गावामध्ये जाऊन दाखवावे!! असो. समझनेवालों को इशारा काफी है!!

...वरील सूचनांचे पालन व्हावे, ही अपेक्षा आहे. ‘ये कहानी है दिये की तूफान की’ हे गाणे अधूनमधून आठवत राहावे. अन्यथा...असो. 

Web Title: Dhing tang