पांच सवाल! (ढिंग टांग)

पांच सवाल! (ढिंग टांग)

मित्रों, पन्नास दिवसांच्या कडकडीत नोटाबंदीच्या व्रताची सांगता झाल्यानंतर आमचे लाडके युवा नेते श्रीमान राहुलजी गांधी ह्यांनी प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांना पाच जबर्दस्त प्रश्‍न विचारले आहेत. दुसऱ्याला प्रश्‍न विचारून निरुत्तर करण्यामध्ये रा. राहुलजी ह्यांचा हात कोणीही धरणार नाही. प्रश्‍न बिनतोड आहेत. त्या प्रश्‍नांची उत्तरे न दिल्यास नमोजी ह्यांच्या डोक्‍याची शंभर शकले होऊन त्यांच्याच पायाशी लोळू लागण्याची शक्‍यता दाट आहे. ही शक्‍यता गृहित धरून श्रीमान नमोजींना वाचविण्यासाठी त्यांच्या वतीने आम्हीच (घाईघाईने) ह्या सवालांची उत्तरे देत आहो.  

सवाल पहिला : नोटाबंदीच्या दोन महिने आधी किती लोकांनी २५ लाखांपेक्षा अधिक पैसा बॅंकांमध्ये जमा केला?

उत्तर - बाप रे बाप! आ कोई सवाल छे के? ह्याचेच उत्तर देण्यासाठी मी तीन वेळा संसदेत येऊन गेलो. पण मला बोलू दिले गेले नाही. शेवटी मी नादच सोडला! नेमके उत्तर : तीन हजार पाचशे त्रेचाळीस! हा आकडा बरोब्बर दोन महिने आधीचा आहे. नंतरचा आकडा माझ्याकडे ज्यास्त डिटेलवार आहे. पण तुम्ही त्याबद्दल प्रश्‍न विचारलेला नाही. सकोच्चा!!  

सवाल दुसरा : नोटाबंदीचा निर्णय कोणाशी सल्लामसलत करून घेण्यात आला?
उत्तर : स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने मी हाती धरूनी झाडू बरीच साफसफाई केली. उघड्यावर स्वच्छता उरकणाऱ्यांना चाप बसावा, म्हणून लोटाबंदी केली. लोक म्हणाले, अगं आईग्गं, लोटाबंदी कशाला? हा अन्याय आहे. आमच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. (प्लीज नोट! अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर पाणी!!) मग लोटा मागे सारून मी नोटाबंदी करायचे ठरवले. ॲक्‍चुअली मी तेव्हा डझनभर तज्ज्ञ लोकांशी बोललो. सहा जणांनी सांगितले की नोटाबंदी करा. सहा जणांनी ठामपणाने सांगितले की नोटाबंदी अजिबात नको. टाय झाली!! मग मी टॉस केला. काटा आला तर नोटाबंदी, छापा आला तर नोटाबंदी नाही!! काटा आला, हे सगळ्यांनी पाहिले आहे. पन्नास दिवसांनंतरही तो काटा गेलेला नाही. छापा आला, पण तो नोटाबंदीनंतर...कछु सांभळ्यो? 

सवाल तिसरा : स्वत:च्या कष्टाचे पैसे काढण्यासाठी ब्यांकेच्या रांगेत उभे असलेल्या किती लोकांचा जीव गेला?
उत्तर : एकही नाही! स्वकष्टाचे पैसे ही संकल्पनाच मुळात काल्पनिक आहे. ‘करा कष्ट, व्हा नष्ट’ अशी आपल्याकडे म्हणच आहे. आपल्याला मिळणारे पैसे हे आपकमाईचे क्‍वचित असतात, सारे काही बापकमाईवर चालते, हा आजवरचा अनुभव आहे, हे मी तुम्हाला काय सांगावे? रांगेत उभे असणाऱ्या काही लोकांचा बळी ते रांगेत होते म्हणून गेलेला नसून त्या वेळी मृत्यूने त्यांना रांगेत गाठले, म्हणून गेला! एटीएममधून दोन हजाराची नोट

भस्सकन निघाल्यानेही काही लोकांचा बळी गेला, असे ऐकिवात आहे. त्याचे काय?
सवाल चौथा : रांगेत जीव गेलेल्यांना भरपाई देणार का? किती?
उत्तर : खरे तर नाही! अगदीच निकड असेल तर कर्ज मिळेल. पण ते व्यक्‍तिश: येऊन सही करून घेऊन जावेत! ‘उचल’ आधीच मिळालेली आहे!! ओके?

सवाल पाचवा : नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी दिला आहे. नोटाबंदी लादून जनतेचे आर्थिक स्वातंत्र्य का हिरावले?
उत्तर : उजळ माथ्याने उधारी करता येणे, खणखणीत आवाजात हातउसने पैसे मागणे, खिशात दमडा नसताना आत्ताच विमानातून उतरल्यासारखे बिनधास्त हिंडणे, ब्यांकेत जायचे आहे, हे कारण सांगून भरपगारी दांड्या मारणे, विम्यापासून स्कूटरपर्यंत सगळे हप्ते बेलाशक बुडवणे, ऐनवेळी काखाबगला वर करणे...हे सारे उजळ माथ्याने करण्याच्या संधीला आर्थिक स्वातंत्र्य म्हणायचे, नाही तर काय म्हणायचे? एटीएमच्या रांगेत तुम्हीही दोनदा गेल्याचे (आणि पैसे न काढल्याचे) मी स्वत: टीव्हीवर पाहिले आहे. चांगला टाइमपास झाला की नाही? मग? झाले तर...मी तर म्हणेन की आत्ता आहे, तेवढे आर्थिक स्वातंत्र्य भारतीय जनतेला कधीही नव्हते! नव्हते!! नव्हते!!
थॅंक्‍यू!!
वि. सू. : या, एकदा असेच, परवासारखे चहा प्यायला!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com