प्रॅक्‍टिस! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : गडगडाट!
काळ : खडखडाट!          प्रसंग : तडफडाट!
पात्रे : सकलगुणालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजीमहाराज.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : गडगडाट!
काळ : खडखडाट!          प्रसंग : तडफडाट!
पात्रे : सकलगुणालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजीमहाराज.

वातावरण कमालीचे तणावग्रस्त आहे. कमळाबाई आपल्या अंत:पुरात कुणाची तरी वाट पाहत आहेत. कुणाची तरी म्हंजे उधोजीराजांची! पण ह्यावेळी त्यांच्या हातात छडी आहे. अधूनमधून त्या लोड-तक्‍क्‍यांवर चालवून प्रॅक्‍टिस करत आहेत. तोंडाने ‘छम छम’ असा आवाज काढत आहेत - छडीतून मात्र घमघम असा आवाज येतो आहे! तेवढ्यात उधोजीराजे प्रवेश करतात. अब आगे...
उधोजीराजे : (चकित) हे काय हातात? माथेरानची छडी?
कमळाबाई : (छडीशी चाळा करत) बसा!
उधोजीराजे : (मटकन बसत) पाणी घ्या, जरा गिलासभर...
कमळाबाई : (खडसावून) हुकूमशहा कोण?
उधोजीराजे : (कोरड्या जिभेने) प...प...पाणी मिळेल का?
कमळाबाई : (भिवया वक्र...) आधी सांगा, हुकूमशहा कोण?
उधोजीराजे : (जीभ फिरवत) आम्हाला काय म्हाईत?
कमळाबाई : (जाब विचारल्यागत) देश सध्या हुकूमशाहीकडे चालला आहे, असं कोणाला उद्देशून म्हणालात? सांगा!!
उधोजीराजे : ते..ते होय! ते आपलं असंच म्हटलं होतं! असं काही बोललं की लोकांना बरं वाटतं!
कमळाबाई : (चिडून) माताभगिनींनी पुरचुंडीत साठवलेला पैसा हुडकायला माणसं आली की त्यांना मसाल्याच्या डब्यात ढकला, असं कोण म्हणालं? बोला!!
उधोजीराजे : (क्षीण आवाजात) तो विनोद केला होता हो आम्ही!
कमळाबाई : (छडी उगारत) ह्याला विनोद म्हणतात? विनोद फक्‍त तावडेंना म्हणतात!!
उधोजीराजे : (पडेल चेहऱ्यानं) बरं ऱ्हायलं! 
कमळाबाई : (छडी उगारत) उठा!...
उधोजीराजे : (अनवधानानं) ओऽऽ...
कमळाबाई : (खडसावून) उठा म्हणते ना! ‘ओ’ कसले देताय?
उधोजीराजे : (खुलासा करत) मला वाटलं मला हाक मारताय!!
कमळाबाई : (जरबेने) जुमल्यांवर इमले कोणी बांधले?
उधोजीराजे : (हात पसरून) असेल कोणी बिल्डर फिल्डर! आम्हाला कसं कळणार?
कमळाबाई : (आणखी जरबेने) गरिबांकडे पैसा यावा म्हणून आम्ही नोटाबंदी केली! पाठिंबा देणं राहिलं बाजूला, ‘फाडून ठेवलंय, शिवायचं कोणी?’ असं का विचारलंत?
उधोजीराजे : (खुलाश्‍याचा दुबळा प्रयत्न करत) अहो, ते आम्ही आमच्या सुरवारीबद्दल बोलत होतो!! नोटाबंदीबद्दल नाही!! तुमच्या हरेक गोष्टीला पाठिंबा देण्यासाठीच आम्ही उभे आहोत इथं!! पण सुरवार तर शाबूत ऱ्हायली पायजे ना!!
कमळाबाई : (संतापानं) तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे हे असलं अचकट-विचकट!! शोभतं का तुम्हाला?
उधोजीराजे : (समजुतीच्या सुरात) अहो, ती मर्दाची भाषा आहे, ती रांगडीच असणार! 
कमळाबाई : (निर्वाणीच्या सुरात) आम्हाला हुकूमशहा म्हंटा?
उधोजीराजे : (मान हलवत) छे, तुम्ही कुठल्या हुकूमशहा? तुम्ही अमितशहा आहात ना!!
कमळाबाई : (पदर खोचून भेदकपणे) शेवटचं सांगतेय! एका घरात ऱ्हायचं आणि घरातल्यांवर टीका करत हिंडायचं बंद केलं नाहीत तर... तुमचा मार्ग वेगळा, माझा वेगळा!!
उधोजीराजे : (आनंदाची उकळी फुटून) खर्रर्र सांगताय...की हासुद्धा आपला नुसता चुनावी जुमला?
कमळाबाई : (पदर पुन्हा खोचून चेवात) आम्ही कपट कारस्थानं करतो?
उधोजीराजे : (खोल आवाजात) असं आम्ही कधी म्हणालो?
कमळाबाई : (संतापातिरेकानं) मग ‘हिंमत असेल तर समोरासमोर या,’ असं कोणाला म्हणालात? ही मी आल्ये...बोला, काय इरादा आहे? हुकूमशहा काय, चुनावी जुमले काय, भूलथापा काय, हिमतीची भाषा काय... कुठे बोललात हे सगळं?
उधोजीराजे : (कबुली देत) आरशासमोर उभं राहून भाषणाची प्रॅक्‍टिस करत होतो... बोलणारे आम्ही, ऐकणारेही आम्हीच! जगदंब जगदंब!

Web Title: dhing tang artical