युद्धानंतर..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुढ्यातील पंचतारांकित बशीतील
माणकासारखे लाल द्राक्षफल उचलत
सम्राट ओरडला : ‘‘कोण आहे रे तिकडे?’’

कोणीही नाही फिरकले बराच काळ...

अखेर पीकदाणीची स्वच्छता करून
परतलेल्या फर्जंदालाच विचारले त्याने :
फर्जंदा, युद्धाची काय खबरबात रे?

पुढ्यातील पंचतारांकित बशीतील
माणकासारखे लाल द्राक्षफल उचलत
सम्राट ओरडला : ‘‘कोण आहे रे तिकडे?’’

कोणीही नाही फिरकले बराच काळ...

अखेर पीकदाणीची स्वच्छता करून
परतलेल्या फर्जंदालाच विचारले त्याने :
फर्जंदा, युद्धाची काय खबरबात रे?

फर्जंद तत्परतेने म्हणाला :
‘‘प्रथम दर्जा, अधिपती, प्रथम दर्जा!
आपल्या साम्राज्यावरील सूर्य 
असाच तळपत राहो, अधिपती!
युद्धाचे म्हणाल, तर
आनंदाची बातमी आहे.
युद्ध जवळपास जिंकलेच आहे.
किरकोळ नुकसानापलीकडे
आपल्याला काहीही तोशीस नाही.’’
 
‘‘आपले सैन्य सुक्षेम?’’
बदामपिस्त्याच्या तस्तरीत
मूठ आवळत सम्राटाने पृच्छिले.

‘‘प्रथम दर्जा, अधिपती, प्रथम दर्जा! 
आपले शिलेदार पुनश्‍च एकवार
वारुणीच्या महापुरात
बुडण्यास सज्ज झाले आहेत.
सैन्यदेखील कृषककार्यासाठी
गावाकडे परतू लागले आहे, 
इतकेच काय,
आपल्या शस्त्रागारप्रमुखाने तर
कन्येचे मंगलकार्यदेखील काढले असून
सर्व शिलेदार दीर्घ रजेवर गेले आहेत.’’

‘‘रणांगणाचे काय चित्र?’’
सम्राटाने पीकदाणी मागवली.

‘‘प्रथम दर्जा, अधिपती, प्रथम दर्जा!
तोफांच्या पोटातील आग थंडावली आहे.
बाणांचे भाते रिक्‍त झाले आहेत.
स्फोटकांचा साठा संपुष्टात आला आहे.
रणांगण बरेचसे ओस पडले आहे, अधिपती! 
निकामी शस्त्रास्त्रे, तुटके किरीट, 
मोडकी रथचक्रे, बोथट भाले, 
तडे गेलेल्या ढाली, भंगलेली चिलखते,
वाकडे बाण, सरळ धनुष्ये
आदी भंगार सामान तेवढे
रणांगणावर पसरलेले आहे.
त्याचे काय करायचे?
एवढाच प्रश्‍न उरला आहे...’’

‘‘किरकोळच नुकसान झाले म्हणायचे!’’
केशरयुक्‍त शर्बताचा चषक
पुढे ओढत सम्राट म्हणाला.

‘‘आपल्या कृतांतक खङ्‌गाच्या
पराक्रमी आक्रमणापुढे
शत्रूसैन्य चीची करीत पळत सुटले,
आपल्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली.
आपले हरेक अस्त्र अमोघ
 ठरले, अधिपती!
फक्‍त-
विजयोत्सवाची परंपरा म्हणून
आपण दोन्ही हात 
पांढऱ्याशुभ्र वस्त्रात
गुंडाळून पांढऱ्या 
ध्वजाच्या पिंजरासदृश
घोडागाडीत बसून शत्रूसैन्यासमोर
अधोवदनाने उभे ठाकावे,
एवढेच अंतिम काम 
बाकी उरले आहे.

बाकी, सम्राटांचा विजय असो...असोच!’’

Web Title: dhing tang artical