तिसरे स्वातंत्र्य! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 20 मार्च 2018

""आमचा संकल्प... दिल्लीपर्यंतचा भूभाग स्वतंत्र करण्याचा! येत्या दीड वर्षात हा प्राचीन देश हिटलरी शक्‍तींच्या जबड्यातून मुक्‍त नाही केला, तर नाव लावणार नाही...,'' राजियांच्या नेत्रांतून अग्निफुले फुंटत होती. मस्तकीचा अदृश्‍य शिरपेच संतापाने हिंदकळत होता

""ठरलं म्हंजे ठरलं, आमचा संकल्प ठरला!,'' गर्रकन मान वळवत सर्रकन तलवार उपसत भर्रकन वळत राजे म्हणाले, तेव्हा आमचा चेहरा खर्रकन उतरला. राजियांचा संकल्प म्हंजे काळ्या फत्तरावरील रेघ. आता माघारी वळणे नाही. राजियांच्या मुखातील बोल, म्हंजे देवावरचे फूल. खालतें पडता उपेगाचे नाही.
""आपण फक्‍त आज्ञा करा राजे, छप्पन इंची छातीचा दहा लाखांचा कोट करोन प्राणांची कुर्वंडी करू!'' येक गुडघा जिमिनीवर टेकवीत वीरासनात बसत आम्ही निष्ठेने आण घेतली.
"1947 ला ह्या देशाला पहिलं स्वातंत्र्य मिळालं...1947च ना? काय?,'' राजियांनी पहिले स्टेटमेंट केले, मग तोच सवालही विचारला. आम्ही गडबडलो. (त्यात आम्ही वीरासनात बसलेले!)
""होय तर..!,'' इतिहासाची बुके शाळेत धड वाचली असती तर बरे झाले असते, असे मनाला स्पर्शून गेले.
""दुसरे स्वातंत्र्य 1977 ला मिळाले...हो ना?'' पुन्हा राजियांनी स्टेटमेंट कम सवाल टाकला. आम्ही (वीरासनातच) "हो' म्हटले. कुणाला म्हाईत? सनावळ्यात आम्ही कायम मार खात आलो! असो.
""इजा जाहला, बिजा जाहला....तिजा होईल 2019 ला! ह्या देशाला तिसरे स्वातंत्र्य मिळवून देण्याची आण आम्ही घेतली आहे... तिसरे स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्‍क आहे आणि तो आम्ही मिळवूच...,'' राजियांनी घोषणा केली आणि जणू बिजलीचा कडकडाट जाहला. आमच्या छप्पन इंची छातीचे बंद तटतटा तुटले. बाहूंमध्ये स्फुरण आले. पण तेवढेच!
""अरे, किती थापा माराल! किती गमजा माराल!!,'' आमच्याकडे बघून जळजळीत नजरेने राजे म्हणाले. आम्ही चमकून मागे पाहिले. कुणीही नव्हते. भिंतीकडे तलवारीचे टोंक रोखून राजे बोलत राहिले...
""...ह्याच असुरानं एकेकाळी आमच्याभोवती मायावी जाळ उभं केलं होतं. किती सुंदर स्वप्न होते ते... सुंदर कारंजी, थुई थुई नाचणारे मोर, वळणदार नद्या, जीन्स पेहरून ट्रॅक्‍टरवर बसून गाणी म्हणणारे शेतकरी, प्रत्येकाच्या खिश्‍यात पंधरा-पंधरा लाखांची पुडकी...असं बरंच काही!! पण-''
""पण.. पण काय राजे?,'' अवघडलेल्या सुरात आम्ही म्हणालो. वीरासनात बसणे येकवेळ सोपे, पण उठणे कठीण असत्ये! गुडघ्याला रग लागली होती...
""ज्याला आम्ही सिनेमा समजलो, तो स्क्रीनसेवर निघाला! ज्याला आम्ही मोर समजलो तो गावठी कोंबडा निघाला, ज्याला आम्ही पापलेट समजलो, ती मांदेळी निघाली..!!'' कपाळावर मूठ हापटत राजियांनी संताप व्यक्‍त केला.
""आपण फक्‍त बोला राजे! आम्ही आपला संकल्प पूर्ण करू!!'' आम्ही विषय आवरता घेण्यासाठी म्हटले. कां की गुडघ्यात सणसणीत कळ आली होती... अंमळ शोक केला.
""आमचा संकल्प... दिल्लीपर्यंतचा भूभाग स्वतंत्र करण्याचा! येत्या दीड वर्षात हा प्राचीन देश हिटलरी शक्‍तींच्या जबड्यातून मुक्‍त नाही केला, तर नाव लावणार नाही...,'' राजियांच्या नेत्रांतून अग्निफुले फुंटत होती. मस्तकीचा अदृश्‍य शिरपेच संतापाने हिंदकळत होता.
""अलबत राजे, अलबत.. येत्या दीड वर्षात आपण महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचेच नवनिर्माण करून टाकू... हर हर हर हर महादेव!,'' आम्ही (जमेल तितक्‍या) त्वेषाने म्हणालो.
""खामोश!! भारताचं नवनिर्माण करायला कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही फक्‍त तिसऱ्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय...बरं!,'' राजियांनी खुलासा केला.
""आपला संकल्प, हा आमचा संकल्प! भारताच्या तिसऱ्या स्वातंत्र्यासाठी आपण चेतविलेल्या अग्निकुंडात आम्ही आमच्या पंचप्राणांची आहुती देऊ! नेमके काय करायचे ते सांगा, आम्ही आपल्या पाठीशी आहोत!!,'' आम्ही कळवळून म्हणालो. इथे आमचा गुडघा कामातून गेला होता.
""नेमके कसे साधावयाचे? ते आम्हाला काय माहीत?,'' राजे खांदे उडवोन म्हणाले, ""ते सर्वांनी एकत्र येऊन करावं, येवढंच आमचं म्हणणं... कळलं? आमची कार्टून काढायची वेळ झाली आहे... निघा!''

तात्पर्य : तिसऱ्या स्वातंत्र्यासाठी गुडघे सांभाळा!

Web Title: dhing tang article