दोघे प्रवासी ‘घडी’चे! (ढिंग टांग)

दोघे प्रवासी ‘घडी’चे! (ढिंग टांग)

दादू  - (फोन फिरवत) सदूराया... मी बोलतोय!
सदू - (क्षणभर थांबून) बोल!
दादू  - (खवचटपणाने) कसा झाला दौरा?
सदू  -  (सावध होत) बरा!
दादू  - (आणखी चौकशी करत)  कुठे कुठे गेला होतास?
सदू  - (शांतपणे) पक्षबांधणीसाठी जिथं जायला हवं होतं, तिथं गेलो होतो! कारण शिवाजी पार्कात बसून पक्षबांधणी होणार नाही, हे मला थोरल्या काकांनी समजावून सांगितलंय!
दादू  - (खोदून खोदून...) म्हणजे नेमकं कुठं गेला होतास?
सदू  - (संयमानं) तू जिथे जिथे गेला नाहीस, तिथं तिथं गेलो होतो!!
दादू  - (खोदकाम चालू...)...लोणार सरोवराचे फोटो काढलेस म्हणे! फेसबुकवर टाक ना..!
सदू  -  (तुच्छतेने) नको!
दादू  -  (कुतूहलानं) का?
सदू  -  (नेहले पे देहला...) प्रदर्शन भरवायचा विचार आहे!! आधी प्रदर्शन, मग कॉफीटेबल बुकचं प्रकाशन..! ‘लोणार माझे...मी लोणारचा’ असं टायटल मारणार आहे!!
दादू  -  (मुद्द्यावर येत) काय म्हणाले थोरले काका? विमानानं एकत्र आलात ना? फोटो बघितले मी!!
सदू  -  त्यांनी मला घड्याळ भेट दिलं! 
दादू  - (कपाळाला आठी) चालू की बंद?
सदू  -  (स्वप्नाळू सुरात) म्हणाले की आपण दोघंही ‘घडी’चे प्रवासी आहोत!!
दादू  -  (आवेगाने) सद्या, त्यांच्या नादाला लागू नकोस हं!
सदू  -  (बंडखोर सुरात) का?
दादू  -  (डोळे विस्फारत)  का काय का? त्यांच्या नादाला लागल्यावर काय होतं, हे सांगणारे ह्या महाराष्ट्रात कमी आहेत का?
सदू  -  (भारावलेल्या आवाजात)...हाच एक मोठा गैरसमज आहे! दुसऱ्या पक्षातल्या माणसांनाही ते किती प्रेमानं वागवतात! विमानात माझ्यासाठी त्यांनी शेजारी बसलेल्या मंत्र्यालासुद्धा उठवलंन! म्हणाले, ‘‘ अहो, तुम्ही उठा इथून...माझ्या राजाला बसू द्या इथं!!’’ मला किती उन्मळून आलं होतं आनंदानं!!
दादू  -  (च्याटंच्याट पडत) ‘माझ्या राजाला’ असं म्हणाले ते?
सदू  -  (खुलासेवजा...) ‘माझ्या’ हा शब्द उच्चारला नसेल त्यांनी...पण भावना तीच होती!! मला सीटबेल्टही बांधून दिला!! खिडकीची जागा दिली!! आणखी काय हवं असतं?
दादू  -  (जळकूपणाने) सद्या...टाळी दिलीस ना?
सदू  -  (आकडेमोड करत) 
            एकूण तीन दिल्या!!
दादू  -  (चिडून) तीन?
सदू  - (अभिमानाने) करेक्‍ट...एकदा त्यांनी घड्याळ दिल्यावर, दुसऱ्यांदा त्या मंत्रिमहोदयांना उठवून मला बसवल्यावर आणि तिसरी सीटबेल्ट लावून झाल्यावर
दादू  -  काय सांगतोस काय?
सदू  -  (सहज सांगितल्यागत) मॅग!! लोणारच्या तळ्याचे फोटो दाखवले मी त्यांना मोबाइलमध्ये!
दादू  -  (चुळबुळत) मग काय ठरलं तुमचं विमानात?
सदू  -  ठरायचं काय? ह्यापुढे मला त्यांच्यासोबत जाताना विंडोसीटच मिळेल, एवढं ठरलं!!
दादू  -  (जळकूपणाने) खिडकीतून काय दाखवलंन?
सदू - (चिंताग्रस्त सुरात) काय दाखवणार? म्हणाले, बघा, किती दुष्काळ पडलाय खाली!!
दादू   -  (खवळून)...शत्रूला टाळ्या दिल्यास, कुठं फेडशील पापं? त्यांच्या पुतण्यानं आमचा बाप काढला, त्याचं तुला काहीच वाटत नाही का?
सदू   -  (एक डेडली पॉज घेत...) पुतण्या पुतण्या म्हणून हिणवू नकोस! कसेही असले तरी आता माझे चुलतभाऊ लागतात ते! कळलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com