ढिंग टांग : तो राजपुत्र एक...

ढिंग टांग : तो राजपुत्र एक...

नगरचौकात दुतर्फा उसळलेल्या
अफाट गर्दीतील सहस्रावधी डोळ्यांना
दूरवर दिसू लागला एक ठिपका...

आरोळ्या आणि जयजयकाराच्या
घोषणांनी निनादला आसमंत.
समुद्राच्या लाटांसारख्या उन्मनी
शुभ्र अश्‍वाच्या पाठीवर मांड ठोकून
नगराकडे उत्सुक टापा टाकत
आलेल्या राजपुत्राने मग
आपल्या निळ्या डोळ्यांनी
नीट बघितली आपल्या
प्राणप्रिय प्रजाजनांची गर्दी.
दिल बहलून गेला त्याचा.

अश्‍वाचे वेग आणखीनच ताणत
त्याने घेतली धाव आणि 
वेस ओलांडत गाठला नगरचौक.
दुथडीला असलेल्या गर्दीकडे
हात लांब करून त्याने स्वीकारले
हसत हसत गर्दीचे अभिवादन.
हाती आलेले पुष्पहार दिले
भिरकावून प्रेमभराने गर्दीकडेच.
म्हणाला मनाशीच की,
‘लोकहो, हे प्रेम तुमचे तुम्हाला वापस’

तरण्याबांड राजपुत्राच्या कुरळ केसांचे
प्रजाजनांना कोण कवतुक...
त्याच्या किंचित चार दिवसांच्या
कोवळ्या दाढीचे साऱ्यांना किती अप्रुप.
त्याच्या शुभ्र अश्‍वाच्या पाठीवरील
महागड्या खोगीराचे किती किती आश्‍चर्य.

राजपुत्राने विनम्रपणे पायउतार होत
नगरातील प्रजाजनांमध्ये घेतली झेप,
जनता जनार्दनाला उराउरी भेटून
त्यांच्या अडीअडचणींचे निवारण
करण्याचा राजधर्म पुरता भिनलेल्या
राजपुत्राने केले क्षणार्धात 
साऱ्यांना आश्‍वस्त.

हे सारे महालाच्या सौधावरून 
पाहत असलेल्या सम्राटाच्या
डोळ्यांतून सांडले कृतकृत्यतेचे 
दोन आनंदाश्रू. तो म्हणाला,
माझ्या प्रजाजनांनो, मला जे
मिळाले प्रेम, तेच तुम्ही घाला
झोळीत माझ्या राजपुत्राच्या देखील.
कारण तोच आहे तुमचा 
पुढला तारणहार. तुमचा ताबेदार.
आणि सर्वकाही.
राज्याचा वारस म्हणूनच
निपजलेल्या या राजपुत्रावर
असू दे तुमची अशीच पाखर.
हे राज्य आचंद्रसूर्य नांदो!’

राजपुत्रावर आणखी जोरदार
पुष्पवृष्टी करत नगरजन ओरडले
एका सुरात : तथास्तु, तथास्तु!
लोकशाहीचा विजय असो!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com