ढिंग टांग : अर्थ आणि अनर्थ!

political_maharashtra
political_maharashtra

सध्या महाराष्ट्रात माहौल पोलिटिकल आहे. त्यातील काही ताज्या पोलिटिकल वक्‍तव्यांचे अर्थ आम्ही येथे सामान्य वाचकांसाठी सांगणार आहो. अर्थात आम्ही सांगू, तोच अर्थ त्या वाक्‍याला असेल, असा आमचा छातीठोक दावा नाही. कारण, वाक्‍य कोणी उच्चारले आहे, त्यावर राजकीय वाक्‍याचा अर्थ ठरतो. आम्ही सांगितलेली वाक्‍ये व शब्दार्थ, यांचा उपयोग करून उत्साही वाचकांनी टीव्हीसमोर बसावे. बरे पडेल! डिस्क्‍लेमर : आम्ही येथे राजकीय वाक्‍य सांगू, त्याचा अर्थही सांगू; पण वाक्‍य कोणी उच्चारले, त्याचे नाव अजिबात सांगणार नाही.

वाक्‍य पहिले : मी पुन्हा येईन!

अर्थ : मी पुन्हा येईन, हे फार बहारदार वाक्‍य आहे. हे वाक्‍य हल्ली ऐकू आले, की लोक फिदीफिदी हसतात. त्यामुळे ते विनोदी आहे, असे कुणाला वाटेल. पण वाचकहो, तसे नाही! या वाक्‍यात कारुण्य ओतप्रोत भरले आहे. मी पुन्हा येईन! या वाक्‍यात आश्‍वासन आहे, इशारा आहे, इतकेच नव्हे; तर एक सज्जड धमकीदेखील आहे!!

आपल्या ओळखीचे बरेच लोक ‘येतो’ असे सांगून उसने पैसे नेल्याप्रमाणे पुन्हा तोंड दाखवत नाहीत. तर, एखादा मनुष्य इतका बेभरवशी असतो, की ‘मी पुन्हा येईन,’ असे सांगून चक्‍क येतोसुद्धा! अशा बेभरवशी माणसाचे हे उद्‌गार असल्याने महाराष्ट्रातील वातावरण तापले. किंबहुना, सध्या उद्‌भवलेल्या महाराष्ट्रातील सत्तापेचाची जननी म्हणजे हे देववाक्‍य!

वाक्‍य दुसरे : मुख्यमंत्री आमचाच होणार!

अर्थ : खरे तर ही ऊर्जाक्षरेच! हे वाक्‍य गमतीत उच्चारणे शक्‍यच नाही. तोंड भाजेल!! कुणी लाख प्रयत्न केले, तरी आम्हाला आता कोणीही रोखू शकत नाही, असा आत्मविश्‍वास या शब्दांमध्ये ठायी ठायी भरलेला आहे. पण, ते तेवढेच!! कुणी याला भविष्यवाणी म्हटले, तर तो फशी पडलाच म्हणून समजा. मुख्यमंत्री आमचाच होणार, ही एक शक्‍यता किंवा अंदाज तेवढा आहे. फार तर दिलासा!! प्राकृत मराठीत त्याला हूलझपट असे म्हणतात. असो!

वाक्‍य तिसरे : मीटिंग क्‍यान्सल... मी चाललो बारामतीला!

अर्थ : वरील वाक्‍य कोणी उच्चारले, हे कळल्याशिवाय त्यातील अर्थच्छटा समजणे कठीण जाईल. तेव्हा जिज्ञासूंनी ते आधी माहीत करून घ्यावे! ‘मी चाललो बारामतीला’ हे वाक्‍य पवाड्याचा मुखडा म्हणून अप्रतिम आहे. च्यानलवाल्यांचा कात्रज करण्यासाठी हे मंत्रवाक्‍य उच्चारण्यात आले. आश्‍चर्य म्हणजे च्यानलवाले कंप्लीट हुकले!! यालाच म्हणतात बारामतीला जाणे!! पुन्हा असो!

वाक्‍य चौथे : बंद कमरे में हुई बातें सार्वजनिक करना उचित नहीं है!

अर्थ : वरकरणी पाहता हे एक अत्यंत सभ्य व सुसंस्कृत, असे शालीन उद्‌गार आहेत. उद्‌गार काढणारी व्यक्‍ती अत्यंत ऋजू स्वभावाची, मनमिळाऊ आणि नेमस्त प्रकृतीची असणार, असा कयास कुणीही बांधेल! बंद खोलीतल्या गोष्टी उघड करू नयेत, हे कोणीही कबूल करील! बंद खोलीत बसून बोललेले दारे उघडल्यानंतर विसरायचे असते, हा या वाक्‍याचा खरा अर्थ! असोच!

वाक्‍य पाचवे : आमचं ठरलंय!

अर्थ : या वाक्‍याने मराठी माणसाचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त केले. हे वाक्‍य पुन्हा कोणीही उच्चारू नये. लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेवर तर चुक्‍कूनही छापू नये! या वाक्‍यासारखे बेक्‍कार वाक्‍य मराठी भाषेत गेल्या दहा हजार वर्षांत निर्माण झाले नाही व होणार नाही. हे काळवाक्‍य कोणी उच्चारले, तर ‘आस्तिक आस्तिक’ असे पुटपुटावे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com