झोल-गाणे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 29 एप्रिल 2017

दिवसाकाठी बारावेळा बदलला की वेश
इतकं करून तुमचं मन द्रवत नाही जरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?

सबका साथ, सबका विकास हाच आमचा नारा...
विकासाच्या रस्त्यावर आम्ही चालतो भराभरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?

तुमच्यासाठी लेको आम्ही काय नाही केलं?
श्रीहरिच्या कोट्यामधून मंगळयान गेलं
हातात घेऊन झाडू, सारा झाडून काढला देश
दिवसाकाठी बारावेळा बदलला की वेश
इतकं करून तुमचं मन द्रवत नाही जरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?

धडाधडा उघडली की आम्ही ब्यांकेत खाती
विरोधक आले शरण शेवटी तृण धरून दाती
विरोधक काय, मित्रसुद्धा झाले आमचे पाळीव
पावन करून घेतली पदरी काही रत्ने गाळीव
सगळा घाट घातला आम्ही तुमच्यासाठीच खरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबलीको क्‍यूं मारा?

गीरचा सिंव्ह गर्जला जोरात-मेक इन इंडियाऽऽऽ
देशभरात रंग उधळला एकच- केसरियाऽऽऽ
हात लावीन तिथं सोनं होईल, असे आम्ही परीस
लाथ मारीन तिथं पाणी काढीन, बेत नेऊ तडीस
खरंच सांगतो विजयाचा अहंकार नाही बरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?

बाहुबलीने बंद केली हजाराची नोट
कटप्पाला आली असणार धंद्यामध्ये खोट
हिष्मती नगरीमध्ये उठला असेल बव्हाल
भल्लालदेवाचे पुरते झाले हाल हाल हाल!
उगीच कुणाच्या पाठीत कुणी खुपसत नाही फरा
इतकं करतो, तरीही विचारता,
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?

ऐका, मेरे प्यारे भाईयो, बहनो, मित्रों ऐका!
कटप्पाचा अमावाश्‍येला फिरला होता डोका!
हायवेपासून पाश्‍शे मीटरच्या भाईर पठ्ठ्या ग्येला
थितं भ्येटला बाहुबली अन्‌ थोडक्‍यात म्येला!
घेतलीमध्ये करू नका उगीच आरारारा!
इतकं करतो, तरीही विचारता
-कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा!

कटप्पा असतो गुलाम, आणि बाहुबली राजा
दोघांच्याही राज्यात सुखी माहिष्मतीची प्रजा
सिनेमा आणि क्रिकेट म्हटलं की प्रजा होते गार
दोन्हीपुढे भूक आपली मरून जाते पार
कसायाला द्यावा बोकड, हलवायाला शिरा
आता कळलं भाइयों-बेहनो,
कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?
 

Web Title: dhing tang article