दोघे शूरवीर! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 6 जून 2017

सदाजी तर झुंजारांचा राजा. दांडपट्टा असा फिरवील की लिंबू कटेल, पण अखंड राहील! दुधी भोपळ्याची खांडोळी उडवील, पण भोपळा ढिम्मच्या ढिम्म. आहे की नाही कमाल? कास्तकारांचा राजा (ज्यास त्याची प्रजा लाडाने राजू असे संबोधत्ये...) जो की, शेटीराणा ह्याचा उजवा हात म्हंजे सदाजी! पण तो हात नसून खांदा आहे हे शेटीराण्यास उशिरा कळाले!

रात्र काळोखी होती, वैऱ्याची नव्हे! हवा ढगाळ होती, टाईट नव्हे!! वातावरण कुंद होते, धुंद नव्हे!! अशा अवकाळी दोन सावल्या एकमेकांशी कुजबुजत होत्या...कोण बरे हे दोघे? इतिहासाने त्यांची नावे नोंदवून घेतली आहेती. एक होता सदाजी, दुसरा जयाजी. दोघेही महाराष्ट्राच्या दौलतीचे रणझुंजार गडी. तेगबहाद्दर. दोघांनाही बघून सत्ताधाऱ्यांची पांचावर धारण बसत असे, अशी इतिहासात नोंद आहे. (इतिहासात हं...प्लीज नोट!) जुल्मी मोंगलांची घोडी पाण्यासाठी खाली वाकली की त्यांस सदाजी-जयाजीचे चेहरे दिसत असत. पाठीवरला मोंगल तेथेच सांडून घोडी चौटाप चीची करत पळत असत. (होय, घोडा चीची करतो, असेही इतिहासात नमूद आहे.) तर अशी ही सदाजी-जयाजी ह्यांची जोडी. ह्यांच्या दोस्तीवर ऐतिहासिक चित्रपट काढण्याचे घाटत आहे, अशी बॉलिवूडमध्ये बोलवा आहे. ही बातमी इतिहासकारास खुद्द संजय भन्साळी ह्यांनीच दिली. पुराव्यादाखल त्यांनी "हहहऽ हहहऽ हहहऽ' हे सुप्रसिद्ध वीरश्रीयुक्‍त गीतही म्हणून दाखविले. इतिहासाने त्यावेळी घाबरून खोलीचे दार उघडे करून ठेवले, असे कळते. असो, असो.

सदाजी तर झुंजारांचा राजा. दांडपट्टा असा फिरवील की लिंबू कटेल, पण अखंड राहील! दुधी भोपळ्याची खांडोळी उडवील, पण भोपळा ढिम्मच्या ढिम्म. आहे की नाही कमाल? कास्तकारांचा राजा (ज्यास त्याची प्रजा लाडाने राजू असे संबोधत्ये...) जो की, शेटीराणा ह्याचा उजवा हात म्हंजे सदाजी! पण तो हात नसून खांदा आहे हे शेटीराण्यास उशिरा कळाले! समशेरबहाद्दर सदाजीचे समरातले कसब चाणाक्ष दौलतीचे कारभारी नानासाहेब फडणवीसांनी अचूक हेरले आणि हा हिरा अलगद दौलतीत जमा केला!! तेव्हापासून सदाजी लिंबू, दुधी, अशा भाज्याच चिरतोय...पण मुदपाकात! असो.

जयाजीचे तत्वचि वेगळे! आपण नेमके कुणाच्यात आहोत, ह्याचा पत्त्यामुद्या गडी लागू देत नसे. इतके गुपित, इतके गुपित की ते स्वत:सदेखील कळू देत नसे. पण इतिहासास बरोब्बर कळले. ह्या जयाजीने चाळीस हजारांचे डिझेल घोड्यास पाजून त्यास चौटाप दौडविले आणि उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. "शेतकरी तितुका मेळवावा' हे ब्रीद त्याने तडीस नेले. पण त्यालाही कारभारी नाना फडणवीसांनी अचूक हेरले व हा हिरादेखील दौलतीत जमा झाला.

ही झाली त्या दोन सावल्यांची वळख. आता त्यांच्या कुजबुजीकडे वळू.
जयाजी : (काकुळतीला येत) असं किती काळ टेबलाखाली बसायचं भाऊ!
सदाजी : (गप्प करत) मोठ्यांदा आवाज करू नका!!
जयाजी : (संतापून) का?
सदाजी : (शांतपणे) बोंबलायची पाळी यिल! फोन सायलंटवर टाका!
जयाजी : (खोल आवाजात) गेले दोन दिवस अनरिचेबलच काढले भाऊ! फोन ऱ्हायला बाजूला, आम्हीच सायलंट मोडवर गेलो!!
सदाजी : (हळहळत) एकेकाळी ह्या सदाजीच्या नावानं गनीम चळाचळा कापायचा!
जयाजी : (मान हलवत) माझं चाळीस हजाराचं डिझेल ग्येलं राव! रातभर जागरन केलं, हातात काय आलं?
सदाजी : (विषय बदलत)...मीटिंगमधी नाना तुज्या कानात काय बोल्ले रं?
जयाजी : (चिंतेत) चूक...काहीच नाही की!
सदाजी : (संशयानं) लबाड बोलू नगंस! मी पाहिलंय...नानासाहेब तुज्या कानाशी लागलं हुतं!
जयाजी : (गुळमुळीत) म्हनले, जेवला का? दोन घास भाकरटुकडा खाऊन जा!! कसं जानार? घोडा आहे की दिऊ माझा?...असं!!
सदाजी : (अविश्‍वासानं) काहीही हं जयाजीराव!
जयाजी : (वैतागून) झक मारली आणि झुणका खाल्ला, असं झालंय! खालीपिली तुमच्या नादी लागलो, आणि सगळा चिवडा झाला!! तुमच्या गुणानं हिते अडकून पडलोय! तुमचं आईकलं नसतं, तर आज उजळ माथ्यानं घरी गेलो असतो! आता करायचं काय ते बोला आता!!
सदाजी : (टेबलाखालून आभाळाकडे बघत) पाऊस पडायची वाट बघायची नि काय! पाऊस पडला की समदं बैजवार होतंय बघा!!

Web Title: dhing tang article