"योगा'योग! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 21 जून 2017

योग हा व्यायामप्रकार आहे, असाही एक गैरसमज समाजात पसरून राहिला आहे. किंबहुना योगाचा व्यायामाशी काही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा! चटई सोडली तर व्यायामाशी योगाचा रत्तिभरही संबंध नाही

योगमहर्षी पातंजली आणि महायोगी श्रीगुरुपाद स्वामी बाबा बामदेव ह्यांना शतप्रतिशत नमन करून आम्ही आमच्या लाखो-करोडो वाचकांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा देतो. आज 21 जून. वर्षातील सर्वांत लांबलचक दिवस म्हणून तो ओळखला जात असे. परंतु गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्याची ही ओळख संपुष्टात आली असून, "योग दिवस' म्हणून हा दिन मानवी क्‍यालिंडरात विराजमान झाला आहे. योगमहर्षी पातंजलींना 21 जूनचे महत्त्व ठाऊक नव्हते, पण श्रीगुरुपाद स्वामी बाबाजींना मात्र अचूक माहीत होते. पण ते जाऊ दे. दिवस लहान की मोठा हे आपल्याला काय करायचे आहे? विषय आहे योगाचा. आजच्या पवित्र दिवशी आम्ही दिवसभर योग करावयाचा दृढसंकल्प केला असून, आपणही तसे करावे, ही विनंती. सर्वप्रथम योगाबद्दल थोडेसे जाणून घेणे आपल्याला नक्‍की आवडेल. योगाची सुरवात पातंजली ऋषींनी केली, असा सर्वसाधारण समज आहे. तो बराचसा चुकीचा आहे. "नवनीत'ची गाइडे लिहिणारा परीक्षेला बसतो का? नाही!! तसेच हे!! पातंजली ऋषींनी योगाचे गाइड, एकवीस अपेक्षित प्रश्‍नसंच आणि नमुना प्रश्‍नपत्रिका आदी विपुल शैक्षणिक लिखाण केले. त्याचा बाबा बामदेव ह्यांच्या कोचिंग क्‍लासेसना चांगला फायदा झाला. इतका की "बाबाजी पॅटर्न' म्हणून तो फेमस झाला. असो.

योग करणे ही फारशी अवघड बाब नाही, हे आपल्याला पू. बाबाजी ह्यांच्याकडे पाहून सहजच कळेल.

कूटनीतीमहत्प्रयास: यथेच्छस्य भुंजिथा।
सालंकृतस्य संकीर्ण: तस्मात देह निरामया।।
...असे एक संस्कृत योगसूत्रच आहे. कुणी म्हणेल हे खोटे आहे. किंबहुना हे संस्कृतच नव्हे!! पण आम्ही म्हणू की आहेच मुळी..!! याचा अर्थ असा : ज्याप्रमाणे दाण्याचे कूट करण्यापूर्वी भाजक्‍या शेंगदाण्यांस पिशवीत घालून झोडपून काढावे लागते व त्यायोगे शेंगदाण्यांची साले निघून स्वच्छ निरामय शेंगदाणे खिचडीसाठी तय्यार होतात, त्याप्रमाणे देह नित्यनेमें शुचिर्भूत करावा लागतो. काही कळले? नसेल तर पू. बाबाजी ह्यांची "कपालभाति' करून बघावी... किंवा बघून करावी! असो.
पतंजलीच्या योगसूत्रात म्हटले आहे की- तद्‌वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम!
अर्थ : जेव्हा निर्विकारापासूनही विरागी अस्तित्त्वरूपी साल दूर होते, तेव्हा दोषयुक्‍त बीजे उघडी पडतात वा क्षय पावतात, तेव्हाच कैवल्याच्या नजीक जायला होते. तेव्हा उपरोक्‍त शेंगदाणाकूटनीतीच्या (तथाकथित) संस्कृत सुभाषिताचा दाखला सत्य आहे, हेही सहज कळेल. असो.

योग हा व्यायामप्रकार आहे, असाही एक गैरसमज समाजात पसरून राहिला आहे. किंबहुना योगाचा व्यायामाशी काही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा! चटई सोडली तर व्यायामाशी योगाचा रत्तिभरही संबंध नाही. योग हा आळशी लोकांचा व्यायाम आहे, असेही (अपचनाने हैराण झालेले) काही लोक म्हणतात. वाचकहो, योग ही एक जीवनशैली आहे. त्यायोगे चित्त आणि देह ह्यांचे मनोज्ञ अद्वैत होऊन चिरंतन शांत अवस्था प्राप्त होते. चित्त अस्थिर करणाऱ्या साऱ्या कोलाहलापासून मुक्‍ती मिळते. साध्या भाषेत सांगावयाचे तर,-गाढ झोप लागते!!
हे सारे साध्य करण्यासाठीच "योगा डे' साजरा करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करायचे? सोपे आहे. चटई पाहून हातपाय पसरायचे!! याने की जमेल तशी योगासने (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हं!) करायची. उत्तानपादासन आणि पवनमुक्‍तासन ह्या योगासनांमध्ये आम्ही विशेष प्रावीण्य मिळविले आहे, हे आमच्या आसपास वावरणाऱ्या लोकांस ठाऊक आहेच. तेव्हा आमचे मार्गदर्शन घ्यायला काही हरकत नाही. कां की ही दोन योगासने फार लाभदायक आहेत व ती (फक्‍त "योगा डे'लाच नव्हे तर-) रोजच्या रोज करावीत. सारांश, "योगा डे'च्या शुभदिनी आम्ही चटई पसरून तयार आहो. प्रारंभ शवासनाने करू, म्हणतो. शुभस्य शीघ्रम...घुर्रर्रर्र!

Web Title: dhing tang article

टॅग्स