लौकर निजे, लौकर उठे..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 26 जून 2017

...झुंजुमुंजू होत असतानाच आम्ही डोळ्यातील चिपाडे काढत कृष्णकुंजच्या पायथ्याला उभे होतो. गडावर चक्‍क जाग होती. हे आम्ही काय पाहातो आहो? पहाटसमयी राजगड जागा? आता दुपारचा चहा पहाटेच? बाप रे!!

राजे हल्ली लौकर उठतात. फार्फार लौकर उठतात. पहाटे पाच वाजेशी उठावे. भराभरा व्यायामपोशाख चढवून सायकल काढावी. (टायरीत हवा पंपावी.) शिवाजीपार्कास वेगेंवेगें चकरा माराव्यात. घामाघूम व्हावे. दिवसभर जमलेल्या अनावश्‍यक क्‍यालरीज जाळून भस्म कराव्यात, हा त्यांचा नूतन परिपाठ झाला आहे. व्यायामादी प्रकार झाल्यावर सहा-साडेसहाशी कामास लागावे. "आता मी कचेरीत जातो' असे जाहीर करुन आतल्या खोलीतून बैठकीच्या खोलीत यावे. चहाचे फर्मान (आम्हास) सोडावे. (खुलासा : आम्ही राजियांचे विश्‍वासू फर्जंद आहो!!) आम्ही चहा ठेवावा, त्यांनी महाराष्ट्राच्या कारभाराची सूत्रे भराभरा हलवावीत.

...हे सारे नुकतेच सुरु झाले तेव्हा अष्टप्रधान मंडळात एकच गोंधळ उडाला. राजियांनी एकदा पहाटेच दौलतीचे सूत्रधार बाळाजीपंत अमात्य (नांदगावकर) ह्यांना फोन करुन उठवले. पहाटेचा सुमार. बाळाजीपंतांचा नुकताच डोळा लागलेला. फोनच्या घंटीने ते खडबडून जागे झाले. ""च्या*** **!'' असे काही नाराजीयुक्‍त उद्‌गार मुखातून येणार, एवढ्यात फोनमधून खर्ज घुमला- ""जय महाराष्ट्र...उठा!'' त्या क्षणापासून बाळाजीपंत अमात्य आजवर झोपलेले नाहीत!! सरनोबत सरदेसायांचेही तसेच...पहाटे पहाटे फोन चार्जिंगला लावून झोपावयास जावे, ह्या इराद्याने त्यांनी चार्जर (छोटी पिन) काढला, तेवढ्यात फोन खणखणला. ""जय महाराष्ट्र...उठा!'' सरनोबत सरदेसाई च्याटंच्याट!! सुरवातीला त्यांस वाटले की कोणीतरी मस्करी करीत आहे. हल्ली आपले दिवस बरे नाहीत. कोणीही उठावे, टिचकी मारोनी जावे, ह्या उक्‍तीनुसार...जाऊ दे. त्यांनी झोपेला जाण्याचा बेत रद्‌द करुन दोरीवरला टावेल ओढून न्हाणीघर गाठले!! सेनापती अविनाशाजी अभ्यंकरांची परिस्थिती तुलनेने बरी होती. रात्री बाराच्या सुमारास त्यांस बसल्या खुर्चीतच डोळा लागला होता. झोपेचा प्रॉब्लेम नव्हता, पण वाजणारा फोन सांपडता सांपडेना!! हे थोडे रातकिड्यासारखे असते. रातकिड्याचे ओरडणे तितकेसे त्रासदायक नसते, परंतु, तो कोठून ओरडतो, हे न कळल्याने चिडचीड होते. अखेर त्यांच्याच बैठकीच्या खाली फोन सांपडला. उचलल्यावर तोच परिचित खर्ज- जय महाराष्ट्र...उठा!!

कैक वर्षांपूर्वी कोण्या एका जाणत्या राजाने "राजकर्म ही उपासना असून उपासनेसी दृढ चालवावे' ऐसा समर्थ सल्ला राजियांना दिला होता. राजियांनी तेव्हा त्याकडे काणाडोळा केला कां की सदर सल्लामशवरा हा सकाळचे सुमारास देण्यात आला होता. राजे तेव्हा साखरझोपेंत होते. परंतु, आता? जमाना बदलला. दिवस बदलले. काळदेखील बदलला. ज्या काळी तमाम राजकारणी झोपेत मिटक्‍या मारीत असतात, त्या प्रहरी राजे जागे असतात. नुसते जागे नसून सायकलीवर स्वार असतात. जेव्हा सारे जग शांत झोपलेले असते तेव्हा स्थितप्रज्ञ जागा असतो. जेव्हा सारे जग कामाला लागलेले असते, तेव्हा स्थितप्रज्ञ गाढ झोपी जातो. हा निसर्गनियमच आहे. आहे.

आमच्याही बाबतीत काहीसे असेच घडले...

पहाटेचा सुमार होता. पाऊस मी म्हणत होता. उकाड्याने गदमदणारी मुंबापुरी नुकत्याच आलेल्या किंचित गारव्याने सुखावून साखरझोपेत मुरत होती. आम्हीही घोरत होतो. (खोटे का बोला?) एवढ्यात उशाशी असलेला फोन खणखणला. गुरमाळलेल्या डोळ्याने आणि जाबडलेल्या आवाजात आम्ही फोन उचलला. कानावर तोच परिचित खर्ज शिरला- ""जय महाराष्ट्र...उठा!''

...झुंजुमुंजू होत असतानाच आम्ही डोळ्यातील चिपाडे काढत कृष्णकुंजच्या पायथ्याला उभे होतो. गडावर चक्‍क जाग होती. हे आम्ही काय पाहातो आहो? पहाटसमयी राजगड जागा? आता दुपारचा चहा पहाटेच? बाप रे!!

गेल्या गेल्या मुजरा करुन आम्ही मराठी पद्धतीचा गुड मॉर्निंग घातला. त्यांनी दुर्लक्ष केले. कां की तेव्हा ते चिंतनात जबर्दस्त गढले होते. बराच वेळ सूर्योदयाकडे टक लावून पाहात बसल्यावर ते खाकरले. मग त्यांनी आमच्याकडे रोखून बघत विचारले- ""बाकीचे रबरी शिक्‍के कुठे आहेत?''

आम्ही म्हटले, ""वेळ झाली की उमटतीलच, साहेब!'' तेवढ्यात सारे एकेक करुन दालनात उमटले.

साऱ्यांना रांगेत उभे करुन राजियांनी सवाल केला- "" एवढ्या सकाळी उठून करायचे तरी काय असते...बोला?''

...आम्ही चहाचे आधण ठेवावयास पळालो. असो.

Web Title: dhing tang article