जीएसटी म्हंजे काय रे भाऊ? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 30 जून 2017

मी इंगा दाखवला म्हणून सरकार वठणीवर आलं हे विसरू नकोस! लोक शेतकऱ्यांचा तारणहार म्हणतात मला हल्ली... ते काय उगीच?

(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...)

सदू : (घाईघाईने फोन फिरवत) जय महाराष्ट्र... मी शिवाजी पार्कवरून बोलतोय...
दादू : (फोन घेऊन थक्‍क होत) सद्या, सदूराया, सदूदेवा...अरे कित्ती बदललास? चक्‍क सभ्य माणसासारखा फोन करून नाव वगैरे सांगतोयस!! बरा आहेस ना माझ्या भावा?
सदू : (कटकटत) मला काहीही धाड भरलेली नाही!
दादू : (निक्षून सांगत) शक्‍यच नाही! सक्‍काळी साडेसातला फोन केलायस! ही तुझी मध्यरात्र असते!! साडेसातला तू जागा आहेस त्याअर्थी सूर्य पश्‍चिमेला उगवला आहे!
सदू : (एक अर्थपूर्ण सुस्कारा टाकत) गेले ते दिवस! दादू, आता मी रोज सकाळी साडेपाचला उठतो!! (एक पॉज घेत) घड्याळ लावून!!
दादू : (च्याटंच्याट पडत) क्‍काय? साडेपाच? दूधवालासुद्धा हल्ली साताशी येतो आमच्याकडे!!
सदू : (चिडून) करा अजून उपऱ्या परप्रांतीयांचे लाड! माणसानं कसं शिस्तशीर राहावं!! लौकर निजे, लौकर उठे, तयासी ज्ञान आणि आरोग्य मिळे!!
दादू : (सद्‌गदित होत) सदूराया, किती शहाण्यासारखं बोलायला लागलास! अरे, हेच तुला आधी कळलं असतं तर आज आपण-
सदू : (घाईघाईने) सध्या मी ह्या दोन्ही गोष्टी जमा करतोय!
दादू : (न कळून) कुठल्या रे?
सदू : (खुलासा करत) हेच... ज्ञान आणि आरोग्य! पहाटे लौकर उठतो, पक्षाची कामं करतो! मग घरची कामं करून पुन्हा पक्षाची कामं करतो! रात्री दहाच्या बातम्या ऐकून झोपायला जातो! म्हटलं ना, लौकर निजे..
दादू : (खजील होत) मीही आता असं काहीतरी करणारच आहे! ज्ञान आणि आरोग्य कोणाला नको असतं सदूराया?
सदू : (स्वप्नाळूपणाने) माझा पक्ष मी हाहा म्हणता बदलणार आहे! काल-परवापासून पक्षात डझनांनी बदल्या करून टाकल्या आहेत! म्हटलं, ही संस्थानं आधी खालसा व्हायला हवीत... काय?
दादू : (गांगरून) संस्थानं खालसा होऊन आपलं कसं चालेल, सदूदादा? तू ना... शेतकऱ्यांची बाजू घेऊन उतर मैदानात! सध्या शेतकरी म्हटलं की काम भागतंय आपलं!!
सदू : (कपाळाला आठी घालत) महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स आणि टीशर्टवर ट्रॅक्‍टरवर बसलाय, असं स्वप्न मीच पाहिलं होतं, दादू! आठवतंय?
दादू : (फुशारकी मारत) मी इंगा दाखवला म्हणून सरकार वठणीवर आलं हे विसरू नकोस! लोक शेतकऱ्यांचा तारणहार म्हणतात मला हल्ली... ते काय उगीच?
सदू : (कंटाळून) ते जाऊ दे रे! मी फोन वेगळ्याच कारणासाठी केला होता!!
दादू : (वडिलकीच्या सुरात) काय वाट्टेल ते विचार सदूराया! शेवटी कितीही झालं तरी मी तुझा थोरला भाऊ नाही का?
सदू : (एक पॉज घेत) ही जीएसटी काय भानगड आहे रे भाऊ?
दादू : (दचकून) जीएसटी? जीएसटी म्हंजे माहीत नाही तुला? कम्मालच झाली!!
सदू : (संभ्रमात) ह्या जीएसटीला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा? तेच समजत नाही!!
दादू : (शहाजोग सल्ला देत) विरोध करायचा आणि पाठिंबा द्यायचा...दोन्हीही करायचं!
सदू : (काळजीयुक्‍त स्वरात) तुझ्यासारखं सगळ्यांना जमतंच असं नाही, दादूशेठ!! पहिले ही जीएसटीची भानगड मला समजावून सांग! ते क्रेडिट इनपुट काय, रिव्हर्स चार्ज मेक्‍यानिझम काय...काहीही टोटल लागत नाही!
दादू : (विचारात पडत) हंऽऽ...मला पुढचं आंदोलन करमाफीबद्दल छेडावं लागणार, असं दिसतंय!
सदू : (पुन्हा गाडी रुळावर आणत) पण आधी ते जीएसटी म्हणजे काय ते तरी सांग! इतके दिवस मी सीएसटीच्या आधीचं रेल्वे स्टेशन समजत होतो...
दादू : (फुकट सल्ला...) तूर्तास तू विरोध करून टाक! पुढचं पुढं पाहता येईल! जीएसटी म्हंजे काय हे मला कळलं असतं तर मी शेतकऱ्यांच्यात दौरे कशाला काढले असते? असो. जय महाराष्ट्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article