उपाय! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ला इथे काहीही फ्यूचर नाही, मम्मा!! तुम्हारे सपने सपनेही रह जायेंगे!! मी कायमचा सुट्टीवर जाईन! परदेशात विपश्‍यनेची शिबिरं घेईन!!

बेटा : (पाय हापटत एण्ट्री घेत) मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (चमकून) आर यू ओके? तुला बरं नाहीए का बेटा?
बेटा : (वैतागूून) मला काहीही झालेलं नाही! इन फॅक्‍ट, मी आपल्या ऑफिसपासून तुझ्या घरापर्यंत धावत आलो आहे!! रनिंग!!
मम्मामॅडम : (जावळातून पंजा फिरवत) नेहमीसारखी ढॅणटढॅऽऽण एण्ट्री घेतली नाहीस नं...म्हणून विचारलं!!
बेटा : (दुर्लक्ष करत) मम्मा, मी निर्णय घेतलाय...फायनल डिसिजन!!
मम्मामॅडम : (निर्विकारपणे) फायनल डिसिजन नेहमी मीच घेते, बेटा!! पण तरीही तुला सांगायला हरकत नाही!! बोल!!
बेटा : (निर्णायक सुरात) मी राजकारणातून निवृत्त होणाराय! अर्ली रिटायरमेंट!!
मम्मामॅडम : (धक्‍का बसून) व्हॉट? काय?..हे मी काय ऐकते आहे? पाहिजे तर तू पुन्हा सुट्टीवर जा!! विपश्‍यना करून ये!! पण तू असलं काहीही करणार नाहीएस!!..अँड दॅट इज माय डिसिजन!!
बेटा : (खोल आवाजात)...मम्मा, तुम समझती क्‍यों नहीं? (दु:खभरे गाणं गुणगुणत) दुखी मन मेरे, सुन मेरा केहना, जहां नहीं चैना, वहां नहीं रेहनाऽऽ...
मम्मामॅडम : (विव्हळून) तू असं काही नैराश्‍याचं बोलायला लागलास की काळजाला घरं पडतात माझ्या!! अरे, तुझ्यासमोर केवढं मोठं भविष्य वाढून ठेवलंय! एक ना एक दिन मैं, तुम्हें उस खुर्सीपर बैठे हुए देखना चाहती हूं!! आपल्या खानदानातल्या माणसाला शोभतं का हे असं बोलणं? काहीतरीच तुझं? चलो, हाथ-मूंह धो लो, और पास्ता खा लो!! मैंने तुम्हारे लिए-
बेटा : (हात झटकत)...मला इथे काहीही फ्यूचर नाही, मम्मा!! तुम्हारे सपने सपनेही रह जायेंगे!! मी कायमचा सुट्टीवर जाईन! परदेशात विपश्‍यनेची शिबिरं घेईन!!
मम्मामॅडम : (काळजीत पडत) ऐसा दिल खट्टा ना करो, बेटा!! ऐसा क्‍यों बोलते हो? विपश्‍यना करेंगे तुम्हारे दुश्‍मन!!
बेटा : (दिलासा देत) दर सहा महिन्यांनी तिथे जातो, तसा दर सहा महिन्यांनी इथे येईन!
मम्मामॅडम : (हाताची घडी घालत) हे तर तू आत्ताच करतो आहेस, असं तुझे विरोधक म्हणताहेत!! (प्रोत्साहन देत) हे बघ, हार-जीत तर होतच असते! अजूनही वेळ गेलेली नाही!! जोरात मेहनत कर आणि आपली सत्ता खेचून आण!! मैं उस दिन का इंतजार कर रही हूं, जब-
बेटा : (वाक्‍य तोडत) झूठे ख्वाब मत दिखलाओ, मम्मा, मत दिखलाओ!! ये जंग कोई आसान जंग नहीं!!
मम्मामॅडम : (वीरश्रीचा डोस पाजत) मग तुझ्यासारखा योद्धाच इथे जिंकू शकेल ना? दुसऱ्या कोणाला चान्सच नाही!! बस, एकच असा हल्लाबोल कर की शत्रू गारद व्हायला हवा!!
बेटा : (गुडघे चोळत) डॉन को पकडना मुश्‍किलही नही, बल्कि नामुमकिन है!!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) म्हंजे?
बेटा : (खुलासा करत) असं नितीश अंकल म्हणतात, मी नाही!!
मम्मामॅडम : (संतापून) त्या नितीश अंकलचं मुळीच नाव घेऊ नकोस! ज्याला हिरो समजत होतो, तो व्हिलन निघाला! त्यांना फोडलं, आता गुजराथेतले आपले आमदार फोडताहेत मेले!! फू:!!
बेटा : (विचारपूर्वक) ते म्हणाले, की मोदीजींना 2019 मध्ये हरवण्याची क्षमता कुणाच्यातच नाही!! कुणीही तश्‍या गमजा मारू नयेत!!
मम्मामॅडम : (फणकाऱ्याने) त्यांच्यात नसेल ती क्षमता!! स्वत:वरून जगाची परीक्षा करू नये, म्हणावं!! (प्रेमाने बेट्याला कुरवाळत) माझा शूरवीर पुत्र ह्या कामाला पुरेसा आहे, म्हणावं!! हो की नाही?
बेटा : (अत्यंत गंभीरपणाने) त्यापेक्षा आपण एक आयडिया करायची? सक्‍सेसची गॅरंटी!!
मम्मामॅडम : (बेसावधपणाने) कुठली आयडिया?
मम्मामॅडम : (चुटकी वाजवत) आपणच सगळे जण एकगठ्ठा कमळ पार्टीत गेलो तर? हाहा!!
Web Title: dhing tang article