सेफ्टी फर्स्ट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

प्रिय म्याडम, आपले चिरंजीव गुजराथेत पूर बघायला गेले असताना सुरक्षा व्यवस्थेला चुकवून त्यांनी बुलेटप्रूफ गाडीतून पळ काढला आणि दुसऱ्याच साध्याश्‍या टोयोटा गाडीने ते पुराच्या दिशेने गेले. ती गाडी बुलेटप्रूफ नव्हती. त्यामुळे साध्या दगडांनीही तिच्या काचा फुटल्या!!

बेटा : (हेल्मेटसकट एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (हातातला पेपर टाकत) आलास? बरं झालं! तुला काही लागलं-बिगलं नाही ना?
बेटा : (दोन्ही दंडातल्या बेटकुळ्या दाखवत) आय ऍम तंदुरुस्त!
मम्मामॅडम : (जावळ कुर्वाळत) बेटा, किती काळजीत पाडशील मला? तुझ्या काळजीनं माझाच काय, आपल्या पक्षाचा जीव अर्धा झालाय!!
बेटा : (दिलासा देत) मां...मैं बिलकुल ठीक हूं! तुम खामखां परेशान होती हो!!
मम्मामॅडम : (गंभीर चेहऱ्यानं) प्रवासात तू नीट काळजी घेत नाहीस, अशा तक्रारी आल्या आहेत माझ्याकडे!!
बेटा : (कंटाळून) कमॉन! काळजी काय घ्यायची त्यात?
मम्मामॅडम : (हातातलं पत्र दाखवत) त्या "कमळ'वाल्या राजनाथ अंकलनी तक्रार पाठवली आहे. ही वाच!!
बेटा : (कानात बोट घालत) तूच वाच! आय हेट रीडिंग!!
मम्मामॅडम : (पत्र वाचत) ""प्रिय म्याडम, आपले चिरंजीव गुजराथेत पूर बघायला गेले असताना सुरक्षा व्यवस्थेला चुकवून त्यांनी बुलेटप्रूफ गाडीतून पळ काढला आणि दुसऱ्याच साध्याश्‍या टोयोटा गाडीने ते पुराच्या दिशेने गेले. ती गाडी बुलेटप्रूफ नव्हती. त्यामुळे साध्या दगडांनीही तिच्या काचा फुटल्या!! तुमचे चिरंजीव हे राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्यांचे डोळ्यांत तेल घालून रक्षण करणे, आमचे कर्तव्य आहे! सबब, त्यांना समज द्यावी. परदेशात गेल्यावरही ते असंच करतात. त्यांच्या वागण्यामुळे आमचे सुरक्षा सैनिक रडकुंडीला आले असून त्यांचा निम्मा वेळ चिरंजीवांनाच हुडकण्यात जातो!! यापुढे असे करू नये, अशी तंबी त्यांना द्यावी ही विनंती. ते फक्‍त तुमचेच ऐकतात, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. कळावे. आपला. राजनाथभावजी (होम मिनिस्टर!!)''
बेटा : (तक्रारीच्या सुरात) त्या बुलेटप्रूफ गाडीत किती उकडतं माहितीये? एकतर बाहेरची गंमत काहीही दिसत नाही! सगळ्या काळ्या काचा!! शिवाय आत घुसमटायला होतं!! त्यात ते सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर डोक्‍याला कुठलं तरी तेल लावून बसतात!! भयंकर वास येतो त्याचा!! (कपाळाला आठ्या घालत) नक्‍की ते तेल पतंजलीचं हर्बल काहीतरी असणार!!
मम्मामॅडम : (समजूत घालत) मीही तश्‍शाच गाडीनं प्रवास करते बेटा!!
बेटा : (तक्रारींचा पाढा वाचणे कंटिन्यू...) पाठीमागच्या सीटवर पाय अवघडून बसावं लागतं!!
मम्मामॅडम : (सल्ला देत) आपण मांडी घालून बसावं!! परदेशातसुद्धा तू सुरक्षा कवचाला हुलकावणी देऊन कुठेतरी पळतोस, असं भावजी म्हणतायत! त्याचं काय?
बेटा : (खांदे उडवत) परदेशात कशाला लागतेय सिक्‍युरिटी? तिथे साधं आइस्क्रीम खायचं म्हटलं तर बाजूला स्टेनगनवाला खुळ्यासारखा बघत बसतो!! दरवेळी डब्बल आइस्क्रीम घेण्याचा भुर्दंड बसतो!!
मम्मामॅडम : (निर्धाराने) यापुढे असंच वागणार असशील तर तुला सुट्टी मिळणार नाही!! नाहीतरी तू खूप सुट्ट्या घेतोस अशीही तक्रार आहेच!!
बेटा : (बेदरकारपणाने) आय डोण्ट केअर! नाहीतरी आमची ड्यूटी "विदाऊट पे'च असते! आम्ही "विदाऊट पे' सुट्टी घेऊ!! हाहा!!
मम्मामॅडम : (चिडून) आणि सगळं सोडून त्या गुजराथमध्ये कशाला गेला होतास?
बेटा : (अचंब्यानं) कशाला म्हंजे? पूर बघायला!!
मम्मामॅडम : (किंचित नाराजीने)...पूर बघायला कशाला जायचं? ते काय वॉटरपार्क आहे?
बेटा : (गंभीरपणाने) तुम भी ऐसे बोलने लगी? मग बोलणंच खुंटलं...
मम्मामॅडम : (सावरून घेत) तुझ्याच भल्यासाठी सांगते नं मी? काल आपल्या पक्षाच्या बैठकीलाही आला नाहीस! काही बोलले का मी तुला?...
बेटा : (अत्यंत खंतावलेल्या सुरात) मम्मा...मी पुन्हा असं करणार नाही!! बुलेटप्रूफ गाडीत पाय मुडपून बसेन! डोक्‍याला दुप्पट वासाचं तेल लावीन! कधीही पळून जाणार नाही!!
मम्मामॅडम : (प्रेमाने) दॅट्‌स लाइक अ गुड बॉय!!
बेटा : (एक डेडली पॉज घेत) आता मी पुन्हा सुट्टीवर जाऊ?

Web Title: dhing tang article

टॅग्स